गंभीरचे क्रिकेट करिअर मी संपवले; पाकच्या 'या' क्रिकेटरचा दावा

    दिनांक :07-Oct-2019
कराची,
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचे क्रिकेट करिअर मी संपवले. २०१२ च्या मालिकेत गंभीरला माझा चेंडू खेळताच येत नव्हता. तिथूनच त्याच्या करिअरला उतरती कळा लागली, असा दावा पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद इरफान याने केला आहे.

 
२०१२ मध्ये भारत व पाकिस्तानमध्ये टी-२० व एकदिवसीय मालिका झाली होती. या मालिकेत मोहम्मद इरफान यानं गंभीरला तब्बल चारवेळा बाद केलं होतं. या मालिकेनंतर गंभीरला भारताकडून केवळ एकच मालिका (इंग्लंडविरुद्ध) खेळता आली. त्यानंतर त्याला संघात पुन्हा कधीच संधी मिळाली नाही. त्याकडं इरफाननं लक्ष वेधलं आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इरफान म्हणाला, '२०१२ साली झालेल्या मालिकेत गंभीर माझ्या गोलंदाजीचा सामना करताना चाचपडत होता. माझ्या उंचीमुळं भारतीय फलंदाजांना त्याच्या चेंडूचा अंदाज यायचा नाही. चेंडू किती वेगानं येईल हेही त्यांना कळत नव्हतं. विराटसह भारतीय संघातील काही फलंदाजांनी स्वत: मला तसं सांगितलं होतं. गंभीरला तर माझी गोलंदाजी नकोशी वाटायची. तो माझ्याशी नजरही मिळवू शकत नव्हता. तो मला टाळायचा,' असंही इरफान मुलाखतीत म्हणाला.

 
'मला कुणी घाबरायचे असे मी म्हणणार नाही. पण गंभीरला भारतीय संघातून वगळल्यानंतर अनेकांनी माझे अभिनंदन केले होते,' असेही तो म्हणाला. इरफान हा पाकिस्तानचा एक महत्त्वाचा गोलंदाज आहे. मात्र, फिटनेसच्या कारणास्तव त्याला सध्या विश्रांती देण्यात आली आहे. ७ फूट १ इंच एवढी उंची असलेल्या इरफानला गोलंदाजी करताना त्याच्या उंचीचा खूप फायदा मिळतो.