आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वातंत्र्यलढा!

    दिनांक :07-Oct-2019
 दिल्ली दिनांक 
 
रवींद्र दाणी  
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती सार्‍या देशात साजरी केली जात आहे. एका बलाढ्य राजसत्तेविरुद्ध मीठ सत्याग्रह, दांडी सत्याग्रह, उपोषण यासारख्या साधारण वाटणार्‍या मार्गाने लढणारा नेता म्हणून गांधीजी ओळखले जातात. उपोषण हे गांधीजींनी मानवतेला दिलेले सर्वात प्रभावी हत्यार होते. ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध त्यांनी हे हत्यार 17 वेळा वापरले. विसाव्या शतकात त्यांनी ब्रिटिशांविरोधात दिलेला लढा इतिहास घडविणारा ठरला.
आधुनिक लढा
एकविसाव्या शतकात असाच एक लढा लढला जात आहे आणि तो आहे हॉंगकॉंगच्या भूमीवर! चीनच्या बलाढ्य सत्तेच्या विरोधात हॉंगकॉंगमध्ये सुरू असलेला संघर्ष, एकविसाव्या शतकातील सर्वात आधनिुक तंत्रज्ञानाचा वापर करून लढला जात असलेला संघर्ष म्हणून ओळखला जाईल.
लढ्याचा चेहरा
महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा चेहरा होते. हॉंगकॉंगमध्ये सुरू असलेल्या लढ्याला कोणताही चेहरा नाही, हे विशेष! हॉंगकॉंगमधील युवक हे सारे आंदोलन चालवीत आहेत. आम्ही कुणालाही चेहरा केलेला नाही. कारण, ज्या क्षणी आमच्या आंदोलनाचा नेता तयार होईल पोलिस त्याला अटक करतील, म्हणून आम्ही कुणालाही नेता केलेले नाही, असे स्पष्टीकरण दिले जात आहे. आंदोलकांनी त्या पुढील पाऊल टाकीत आता चेहर्‍यावर बुरखा लावणे सुरू केले आहे. पोलिसांना आंदोलकांची ओळख पटविता येऊ नये यासाठी हे करण्यात आले आहे.
 

 
 
पोलिसांचा उपाय
हॉंगकॉंग प्रशासनाला एका जुन्या कायद्यानुसार काही तातडीचे अधिकार देण्यात आले आहेत. त्याचा वापर करीत, 3 तारखेला स्थानिक प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, चेहर्‍यावर मुखवटा-बुरखा घालून रस्त्यावर येण्यास युवकांना बंदी घालण्यात आली आहे. मुखवटा घालून रस्त्यावर येणार्‍याच्या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे. याचा आंदोलकांवर योग्य तो परिणाम होईल, अशी आशा पोलिसांना वाटत आहे. शिवाय, पोलिसांना आणखी काही अधिकार देण्यात आले आहेत.
तंत्रज्ञानाचा वापर
आंदोलकांनी एक ॲप तयार केले असून, त्यानुसार पोलिस कोणत्या ठिकाणी आहेत, कोणत्या ठिकाणी अश्रुधुराचा वापर केला जात आहे, याची माहिती त्यावरून मिळते व आंदोलक आपल्या आंदोलनाची जागा ठरवू शकतात. ॲपलने हे ॲप आपल्या फोनवरून काढून टाकले असले, तरी गूगलवर ते असल्याने त्याचा वापर आंदोलक करीत आहेत. हे ॲप आंदोलकांच्या हातातील सर्वात प्रभावी हत्यार ठरत असून, त्याचा वापर करून दिवसभरात केल्या जाणार्‍या आंदोलनाची दिशा ठरविली जाते. आंदोलनाची सारी दिशा सकाळी मोबाईल फोनवर ठरविली जात आहे. याला कसे हाताळावयाचे, हे पोलिसांना अद्याप उमगलेले नाही. पोलिसांकडून वापरल्या जाणार्‍या अश्रुधुराला हाताळण्यासाठीही निदर्शकांनी व्यवस्था केली असून, त्याचे साहित्य सोबत घेऊनच ते घराबाहेर पडतात. याने अश्रुधुराचा वापर निरुपयोगी ठरत आहे. चार महिन्यांच्या या आंदोलनात पोलिसांना काही दिवसंापूर्वी निदर्शकांवर काही गोळ्या झाडाव्या लागल्या. हॉंगकॉंगमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात पहिल्यांदा पोलिसांना गोळ्यांचा वापर करावा लागला. यात एक निदर्शक जखमी झाला असल्याने, तो या आंदोलनातील एक महत्त्वाचा मद्दा ठरला आहे. विशेष म्हणजे जखमी झालेला आंदोलक अल्पवयीन आहे.
1989 आणि 2019
1989 मध्ये चिनी विद्यार्थ्यांनी बीिंजगच्या तियानमेन चौकात निदर्शने केली. चीनने रणगाड्यांचा वापर करून ती निदर्शने मोडून काढली. पण, 1989 आणि 2019 यात 30 वर्षांचे अंतर आहे. चिनी नेतृत्वाने 1989 मध्ये जे केले ते त्यांना हॉंगकॉंगमध्ये 2019 मध्ये करता येणार नाही, याची चिनी नेत्यांना कल्पना आहे आणि म्हणूनच हॉंगकॉंगमधील आंदोलन हाताळणे त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान ठरत आहे. 1989 मध्ये इंटरनेट नावाचे प्रकरण नव्हते. जगात काय सुरू आहे, याची कल्पना फार नव्हती. आता तसे नाही. एका घटनेची माहिती काही क्षणात जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचलेली असते. हॉंगकॉंगमधील आंदोलक नेमका याचाच वापर करीत आहेत, तर चिनी नेत्यांना याला उत्तर देण्याचे शस्त्र अद्याप गवसलेले नाही. चिनी नेत्यांनी आपले रणगाडे हॉंगकॉंगमध्ये नेऊन तर ठेवले, पण त्याचा वापर करण्याचे साहस अद्याप तरी चिनी नेत्यांना झालेले नाही.
स्वातंत्र्यलढा!
हॉंगकॉंगमधील आंदोलनाला आता सरळसरळ स्वातंत्र्यलढ्याचे स्वरूप आले आहे. स्थानिक युवकांनी अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेची प्रतिमा तयार करून, राष्ट्रपती ट्रम्प यांनी हॉंगकॉंगमध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. यावरून हॉंगकॉंगमध्ये चीनविरोधी भावना किती तापली आहे, याची कल्पना करता येईल. विदेशी एजंट म्हणजे चीन विरुद्ध मदरलॅण्ड म्हणजे हॉंगकॉंग, असे स्वरूप या लढ्याला आले असून, याने चिनी नेतृत्व चिंतीत असल्याचे म्हटले जाते. हॉंगकॉंगच्या स्थानिक प्रशासनाने वादग्रस्त ठरलेले प्रत्यर्पण विधेयक मागे घेतल्यानंतर तेथील आंदोलन व आंदोलक शांत होतील, असे चीनला वाटत होते. ते न होता, आंदोलन अधिक उग्र झाले आहे. त्यात जनतेचा सहभाग वाढला. प्रारंभी यात फक्त युवावर्ग सामील झाला होता, त्यात आता अन्य वयोगटातील लोकही सहभागी होत आहेत आणि ही चीन सरकारसाठी खरी चिंतेची बाब ठरत आहे.
 
हॉंगकॉंगमधील वातावरण तापण्याचे नवे कारण, 1 ऑक्टोबरचा चीनचा राष्ट्रीय दिवस आहे. 1 तारखेला बीिंजगमध्ये चीनच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यात आले. त्यात आधुनिक प्रक्षेपणास्त्रे, विमाने यांचा समावेश होता. चीनने डांगफेंग नावाचे प्रक्षेपणास्त्र तयार केेले असून, ते 30 मिनिटांत अमेरिकेपर्यंत पोहोचेल, असा दावा केला जात आहे. चीनने आयोजित केलेले हे संचलन आजवरचे सर्वात मोठे व भव्य असल्याचे म्हटले जाते. हे निमित्त करून हॉंगकॉंगमधील आंदोलकांनी 1 तारखेला राष्ट्रीय दुखवटा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानिमित्ताने हॉगकॉंगमध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली आणि आंदोलन अधिक चिघळले. याने चिनी नेतृत्व संतप्त असले, तरी त्याला काहीही करता आलेले नाही.
 पुढील टप्पा
हॉंगकॉंगमधील स्वातंत्र्यलढा आता नव्या टप्प्यात प्रवेश करण्याची शक्यता तयार झाली आहे. पोलिसांनी आंदोलन चिरडण्याचा चंग बांधला असताना, आंदोलक नव्या जोशाने आंदोलन सुरू करण्याच्या तयारीत आहेत. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त वापर करण्याचा प्रयत्न केला जाईल. हॉंगकॉंगमध्ये सुरू असलेला हा स्वातंत्र्यलढा एकविसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाने लढलेेला लढा म्हणून इतिहासात नोंदला जाणार आहे...