मोठ्या कमाईनंतर घसरला शेअर बाजार

    दिनांक :07-Oct-2019
मुंबई,
सकाळच्या सत्रात 400 पेक्षा जास्त अंकांची कमाई करूनही, मुंबई शेअर बाजार, गुंतवणूकदारांच्या नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे आज सोमवारी 141 अंकांनी खाली आला.
 

 
 
जागतिक शेअर बाजारातील अनिश्चिततेच्या सावटाचे परिणाम भारतातही दिसून आले. सकाळी 439 अंक कमावल्यानंतर दुपारच्या सत्रात शेअर बाजारात घसरणीला सुरुवात झाली. या व्यवहारात यस बँकेच्या शेअर्स मूल्यात 8 टक्क्यांनी घसरण झाली. याशिवाय, आयटीसी, टीसीएस, एल अॅण्ड टी, एचडीएफसी आणि इन्फोसिस यासारख्या कंपन्यांनाही नुकसान सहन करावे लागले. दिवसभराच्या व्यवहारानंतर शेअर बाजाराचा निर्देशांक 141.33 अंकांच्या घसरणीसह 37,531.98 या स्तरावर बंद झाला. सकाळच्या सत्रात तो 37,919.47 या स्तरावर होता. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 48.35 अंकांची घसरण झाली. दिवसभराच्या उलाढालीनंतर निफ्टी 11,126.40 या स्तरावर बंद झाला.