श्वास विकत घ्यायचा, की तडफडून मरायचे?

    दिनांक :07-Oct-2019
आज फुकट मिळत असलेला श्वास भविष्यात विकत घ्यायचा का, की श्वासाशिवाय तडफडून मरायचे, याचा निर्णय करण्याची वेळ आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या अफाट प्रगतीने आपण सगळेच भारावून गेलो आहोत. या प्रगतीने भौतिक सुखाची दारं आपल्यासाठी खुली झाली आहेत. पण, या भौतिक सुखासाठी आपण पर्यावरणाची वाट लावली आहे, याकडे आपले साफ दुर्लक्ष होत आहे. जीवन आनंदाने जगायचे असेल तर आजचा विचार करावा, उद्यात डोकावू नये, असा प्रेमळ सल्ला काही महाभाग देत असतात. पण, आजचा दिवस आनंदात जगण्याच्या नादात उद्याची पर्वा करत नाही आणि असे करून आपण स्वत:च्याच सर्वनाशाची वाट मोकळी करतो आहोत, याचे साधे भानही आम्हाला राहिलेले नाही. आज आम्ही जी भौतिक सुख भोगत आहोत, त्यासाठी आम्ही पर्यावरणाचे दुप्पट-तिप्पट नुकसान केले आहे. पर्यावरणाच्या विरुद्ध जीवनशैलीचा अंगीकार करून आपण या वसुंधरेला ‘रेड अलर्ट’च्या घेर्‍यात आणून ठेवण्याचे पाप केले आहे. जंगलांची अमर्याद कटाई आम्ही केली आहे आणि त्याची जराही खंत आम्हाला वाटत नाही. एकीकडे वेगाने विकास होतो आहे आणि दुसरीकडे दुप्पट वेगाने पर्यावरणाचा र्‍हास होतो आहे. पर्यावरण संरक्षणाकडे प्रचंड दुर्लक्ष होते आहे आणि या सगळ्यांची वाईट फळं आपल्याच पुढच्या पिढ्यांना भोगावी लागणार, याचीही चिंता करायला आम्हाला सवड नाही. इतके कसे बेजबाबदार झालोत आम्ही?
 

 
 
 
हे सगळे आज या ठिकाणी नमूद करण्याचे कारण आहे. मुंबईत मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमध्ये एकूण 2 हजार 646 झाडं तोडली जाणार आहेत. त्यातली अर्धी झाडं आतापर्यंत तोडूनही झाली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेली याचिका फेटाळताच रातोरात झाडांची कत्तल सुरू झाली. विकास हवा असेल तर काही तडजोडी स्वीकाराव्याच लागतील, असा युक्तिवाद अनेकदा केला जातो. मान्य आहे हा युक्तिवाद. पण, तोडलेल्या झाडांच्या चौपट नवी झाडं लावली पाहिजेत, त्याचं काय? लावली जातात का अशी झाडं? लावली की नाही हे कुणी बघतं का? ठेकेदार झाडं लावत नाही आणि सरकारी अधिकारी, राजकीय नेते त्याकडे दुर्लक्ष करतात. का? कारण अळीमिळी गुपचिळी! समृद्ध पर्यावरण हे मानवी जीवनाचे अभिन्न अंग आहे आणि हे अंगच आपण नष्ट करायला निघालो आहोत. मनुुष्यजीवनाच्या विकासात पर्यावरणाची भूमिका अनमोल आहे. ही निर्माणकारी भूमिका पर्यावरण निभावत असताना आम्ही मात्र पर्यावरणाच्या बाबतीत विनाशकारी भूमिका वठवत आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे.
 
मनुष्याला जीवन जगण्यासाठी शुद्ध पर्यावरणाची आत्यंतिक आवश्यकता आहे. मनुष्याला सुखद जीवन जगता यावे यासाठी जे जे म्हणून आवश्यक आहे, ते सगळे पर्यावरणाने उपलब्ध करून दिले आहे. अगदी विपुल प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. पण, जे दिले आहे ते वर्षानुवर्षे कामात यावे यासाठी दिले आहे, रात्रीतून संपविण्यासाठी नव्हे! आज आम्ही पर्यावरणाचे जे दोहन करतो आहोत ना, ते दोहनच आम्हाला गिळंकृत करेल, हाल हाल करून मारेल, हे आजच लक्षात घेतले पाहिजे. झाडं, पाणी, खनिजं हे पर्यावरणाचे अतिशय महत्त्वाचे घटक जर नसते, तर मनुष्यजीवनाची कल्पना करणेही कठीण होते. संतुलित व मानवास अनुकूल अशा पर्यावरणाने प्रत्येक मनुष्याला आणि या भूतलावरील प्रत्येक सजीवाला आपल्या छत्रछायेत घेत जगवले आहे, याची जाणीव आम्ही ठेवणार आहोत की नाही? एकीकडे माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे आमचे जीवन सुसह्य झाले असतानाच, दुसरीकडे पर्यावरण संरक्षणाकडे झालेल्या दुर्लक्षाने मनुष्याच्या अस्तित्वावरच भलेमोठे संकट ओढवले आहे. आज आपण जी भौतिक प्रगती पाहतो आहोत, त्या प्रगतीने पर्यावरणाचे शुद्ध-सात्त्विक रूप विकृत केले आहे, हे पाहताना आम्हाला खंत कशी वाटत नाही हो? पर्यावरणाच्या बाबतीत भौतिक प्रगतीने, अर्थात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने केलेली घुसखोरी उद्या चालून आपल्या मुळावरच उठणार आहे, याचीही दखल समस्त मनुष्यजातीने तातडीने घ्यायला नको का? माहिती-तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीने माणसाच्या जगण्याची दिशाच बदलवून टाकली आहे. पण, ज्या दिशेला मनुष्य जातो आहे, ती दिशा विनाशकारी आहे.
 
पर्यावरण संरक्षणाची चिंता फक्त भारतालाच आहे असे नाही. संपूर्ण जगाला ही चिंता सतावते आहे. सगळीकडे पर्यावरण संरक्षणाबाबत कार्यक्रम होतात, चर्चा घडवून आणल्या जातात, इशारे दिले जातात. पण, प्रत्यक्षात पर्यावरण संरक्षणासाठी कृती करण्याची वेळ येते तेव्हा एकदुसर्‍याकडे बोट दाखविले जाते. ही बेपर्वा वृत्ती विनाश नाही तर आणखी काय घडवून आणणार? पर्यावरण संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काही मापदंड ठरवण्यात आले आहेत, काही नियम तयार करण्यात आले आहेत. पण, या नियमांचे पालन करतो कोण? कुणीच करीत नाही. स्टॉकहोम येथे झालेली परिषद असो, की मग रियो दि जानेरो येथे झालेले पृथ्वी संमेलन असो, मॉण्ट्रियल प्रोटोकॉल असो वा मग क्योटा प्रोटोकॉल असो, सगळीकडे पर्यावरण संरक्षणावर चर्चा झाली, त्यावर उपाय सुचविण्याात आले, नियम तयार करण्यात आले, पर्यावरणरक्षणासाठी अनेक कार्यक्रमांची आखणी झाली, पण आजवर या कुठल्याही कार्यक्रमांची अंमलबजावणी झाल्याचे दुर्दैवाने दिसत नाही, नियमांचेही पालन होताना दिसत नाही. याचाच अर्थ असा की, आम्हाला कुणालाही पर्यावरणाची कसलीही चिंता नाही. आज जंगलं काही प्रमाणात का होईना अस्तिवात आहेत, गावा-शहरात बर्‍यापैकी झाडं आहेत म्हणून ऑक्सीजन तरी मिळतो आहे. त्यामुळे श्वास घेताना त्रास होत नाही. पण, या फुकटात मिळणार्‍या ऑक्सीजनचे मोल आम्हाला अजूनही कळलेले नाही, हे सगळ्यात मोठे दुुर्दैव होय. कॅनडाने तर पिशवीबंद ऑक्सीजनचा धंदा कधीचाच सुरू केला आहे. प्रदूषित चीन हा कॅनडाने उत्पादित केलेल्या पिशवीबंद ऑक्सीजनचा सगळ्यात मोठा ग्राहक आहे. भारतातही काही कंपन्यांनी हिमालयातली शुद्ध हवा बाटलीबंद करून विकण्याचा धंदा सुरू केला आहे. हिमालयातले पाणी तर कधीचेच बाटलीत टाकून विकले जात आहे. या धंद्याला तेजी द्यायची की तो संपवायचा, याचा निर्णय करण्याची योग्य वेळ हीच आहे. आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने महाराष्ट्राला सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा वृक्षप्रेमी वनमंत्री लाभला. वनखात्यामार्फत मुनगंटीवार यांनी, पन्नास कोटी वृक्षलागवडीचे, पाच वर्षांपूर्वी ठरविलेले उद्दिष्ट यंदा पूर्ण झाले, हे आपले भाग्यच म्हटले पाहिजे. पण, एवढ्याने काम भागणार नाही. आणखी शंभर कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट सरकारने ठरवावे, जनतेने त्यात उत्फूर्त सहभाग नोंदवावा आणि पर्यावरणावर आलेले संकट नष्ट करावे. आज आरे वसाहतीमधील अडीच हजारपेक्षा जास्त झाडे तोडली जात आहेत, त्याबदल्यात मेट्रो कारशेडच्या आजूबाजूच्या भागात दहा हजारपेक्षा जास्त झाडं लावून, ती जगवून आणि वाढवून निर्माण झालेल्या संकटावर मात करणेच श्रेयस्कर ठरावे. विकास कुणाला नको आहे, प्रत्येकालाच हवा आहे. पण, पर्यावरणाचा बळी देत स्वत:चा बळी देण्याची व्यवस्था करून विकास स्वीकारू नये, एवढेच!