काश्मिरींना स्वयंनिर्णयाचा हक्क हा संयुक्त राष्ट्राचा अजेंडा नव्हताच

    दिनांक :01-Nov-2019
भारताची रोखठोक भूमिका
 
संयुक्त राष्ट्रसंघ,
जम्मू-काश्मीरातील नागरिकांना स्वयंनिर्णयाचा मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या अजेंड्यावर आजवर कधीच नव्हता. काश्मीर हे पूर्णपणे भारताचेच आहे आणि तिथे वास्तव्य करणारे नागरिक हे भारतीय आहेत. दुसर्‍यांच्या भूमीवर डोळा ठेवून, आपली प्रांतीय भूक भागविण्याकरिताच पाकिस्तान सातत्याने काश्मीरचे तुणतुणे वाजवत असतो, अशी रोखठोक भूमिका भारताने संयुक्त राष्ट्रसंघात मांडली.
 

 
 
संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या मावळत्या राजदूत मलीहा लोधी यांनी आम सभा समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क आयोगाने काश्मिरींना स्वयंनिर्णयाचा हक्क प्रदान करण्याचे वचन एका ठरावातून दिले होते, त्या वचनाची अद्याप पूर्तता झालेली नाही, असे लोधी म्हणाल्या.
त्यांचा समाचार घेताना भारताच्या येथील स्थायी प्रतिनिधी पौलोमी त्रिपाठी म्हणाल्या, काश्मिरींना स्वयंनिर्णयाचा हक्क देणारा कोणताही मुद्दा मानवी हक्क परिषदेच्या अजेंड्यावर कधीच नव्हता. काश्मीर हे भारताचे अंग आहे, ही माहिती असतानाही पाकिस्तान अशा प्रकारची दिशाभूल करीत आहे. जगाच्या पाठीवरील कोणताही देश किंवा जागतिक मंडळ यात हस्तक्षेप करू शकत नाही.
आमच्या शेजारील देशाला दुसर्‍याच्या भूमीची भूक आहे आणि ती भूमी बळकावण्यासाठी तो देश कुठल्याही थराला जाऊ शकतो. वास्तविकता हीच आहे की, संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार करारात काश्मिरींच्या स्वयंनिर्णयाचा मुद्दा कधीच नव्हता. ते भारतीय नागरिक आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जोड