गुलाम काश्मिरातील स्थलांतरितांसाठी ऐतिहासिक निर्णय

    दिनांक :09-Oct-2019
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली,
गुलाम काश्मिरातून स्थलांतरित होऊन जम्मू-काश्मीर वा देशाच्या अन्य भागात आश्रय घेतलेल्या कुटुंबांना प्रत्येकी साडेपाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने आज बुधवारी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नंतर एका पत्रपरिषदेत माहिती आणि प्रसारण, तसेच वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निर्णयांची माहिती दिली.
 

 
 
गुलाम काश्मिरातून स्थलांतरित झालेल्या 5300 कुटुंबांनी जम्मू-काश्मीर आणि देशाच्या अन्य भागात आश्रय घेतला होता. मात्र, या लोकांची कोणतीही दखल आतापर्यंतच्या सरकारांनी घेतली नाही. त्यामुळे त्यांना अतिशय हालअपेष्टात राहावे लागले. या चुकीची दुरुस्ती म्हणून अशा कुटुंबांना साडेपाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारने घेतला असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
 
 
 
गुलाम काश्मिरातून स्थलांतरित होऊन आधी देशाच्या अन्य भागात आश्रय घेतलेल्या, तसेच नंतर जम्मू-काश्मिरात आलेल्या 5300 कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या आश्रय घेतलेल्या कुटुंबांसाठी मोदी सरकारने 2016 मध्ये अशीच एक योजना जाहीर केली होती. मात्र, त्यावेळी या योजनेचा लाभ या कुटुंबांना मिळाला नव्हता, कारण, त्यावेळी ही कुटुंबे जम्मू-काश्मिरात नव्हती, दुसर्‍या राज्यात होती, त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता, असे स्पष्ट करत जावडेकर म्हणाले की, त्यांच्यासाठी आज ही योजना जाहीर करण्यात आली. या योजनेतून अशा कुटुंबांना एकरकमी साडेपाच लाखाची आर्थिक मदत केली जाणार आहे. अशा लोकांवरील अन्याय या योजनेमुळे दूर होणार आहे. जम्मू-काश्मिरात अशा प्रकारच्या स्थलांतरिताचे वेगवेगळे समूह आहेत, काही 1947 मध्ये आले, तर काही जम्मू-काश्मीरच्या विलयानंतर आले, सरकारच्या आजच्या निर्णयामुळे आता मात्र सर्वांनाच न्याय मिळाला आहे, असे ते म्हणाले.