अल्‌ कायदाचा दक्षिण आशिया प्रमुख आसिम उमरचा खात्मा

    दिनांक :09-Oct-2019
- सहा अतिरेक्यांना कंठस्नान
नवी दिल्ली,
अमेरिकेने अफगाणिस्तानातील पर्वतीय भागात केलेल्या हवाई हल्ल्यात अल्‌ कायदाचा दक्षिण आशियातील म्होरक्या आसिम उमर ठार झाला आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचनालयाने ट्विटवर ही माहिती दिली. आसिम उमर हा पाकिस्तानी नागरिक होता. उमरसोबतच अल्‌ कायदाचे सहा दहशतवादीही ठार झाले आहेत. उमर हा भारतात दहशतवादी कारवाया वाढविण्यासाठी प्रयत्नशील होता. त्यामुळे त्याचा खात्मा करणे भारतापुढील मोठे आव्हान होते.
 
 
 
अफगाणमध्ये अमेरिकेने गेल्या महिन्यात संयुक्त मोहीम राबवली होती. त्यात उमर ठार झाला होता. मात्र, त्यावेळी ही माहिती बाहेर आली नव्हती. आता उमर ठार झाल्याच्या माहितीवर अफगाणने शिक्कामोर्तब केले आहे. 2014 मध्ये त्याला भारतीय उपखंडातील अल्‌ कायदाचा म्होरक्या घोषित करण्यात आले होते. त्यामुळे त्याच्यापासून भारताला मोठा धोका निर्माण झाला होता. उमरसोबत जे अतिरेकी ठार झाले, ते सर्वच पाकिस्तानी होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने मूसा काला जिल्ह्यातील तालिबानच्या एका अड्ड्यावर हवाई हल्ला केला होता. ठार झालेल्या सर्व अतिरेक्यांना तालिबानच्याच एका परिसरात दफन करण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले.