विसर्जनासाठी गेलेल्या दोन सख्या भावांना जलसमाधी

    दिनांक :09-Oct-2019
गोंदिया, 
दुर्गादेवी मूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या दोन सख्या भावांना जलसमाधी मिळाल्याची हृदयविदारक घटना ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी तालुक्यातील बाजारटोला तलावात घडली. अक्षय चितूलाल तेलासे (२१) व आकाश चितूलाल तेलासे (१८) रा. कलारीटोला असे मृतकांची नावे आहेत. 

 
 
कलारीटोला येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने गत २६ वर्षापासून दुर्गा उत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही नऊ दिवस आदिशक्तीचा उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. मंगळवार, ८ ऑक्टोबर रोजी दुर्गामाता मूर्तीचे विसर्जन जवळील बाजारटोला मालगुजारी तलावात करण्यासाठी ढोलताशाच्या गजरात व दुर्गामातेच्या जयजयकाèयात विसर्जन यात्रा काढण्यात आली.या यात्रेत अक्षय व आकाश देखील सहभागी झाले होते. तलावावर दुर्गा मूर्तीची भक्तीभावाने पुजाअर्चना केल्यावर २० युवक मूर्ती घेऊन पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा खोलीचा व आत असलेल्या चिखलाचा अंदाज न आल्याने अक्षय चिखलात रुतल्या गेला व बुडू लागला. ही बाब लक्षात येताच त्याला बाहेर काढून नागरिकांनी गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
 
 
दरम्यान अक्षयचा मृतदेह घरी कलारीटोला येथे आणला असता त्याचा लहान भाऊ आकाश घरी नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांनी बाजारटोला तलावाकडे धाव घेऊन आकाशचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. दरम्यान, बुधवार ९ ऑक्टोबर रोजी रावणवाडी पोलीस व स्थानिक मच्छिमारांनी तलावात शोध घेतला असता आकाशचा मृतदेह तलावातील चिखलात फसलेला आढळला. या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी रावणवाडी पोलिसांनी नोंद केली आहे.