‘इस्रो’मधील मृत्यूंचे रहस्योद्घाटन कधी?

    दिनांक :08-Oct-2019
तिसरा डोळा
चारुदत्त कहू
 
भारतीय अणू संशोधन संस्थेच्या (इस्रोे) अखत्यारित येणार्‍या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरचे (एनआरएससी) 56 वर्षीय शास्त्रज्ञ सुरेश कुमार यांच्या गूढ मृत्यूची बातमी आता जगजाहीर झाली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे अवघी संशोधक मंडळीच नव्हे, तर या देशावर प्रेम करणारा प्रत्येक भारतीय हळहळला आहे. सुरेश कुमार यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला. प्राथमिक तपासावरून ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुरेश कुमार एनआरएससीच्या छायाचित्र विभागात कार्यरत होते. हैदराबादमधील अमीरपेठ भागातील घरात ते एकटेच राहात होते. त्यांची पत्नी चेन्नईमध्ये राहात असे. तिने सुरेश कुमार यांना मोबाईलवर अनेकवेळा कॉल करूनही त्यांनी कॉल न घेतल्यामुळे तिने कुमार यांच्या काही मित्रांना याबद्दल सांगितले. त्यांचे मित्र घरी पोहोचले, मात्र घराचे दार बाहेरून बंद केले होते. दार तोडल्यानंतर आतमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. कुमार यांच्या डोक्याला तीन ठिकाणी जबर मार लागल्याच्या खुणा पोलिसांना आढळल्या. ‘इस्रो’मधील शास्त्रज्ञाची हत्या अथवा गूढ मृत्यू होण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नाही. ‘इस्रो’ आणि ‘बार्क’मध्ये काम करणारे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांच्या अशा रहस्यमय पद्धतीने झालेल्या मृत्यूची अनेक प्रकरणे माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांच्या प्रयत्नांमुळे उघड झाली आहेत. 
 

 
 
मुंबईस्थित माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी गेल्या 15 वर्षांत, ‘इस्रो’ आणि या संस्थेशी संलग्नित संस्थांच्या किती कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला, याची विचारणा केली असता, नोकरशाहीने त्यांच्या पद्धतीने दिलेली माहिती अतिशय धक्कादायक म्हणावी लागेल. खरेतर ही माहिती देण्यास ‘इस्रो’ला कुठलेच स्वारस्य नव्हते. पण, देशाच्या अंतराळ संशोधनक्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थेत सुरू असलेल्या या मृत्यूच्या तांडवाने चिंतित झालेल्या चेतन कोठारी यांच्या आग्रही भूमिकेमुळे ही माहिती जनतेपुढे आली. ‘इस्रो’ने गेल्या 15 वर्षांत या संस्थेसह संलग्न संस्थांमधील 684 कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याची माहिती तर दिली, पण या मृत्यूंची कारणे त्यांनी कुठेही नमूद केली नाहीत. ‘इस्रो’च्या मुख्यालयाखेरीज इतर संस्थांमधील कर्मचार्‍यांच्या गेल्या 15 वर्षांतील मृत्यूंची संख्या 387 आहे; तर ‘इस्रो’चे मुख्यालय, ‘इस्रो’ टेलिमेट्री ट्रॅिंकग अॅण्ड असोसिएट युनिट आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधील 297 कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याची माहितीही जाहीर झाली आहे.
 
 
भारताला राजकीय आणि प्रथितयश व्यक्तींच्या गूढ मृत्यूंचीही पार्श्वभूमी आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री, डॉ. होमी भाभा, विक्रम साराभाई, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, राजेश पायलट, माधवराव शिंदे... अशी ही यादी लांबविली जाऊ शकते. या मृत्यूंचा जसा उलगडा आजवर झालेला नाही, त्याचप्रमाणे ‘इस्रो’मधील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या मृत्यूंचे गूढ आजवर उलगडलेले नाही. सुरेश कुमार यांच्या मृत्यूने या साखळीत भारताच्या आणखी एका ‘ज्ञानऋषी’ची भर पडली आहे.
 
 
माहिती अधिकार कार्यकर्ते कोठारी यांनी, ‘इस्रो’मधील गोपनीयतेचा भंग होण्याची शक्यता लक्षात घेता, या संस्थेत काम करत असताना मृत्यू झालेल्यांची नावे नव्हे, तर केवळ या अभ्यासकांच्या मृत्यूची कारणे मागितली होती. पण, ती सांगण्यासही संस्थेने नकार दिला आहे. संस्थेतर्फे जी माहिती कोठारींच्या हाती लागली त्यानुसार गेल्या 15 वर्षांत ‘इस्रो’ आणि संबंधित संस्थांमधील 197 कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या असून, 1733 कर्मचारी विविध आजारांनी देवाघरी गेले. बहुतांश सरकारी कार्यालयांमध्ये त्यांच्या कर्मचार्‍यांच्या मृत्यूची कारणे नोंदविलेली असतात. पण, ‘इस्रो’कडे त्यांच्या कर्मचार्‍यांच्या मृत्यूची कारणे कशी नाहीत, याबाबत कोठारींनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे यामागे काही काळेबेरे तर नसावे, अशी शंका घ्यायला पुरेसा वाव आहे.
 
 
कोठारींनी, ‘इस्रो’द्वारे अवकाशात पाठविण्यात आलेल्या यशस्वी उपग्रहांच्या उड्‌डाणांची आणि त्यावर झालेल्या खर्चाचीही मागणी केली होती. त्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांना 29 उड्‌डाणांची माहिती देऊन, त्यावर 14 हजार 160 कोटींचा खर्च झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये किती उड्‌डाणांमध्ये अपयश आले, याचा उल्लेख नाही. त्यामुळे उड्‌डाणांच्या अपयशाची कारणे आणि त्याच्याशी संबंधित लोकांचा शोध घेण्यात अपयश येत आहे. त्यामुळे कोठारींनी आता केंद्रीय माहिती आयोगाकडे धाव घेतली आहे. विशेष म्हणजे या मृत्यूंना आत्महत्या किंवा अज्ञात व्यक्तीने केलेला खून, असे वर्गीकृत केले जाते. पोलिस तपासात मात्र मृत्यूचे कुठलेही कारण नमूद न करता या प्रकरणांच्या फाइल्स बंद करण्यात येतात. कैगा येथील न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या रवी मुळे यांच्या मृत्यूच्या चौकशीत पोलिसांनी केलेल्या हयगयीबद्दल नातेवाईकांनी आक्षेप नोंदविला होता. त्याचप्रमाणे उमा राव यांच्या कुटुंबीयांनी, त्यांच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे पोलिसांनी केलेले निदान मान्य करण्यास नकार दिला होता.
 
 
आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या 15 वर्षांत ‘इस्रो’च्या केंद्रांमध्ये झालेला एकही मृत्यू अणुकिरणांच्या उत्सर्जनामुळे झालेला नाही. यामुळे संशयाचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. आपल्या देशाने संरक्षणाच्या क्षेत्रात घेतलेल्या भरारीमुळे जगातील प्रतिस्पर्ध्यांचेच नव्हे, तर महासत्ता म्हणून गणल्या जाणार्‍या देशांचेही डोळे दीपले आहेत. भारतीय सेना दलांमध्ये मोठमोठी अस्त्रे आणि शस्त्रे दाखल होत असताना, सशस्त्र दले अत्याधुनिक होत असताना, शेजारी देश पाकिस्तान तर गपगार झालेलाच आहे, पण इतर देशांनाही जो संदेश भारताला द्यायचा आहे ते गेलेला आहे.
 
 
1994 मध्ये क्रायोजेनिक प्रकल्पावर काम करणार्‍या ‘इस्रो’च्या एका वैज्ञानिकाला हेरगिरी प्रकरणात अडकवण्याच्या केरळ पोलिस आणि गुप्तचर संस्थेच्या कार्यकलापावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. भारताच्या अंतरिक्ष कार्यक्रमात सीआयए आणत असलेले अडथळेदेखील लपून राहिलेले नाहीत. गुप्तचर संस्थांचे काही अधिकारी सीआयएच्या निर्देशानुसार काम करीत असल्याचेही बोलले जाते. अंतराळ संशोधन क्षेत्रात भारत आंतरराष्ट्रीय क्षेत्रात प्रवेश करता झाला असताना, ‘इस्रो’चा क्रायोजेनिक प्रकल्प रुळावरून घसरविण्याचे प्रयत्न याच सीआयएवादी अधिकार्‍यांकडून झाले होते. भारताचे मंगळयान यशस्वी होणे, एकाच वेळी शंभरावर उपग्रह अवकाशात धाडणे, यामुळे भारताच्या प्रतिस्पर्ध्यांना कापरे भरले नसते तरच नवल. अमेरिकी संस्था अवकाशात उपग्रह पाठविण्यासाठी जे दर आकारतात, त्यापेक्षा निम्मे दर जर ‘इस्रो’ आकारणार असेल, तर जागतिक पातळीवरील किती देशांना याचा धक्का बसेल, याची कल्पनाच न केलेली बरी! त्यामुळे ‘इस्रो’मधील कर्मचार्‍यांच्या हत्येमागची कारणे जगजाहीर व्हायलाच हवीत. तेथील सर्वच मृत्यूंमागे गूढ असेल असे नाही. काही प्रकरणांना वैयक्तिक संघर्षाचे स्वरूप असू शकते, काही आत्महत्या खर्‍याही असू शकतात, पण त्यामुळे सर्वच मृत्यू प्रकरणे दडपली जाऊ नयेत, देशहितासाठी त्यामागील रहस्योद्घाटन व्हायलाच हवे!
 
9922946774