ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघिणीचा मृत्यू

    दिनांक :07-Oct-2019
चंद्रपूर,
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा नियतक्षेत्रात पंचधारा जवळ सोमवार, 7 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास एका दोन वर्ष वयाच्या वाघिणीचा मृतदेह आढळून आला. वनाधिकार्‍यांना 2 ऑक्टोबरला गस्ती दरम्यान ही वाघीण जखमी अवस्थेत दिसली होती. या नवशिक्या वाघीणीने गव्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला असता गव्याने केलेल्या प्रतीहल्ल्यात वाघीणीच्या पाठीवर, मानेवर जखमा होऊन तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार नैसर्गिक संघर्षात जखमी वन्यजीव पकडून त्याांच्यावर औषधोपचार करणे अपेक्षित नाही. तेव्हापासून गस्ती पथकांद्वारे या वाघीणीवर लक्ष ठेवण्यात येत होते. 4 ऑक्टोबरला ही वाघीण गस्ती पथकाच्या नजरेआड झाली. त्यानंतर सातत्याने दोन पथकांद्वारे शोध घेऊनही ती आढळून आली नाही. सोमवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास गस्ती पथकाला तिचा मृतदेह आढळून आला. सहजासहजी माणूस पोहचू शकणार नाही. अशा नाल्याकाठाच्या जागेवर ही वाघीण पडलेली आढळून आली.
 

 
 
वाघीणीचे शवविच्छेदन दुपारी करण्यात आले. यावेळी क्षेत्र संचालक एन. आर. प्रविण, सहायक वनसंरक्षक महेश खोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. के. शेंडे, मानद वन्यजीव रक्षक अमोल बैस, मुख्य वन्यजीव संरक्षक यांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी बंडू धोत्रे, चंद्रपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम कडूकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खोब्रागडे व डॉ. कुंदन पोडचेलवार उपस्थित होते.
शवविच्छेदन अहवालानुसार या वाघीणीच्या पाठीच्या कण्यावर शिंगाने जखम होऊन मोठी इजा झाल्याचे आढळून आले. वाघिणीच्या शरीरावर असणार्‍या या खोलवर जखमांमधून रक्तस्त्राव होऊन ती मुत्यूमूखी पडल्याचे आढळून आले.