विजयादशमीला पहिले राफेल लढाऊ विमान दाखल

    दिनांक :09-Oct-2019
- संरक्षणमंत्री राजनाथिंसह यांनी घेतली भरारी
पॅरिस,
गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेले राफेल लढाऊ विमान मंगळवारी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर भारतीय हवाई दलाच्या स्वाधीन करण्यात आले. स्वत: संरक्षण मंत्री राजनाथिंसह यांनी, या विमानातून भरारी घेतली. तत्पूर्वी, राजनाथिंसह यांनी या विमानावर ॐ काढून आणि नारळ व फूल वाहून पूजा केली. भारतीय हवाई दलासाठी मंगळवारचा दिवस ऐतिहासिक असाच ठरला. राफेल विमानामुळे हवाई दलाची ताकद कितीतरी पटीने वाढणार आहे. भारत आणि फ्रान्समध्ये 2016 मध्ये 36 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत करार झाला होता. उर्व सर्व विमाने 2022 पर्यंत भारताला मिळणार आहेत.
 

 
 
फ्रान्सच्या वायव्येकडील मेरिनॅक येथील दसॉं एव्हीएशन तळावर हे विमान राजनाथिंसह यांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले हेदेखील उपस्थित होते. यानंतर राजनाथिंसह यांनी विजयादशमीचे औचित्य साधून शस्त्रपूजेची औपचारिकता पूर्ण केली. या नव्या लढाऊ विमानातून भरारी घेण्याचे भाग्य मला लाभले. हा माझा फार मोठा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया िंसह यांनी व्यक्त केली. राफेल हे दोन इंजिन असलेले लढाऊ विमान आहे. यात मेटॉर आणि स्काल्प ही दोन कू्रझ क्षेपणास्त्र असल्यामुळे हवेतून हवेत दूरवर आणि अचूक मारा करण्याची अद्‌भूत क्षमता आहे.
 
 
या विमानाची गती ताशी 2223 किलोमीटर असून, ते एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकते. याची इंधन क्षमता 17 हजार लिटर आहे. राफेल विमान सर्वच हवामानात एकाच वेळी अनेक उद्दिष्ट पूर्ण करण्यास सक्षम आहे. यात असलेले स्काल्प क्षेपणास्त्र हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. राफेलची मारक क्षमता 3700 किलोमीटरपर्यंतची, तर स्काल्पची मारक क्षमता 300 किलोमीटर आहे. हे विमान जहाजभेदी हल्ल्यापासून तर अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत अव्वल आहे. राफेल विमान 24,500 किलोपर्यंत वजन वाहून नेऊ शकते आणि 60 तासांचे अतिरिक्त उड्डाणही करू शकते.