अंगकोर्वत मंदिर

    दिनांक :08-Oct-2019
अवंतिका तामस्कर
 
कंबोडिया देशील प्रसिद्ध अंगकोर्वत मंदिराची वास्तुशैली, मंदिरामध्ये असणारी शिल्पकला, भारतीय वास्तुकलेचा, संस्कृतीचा प्रभाव स्पष्टपणे दर्शविणारी आहे. या मंदिराची रचना, त्याची वास्तुशैली इतकी अप्रतिम आहे, की त्याचे वर्णन शब्दामध्ये करता येणार नाही. ही वास्तू म्हणजे मानवी कल्पनाशक्तीचा परमिंबदू आहे, असे या मंदिराचे वर्णन, अंतोनियो डा मेडलेना नामक एका पोर्तुगीज साधूने केले होते. ख्मेर वास्तुशैलीनुसार रचना केले गेलेले हे मंदिर, जगातील सर्वोत्कृष्ट वास्तुकालांपैकी एक समजले जाते. 

 
 
राजा दुसरे सूर्यवर्मन यांनी ख्मेर साम्राज्याच्या सुवर्णकाळामध्ये, बाराव्या शतकामध्ये या मंदिराचे निर्माण करविले. हे मंदिर, विश्वाचा तथाकथित मध्य बिंदू असणार्‍या, देवदेवतांचे वास्तव्य असलेल्या मेरूपर्वताचे पृथ्वीवरील मूर्त रूप असल्याचे म्हटले जाते. या मंदिराच्या परिसरामध्ये मोठी आवारे आहेत, सुंदर गच्च्या आहेत आणि अतिशय रेखीव वास्तुकला असणार्‍या इमारती आहेत. पण या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे रामायण आणि महाभारतातील अनेक प्रसंग दर्शविणारी शिल्पकला. यामध्ये निरनिराळ्या वेशभूषा, रूपे, हावभाव असणार्‍या देवी देवता, राक्षस, अप्सरा यांच्या हजारो शिल्पांनी मंदिराचा परिसर नटलेला आहे. त्यामुळे या मंदिराची वास्तुशैली जरी ख्मेर पद्धतीची असली, तरी ह्यावर प्रभाव मात्र हिंदू परंपरेचा आहे.
 
 
पण यापेक्षाही भारताचे अंगकोर्वतशी असलेले नाते अजून एका कारणासाठी महत्त्वाचे आहे. ते म्हणजे, हे मंदिर जपण्यासाठी, त्याचे पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी मुख्यत्वे भारतीय पुरातत्त्व विभागाने स्वीकारली. कंबोडियाच्या नागरी युद्धानंतर हे मंदिर दुर्लक्षित झाले होते. परिणामी मंदिराच्या आसपास रान माजले, मंदिराच्या वास्तूची पडझड होऊ लागली. मंदिराची दुरवस्था लक्षात आल्यानंतर त्याकाळी कंबोडियामध्ये नव्याने आलेल्या सरकारने मंदिराचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला.
 
 
यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मदतीचे आवाहनही केले गेले, पण नागरी युद्धानंतरची तेथील परिस्थिती पाहता, मदत मिळणे कठीण होते. त्यानंतर भारताने कंबोडियाची मदतीची विनंती मान्य करून, अंगकोर्वत मंदिराच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक सहा वर्षांचा करार केला. करारानुसार भारत सरकारतर्फे मंदिराच्या पुनरुज्जीवनासाठी आर्थिक मदत देण्यात येऊन या कामाची देखरेख करण्याकरिता भारतीय पुरातत्त्व वेत्त्यांची टीम ही पाठविण्यात आली. या टीमने कंबोडियन मजुरांच्या मदतीने मंदिराच्या पुनरुज्जीवनाचे कार्य सुरू केले. 1993 साली हे कार्य पूर्ण होऊन, अंगकोर्वतचे हे भव्य मंदिर पुनश्च दिमाखात उभे राहिले.