दुसर्‍या महायुद्धातील बॉम्ब आता फुटला!

    दिनांक :09-Oct-2019
वर्झावा,
आतापर्यंत जागाने दोन महायुद्धे अनुभवली आहेत. 1914 ते 1918 या कालावधीत पहिले महायुद्ध, तर 1939 ते 1945 या कालावधीत दुसरे महायुद्ध झाले. या महायुद्धाच्या जिवंत खुणा आजही युरोपमध्ये पाहायला मिळतात. मंगळवारी अशीच एक घटना उघडकीस आली. दुसर्‍या महायुद्धात टाकण्यात आलेला बॉम्ब फुटला आणि त्यात दोन सैनिकांना प्राण गमवावे लागले, तर दोन जण गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
 
पोलंडची राजधानी वर्झावानजीक असलेल्या कुरनिया रासिबोर्सका येथील जंगलात एक जिवंत बॉम्ब सापडला. याची माहिती मिळाल्यानंतर पोलंडच्या लष्कराने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बॉम्ब निकामी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या बॉम्बच्या स्फोटात दोन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले, तर यामध्ये दोन जण गंभीररित्या जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलंडचे संरक्षण मंत्री मारिऊस ब्लास्जजाक यांनी दिली. स्थानिक माध्यमांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, तो बॉम्ब दुसर्‍या महायुद्धाच्या कालावधीतील असल्याचे म्हटले जात आहे.
 
 
ज्या ठिकाणी हा बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती, त्या ठिकाणी यापूर्वी काही शस्त्रे आणि बॉम्ब सापडले होते. त्यानंतर ते एका ठिकाणी निकामी करण्यात आले. दुसर्‍या महायुद्धात अन्य राष्ट्राकडून टाकण्यात आलेले बॉम्ब युरोपियन देशांमध्ये सापडतात.