काँग्रेसकडे प्रचारकांची वाणवा

    दिनांक :08-Oct-2019
निवडणूकनामा 
 
 
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शुक‘वारी मुदत संपली, तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अधिकृत घोषणा झाली नाही. निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यावर अजून त्यांचे एकमत झाले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य समविचारी पक्षांना सोबत घेऊन आघाडी करण्याचे जाहीर केले होते. आघाडी होणार पण ती गरज म्हणून. 288 पैकी काँग्रेसने 147 उमेदवारांची व राष्ट्रवादीने 98 उमेदवारीची यादी जाहीर केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विश्वासातील  विक्रोळीचे संजय दिना पाटील यांनी शुक‘वारी रातोरात शिवसेनेत प्रवेश करून धक्का दिला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या आग्रहास्तव शरद पवार यांनी संजय पाटील यांना मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपद दिले होते. राष्ट्रवादीला मुंबईत स्थान नाही हे लक्षात घेऊन मुंबई अध्यक्षपदाचा तडकाफडकी सचिन अहिर यांनी राजीनामा दिला. ते आता शिवसेनेचा निवडणुकीत प्रचार करीत आहेत. राष्ट्रवादीची मुंबईत काय गत व पत आहे, हे आता स्पष्ट झाले. 

 
 
मुंबई काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांना काँग्रेस पक्षात दिल्लीचे व राज्याचे वरिष्ठ नेते विचारत नसल्याने त्यांनी काँग्रेस पक्षाचा मुंबईत प्रचारपासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. संजय निरुपम हे प्रचार करण्यात माहीर आहेत. परंतु त्यांनी विधासनसभेसाठी चार उमेदवारांची नावे दिली होती. त्या उमेदवारांची पक्षश्रेष्ठींनी दखल न घेतल्याने नेहमीप्रमाणे त्यांनी काँग्रेस नेत्यांचे वस्त्रहरण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुंबईत काँग्रेसपुढे प्रचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश असलेले दहा नेते निवडणुकीच्या रिंगणात असल्याने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांची गोची झाली. त्यांची मुलगी वर्षा गायकवाड या धारावी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांचेही या निवडणुकीत काही खरे नसल्याचे बोलले जाते. अर्थात्‌, एकनाथ गायकवाड यांच्यापुढे त्यांच्या मुलीला निवडून आणण्याचे मोठे आव्हान आहे. विशेष म्हणजे, वर्षा गायकवाड यांना ते निवडून आणू शकले नाही, तर काँग्रेसमधील त्यांचे काही खरे नाही, असे काँग्रेसजन बोलत आहेत. यासाठी ते काँग्रेसच्या प्रचारासाठी अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरकडे प्रयत्न करीत आहेत. मात्र, ऊर्मिला मातोंडकरने गायकवाड यांना प्रचाराबाबत ना होकार, ना नकार देत संभ‘मात ठेवले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव झाल्यावर ऊर्मिलाने काँग्रेस पक्षातील बेशिस्तपणावर सडकून टीका केली होती. त्या महायुतीतील शिवसेनेशी संपर्कात होत्या. तळ्यात-मळ्यात असलेल्या ऊर्मिलाला प्रचारासाठी आणण्यामागे एकनाथ गायकवाड यांचा अथक प्रयत्न हा त्यांच्या कन्या- वर्षा गायकवाड यांच्यासाठी आहे, अशी चर्चा दबक्या आवाजात धारावीत केली जात आहे.
 
 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह हे काँग्रेस पक्षात आहेत की नाही, याबाबत सर्वांसमोर पेच उभा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कृपाशंकर यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतल्यापासून ते काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात दिसत नाहीत. माजी मंत्री आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून यशस्वी कारकीर्द कृपाशंकर सिंह यांनी केली. एक हिंदी भाषकांचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तेही काँग्रेस पक्षापासून दुरावल्यानंतर त्यांनी महायुतीचा प्रचार करण्याचे जाहीर केले. त्यामुळे आता हिंदी भाषकांची मते महायुतीकडे वळणार या भयाने काँग्रेस नेते पूर्णत: गोंधळले आहेत.
 
 
लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईचे पराभूत उमेदवार मिलिंद देवरा हे देखील काँग्रेस पक्षातील गटबाजीला कंटाळले आहेत. नुकतेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील ‘हाऊडी मोदी’ या कार्यक‘माचे, टि्‌वट करून मोदी यांचे अभिनंदन केले होते आणि नरेंद्र मोंदी यांनीही अनपेक्षितपणे रिटि्‌वट करून देवरांची स्तुती केल्याने संपूर्ण काँग्रेस बुचकाळ्यात पडली, ती अजूनही सावरलेली दिसत नाही.
 
 
अशा या विचित्र भोवर्‍यात दस्तुरखुद्द काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे भारतात नाहीत. ते कंबोडिया देशात आहेत. 11 ऑक्टोबरला ते भारतात परतणार आहेत. म्हणजे महाराष्ट्रात प्रचारासाठी फक्त आठ दिवस असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात नऊ सभा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 19 सभा, त्याशिवाय मु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील होणार्‍या सभा पाहता मुंबई काँग्रेस पक्षाची अवस्था ‘राजकारण गेले चुलीत’ अशी बोलण्याची वेळ आता अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्यावर आली आहे.
जयंत करंजवकर
98203 33710