इम्रान खान यांना ‘चायनीज’ धक्का

    दिनांक :09-Oct-2019
बीजिंग,
काश्मीरचे तुणतुणे वाजविण्यासाठी मोठ्या अपेक्षेने चीनच्या दौर्‍यावर दाखल झालेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आलेली आहे. काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असल्याने, दोन्ही देशांनी तो आपसात चर्चा करूनच सोडवायला हवा, असे चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
 
 
 
विशेष म्हणजे, भारत सरकारने कलम 370 निष्प्रभ केल्यानंतर चीनने अलिकडील काळात, या मुद्यावर संयुक्त राष्ट्र आणि सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार तोडगा काढण्यात यावा, अशी भूमिका घेतली होती. आज मात्र, या देशाने हा मुद्दा द्विपक्षीय असल्याचे सांगून, इम्रान खान यांची मोठी निराशच केली आहे. पाकिस्तान आणि चीन हे अतिशय घनिष्ट मित्र आहेत आणि ही मैत्री अतूट आहे. मात्र भारतही आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा देश असल्याने, त्यांच्या द्विपक्षीय मुद्यांमध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, असे चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते जेंग शुआंग यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले.
 
 
भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध आता नव्या उंचीवर पोहोचले आहेत. दोन्ही देश अतिशय झपाट्याने आर्थिक प्रगती करीत असून, सहकार्यही वाढले आहे. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत आणि जे काही असतील, त्यावर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी दोन्ही देश सक्षम आहे. पाकिस्तानलाही आम्ही हाच संदेश देत आहोत. प्रत्येक द्विपक्षीय मुद्दा हा त्याच पातळीवर सुटायला हवा, असे त्यांनी सांगितले.