रोमँटिक सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी!

    दिनांक :07-Oct-2019
मुंबई,
आपल्या संवेदनशील अभिनयानं नवाजुद्दीन सिद्दीकीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तो ज्या सिनेमांमध्ये काम करतो, तिथे आपल्या अभिनयाची छाप पाडतोच. आता त्याच्या अभिनयाचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. 'बोले चुडिया' हा त्याचा नवा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीनं अलीकडेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. हा चित्रपट नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आयुष्यातील सत्य घटनांवर आधारित आहे. 'बोले चुडिया' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला तेव्हा सगळीकडे बोलबाला होता तो 'सेक्रेड गेम्स २' आणि त्यातील सर्वशक्तीशाली गणेश गायतोंडे याचा.... त्यामुळे 'बोले चुडिया' चा टीझर आपल्या फॅन्ससोबत शेअर करताना नवाजुद्दीन सिद्दीकीनं गणेश गायतोंडे या पात्राची मदत घेतली आहे. गणेश गायतोंडे जसं बोलतो त्याच बोलीत त्यानं या टीझरविषयी लिहिलं आहे. 'अब अपुनको लाईफमे कोई लफडा नही चाहिये. बस रोमान्स और फॅमिली...' असं कॅप्शन देऊन त्यानं हा व्हिडिओ शेअर केला आहे. २९ सेकंदाच्या या टीझरमध्ये चित्रपटाचा हिरो त्याचं ज्या मुलीवर प्रेम आहे, तिच्या मागे -मागे फिरताना, तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी सतत काहीतरी करत असताना दिसतो. या चित्रपटाची कथा नवाजच्या आयुष्यातील सत्य घटनांवर आधारित आहे ही गोष्ट टीझरमध्येही अधोरेखित केली जाते. त्यामुळे या चित्रपटात नवाजचं एक वेगळ रूप पाहायला मिळणार हे मात्र नक्की आहे.
विशेष म्हणजे नवाजुद्दीनच्या अभिनयाचे चाहते असणाऱ्यांना त्याचं गाणं ऐकायलाही मिळणार आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला 'गल्ली बॉय' चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये रॅप साँगचे वेड लागलं. त्यानंतर बॉलिवूडमधील कलाकारही या नव्या प्रकाराच्या प्रेमात पडले. त्यामुळे कलाकारही चित्रपटात एखादं रॅप साँग गाण्यास प्राधान्य देत आहेत. नवाझुद्दीन सिद्दीकीही त्याचा आगामी 'बोले चुडिया' या सिनेमासाठी तो रॅप साँग गाणार असल्याचं समजतंय. याबद्दल बोलताना अभिनेता नवाझुद्दीन सांगतो की, 'मी गायक नाही, पण मी उत्तम रॅप गाण्याचा प्रयत्न जरूर केला आहे'. नवाझुद्दीननं चित्रपट निर्मात्यांच्या आग्रहास्तव रॅप गाण्याची जबाबदारी स्वीकारली, असं देखील सांगितलं आहे. तो सांगतो की, माझ्यात उत्तम गाणं गाण्याची क्षमता आहे, असं मला वाटत नाही. मला अजिबात गायक अजिबात बनायचं नाहीय. पण त्या गाण्यात अशा काही गोष्टी आहेत ज्यासोबत माझा आवाज जुळला, असं मला वाटतं.
'बोले चुडिया' चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमाच्या अनुषंगाने त्याचा भाऊ शामस नवाब सिद्दीकी हा दिग्दर्शकाच्या रूपात पदार्पण करणार आहे.