"राहुल गांधींनी काँग्रेसला वार्‍यावर सोडले"

    दिनांक :09-Oct-2019
तभा ऑनलाईन टीम 
नवी दिल्ली,
देशातील वातावरण बदलले असताना, राहुल गांधी यांचे पक्षाला वार्‍यावर सोडून जाणे, काँग्रेससाठी एक मोठी समस्या आहे, राहुल गांधीच्या राजीनाम्याने मी दु:खी आहे, मला अतिशय वेदना होत आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे. 

 
 
अनेक मोठमोठ्या शानदार नेत्यांचा काँग्रेस हा कधीकाळी शानदार पक्ष होता, पण आज त्याची अशी अवस्था का झाली, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, याकडे लक्ष वेधत खुर्शीद म्हणाले की, देश बदलला आहे, देशाची विचार करण्याची पद्धत बदलली आहे, त्यामुळे त्याची जाणीव ठेवत आम्ही स्वत:मध्ये बदल केला, तरच कॉंग्रस पक्ष या परिस्थितीतून बाहेर येऊ शकेल. एका पत्रपरिषदेत खुर्शीद यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला चांगल्याच कानपिचक्या दिल्या. राहुल गांधी यांनी पक्षाला वार्‍यावर सोडले, असा त्यांचा रोख होता.
 
आम्ही स्वत:ला एवढे संकुचित करून टाकले की, देश आणि देशाच्या विचारात कोणते परिवर्तन आले, त्याची दखल घेण्याचे भानही आम्हाला राहिले नाही, असे स्पष्ट करत खुर्शीद म्हणाले की, देशाच्या बदलत्या वातावरणाची दखल आम्ही घेतली, तर काँग्रेस पक्षाला पुन्हा त्याचे जुने दिवस परत येऊ शकतात, असा माझा विश्वास आहे. राहुल गांधी यांनी आम्हाला सोडले, या शब्दांत त्यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा उल्लेख करत खुर्शीद म्हणाले की, आमचे नेता राहुल गांधी आम्हाला सोडून गेले, मात्र, ते अध्यक्ष नसले, तरी ते आमचे नेते आहेत आणि पुढेही नेते राहतील.
  
वारंवार निवडणुका हारल्यानंतरही कोणत्याही नेत्यासोबत कार्यकर्ते राहात नाही, मात्र राहुल गांधी जगातील एकमेव असे नेते आहेत, ज्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने निवडणूक हरल्यानंतरही नेते आणि कार्यकर्त्यांचा त्यांच्यावरील विश्वास कमी झाला नाही. मात्र, आता काय करायचे याचा निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे. त्यांच्या निर्णयावरच पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे, असे ते म्हणाले. पक्षाकडून खूप काही घेऊन पक्ष संकटात असताना त्याला सोडून जाणार्‍या नेत्यांवर हल्ला चढवत खुर्शीद म्हणाले की, काहीही झाले तरी मी पक्ष सोडणार नाही. मी त्या लोकांपैकी नाही, ज्यांनी पक्षाकडून खूप काही घेतले आणि पक्ष अडचणीत असताना स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी पक्ष सोडला. 
 
काँग्रेसला आजवर अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, मात्र कोणत्याही आव्हानापासून काँग्रेसने कधी पळ काढला नाही, याकडे लक्ष वेधत खुर्शीद म्हणाले की, मात्र आता जनतेत बदलाचे संकेत मिळत आहे. अर्थव्यवस्था आणि रोजगाराच्या मुद्यावरून सरकारबद्दल जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे, त्यामुळे काँग्रेसने या मुद्यावर आक्रमक झाले पाहिजे. हे मुद्दे घेऊन जनतेकडे गेले तर जनतेचा प्रतिसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही.