स्त्री-पुरुष मैत्री काळाची गरज, पण...

    दिनांक :01-Nov-2019
निर्मला गांधी
 
आज स्त्रीने स्वकृर्तत्वावर प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने मानाने स्थान मिळविले आहे. स्त्रियांना सरकारकडून मिळणारे वेगवेगळे फायदे, सवलती, स्त्री-पुरुष समानता, स्त्री स्वातंत्र (म्हणजे स्वैराचार नव्हे), त्याचप्रमाणे स्त्रियांनी घेतलेली मेहनत, यामुळे स्त्रीला कुणीही कमी लेखत नाही. ती अबला नसून सबला आहे. तिचा आत्मविश्वास वाढला आहे.
 
 
स्त्री-पुरुष सर्वच क्षेत्रात एकत्र काम करतात. त्यामुळे स्वाभाविकपणे बोलणे, एकमेकांना मदत करणे, क्वचित प्रसंगी लिफ्ट देणे वगैरे सहजपणे घडते. समाजाला, कुटुंबाला त्याची सवय झालेली आहे, त्यात वावगे वाटत नाही. एकत्र काम करणे काळाची गरज झालेली आहे. परंतु, सततच्या सहवासाने एखाद्या व्यक्तीविषयी विशेष आकर्षण वाटायला लागते. स्त्री-पुरुष आकर्षण नैसर्गिक प्रक्रिया आहे. विश्वामित्राला मेनका, इंद्राला अहल्या, अनेक लोकांनी ज्यांना गुरू केले, मंत्र घेतला ते आसाराम बापू. रोज पेपरमध्ये अशा बातम्या येतात. कधीकधी स्त्री हतबल असते, तर कधी बदनामीची धमकी देऊन पुन:पुन्हा तिचा फायदा घेतात. त्यासाठी मैत्री करताना सावध असावे. त्याचा उद्देश लक्षात घेता, त्याला लांब सारावे. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घ्यावी. 

 
 
 
प्रत्यक्ष मैत्री म्हणजे काय? आम्हाला स्त्रीची स्त्रीशी व पुरुषाची पुरुषाबरोबर मैत्री माहीत आहे. कृष्ण-सुदामा सुर्वश्रुत आहे. मुली मुलीशी मैत्री करतात. एकमेकींशी सखीप्रमाणे वागतात. मनातील गोष्ट मोकळेपणाने एकमेकींंना सांगतात.
आपल्याकडे दीर-भावजय, नणंद-भावोजी, सासू-सासरे, आई-बाबा, काका-काकू वगैरे नात्याची समृद्धी असताना मॅडम, मिस्‌ का म्हणायचे? नात्यामधे संबंध, मर्यादा आपोआप सांभाळली जाते. लक्ष्मण-सीता 14 वर्षे वनवासात होते, परंतु त्यांच्या नात्याविषयी कुणीही संशय घेतला नाही. पूर्वीसुद्धा शेतात, बांधकाम करताना, लढाईवर स्त्री-पुरुष एकत्र काम करीत. आज परिचारिका स्त्रीच असते व पेशंट म्हणून माणसांची सेवा करते. परंतु, संबोधन भाऊ, दादा, मामा. आजकाल क्वचित सर म्हणतात.
 
 
खरे म्हणजे स्त्री-पुरुष मैत्री ही आमची संस्कृती नाही. ही पाश्चिमात्य पद्धत, मॅडम वगैरे त्यांचे शब्द. तिकडे कुटुंबपद्धती नाही. नात्यांची घट्ट वीण नाही. कुटुंबपद्धती ही भारताची शान, मान आहे. तिकडे मुले 18 वर्षांची होताच वेगळी राहतात. सावत्र बहीण-भाऊ पती-पत्नीप्रमाणे वागतात. आपल्याकडील बरेच लोक पाश्चिमात्य पद्धतीप्रमाणे एखादी मैत्रीण शोधतात. तिच्यासोबत राहतात. भारतातील लग्न होऊन गेलेल्या मुलीला हे भावत नाही. स्त्री-पुरुष नात्याच्या संस्कृतीत आम्ही राहात आहोत. स्त्री-पुरुषांचे एकत्र काम करणे आम्हाला मान्य, परंतु एका मर्यादेपलीकडे वागणे आमच्या मनाला भावत नाही.
 
 
जागतिक मैत्री दिन युवा-युवती मोठ्या उत्साहाने साजरा करतात. दुसर्‍या दिवशी हॉटेलमध्ये अनेक युवा-युवतींना अटक, असा मथळा दिसतो. दुसर्‍या दिवशी अनेक तरुण-तरुणी बेहोश अवस्थेत नको त्या स्थितीत दिसतात. यालाच मैत्री दिन, मैत्री म्हणायचे काय? आजकाल रक्षाबंधनापेक्षा मैत्री दिन मोठ्या थाटात साजरा होतो. मोदींनी तलाकवर कायद्याने बंदी आणून मुसलमान स्त्रियांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करून दिले. त्यांनी मैत्री बॅण्ड न पाठवता राखीपौर्णिमेला राखी पाठविली. ही आमच्या देशाची संस्कृती.
 
 
स्त्री-पुरुष मैत्रीचा जास्त परिणाम कुटुंबावर होतो. दुसर्‍या स्त्री-पुरुषाशी मैत्री करणे, त्याला प्रेझेण्ट देणे, नेहमी फिरायला व हॉटेलमध्ये जाणे, यामुळे कुटुंबात नाराजी, वादावादी होते. विशेषतः आई-वडिलांच्या सतत भांडणामुळे लहान मुले गोंधळून जातात. कधीकधी भांडणांतून घटस्फोट झाल्यास खूपदा मुलांची पाठवणी होस्टेल अथवा आश्रमात होते. तरुण मुले हे प्रकार बघून आईच्या िंकवा वडिलांच्या मित्राचा-मैत्रिणीचा खून करतात. स्वतः व्यसनांत गुंतवून घेतात िंकवा कधीकधी तेपण आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवतात. या मैत्रीचा अतिरेक केल्यास कुटुंबाला, वडीलधार्‍यांना, कधीकधी समाजाला मानसिक त्रास होतो.
 
 
खूपदा, मैत्रीत खूप जवळीक झाली आणि दोघांपैकी एकाने दुसर्‍याच्या मताप्रमाणे वागले नाही, तर अंगावर ऑसिड फेकणे, खून करणे, ब्लॅकमेल करून पैसे लुबाडणे वगैरे घटना दोन्हीकडून घडतात. स्त्रीपेक्षा पुरुषांना नकार सहन होत नाही. पुरुषांचा स्वभाव 370 कलमाप्रमाणे आहे. त्याच्या पुरुषत्वाला ठेच पोहोचते.
 
 
आज शाळा, कॉलेज, ट्युशन क्लासमध्ये मुले-मुली एकत्र दिसतात. ते स्वाभाविक आहे. आम्हालाही त्यात वावगे वाटत नाही. परंतु, मैत्रीच्या नावाखाली सतत एकमेकांना स्पर्श करणे, कामाकडे, संसाराकडे दुर्लक्ष यामुळे मैत्रीची चीड येते. मुलं-मुली शिकवणीचा क्लास झाल्यावर, तासन्‌तास अंधाराचा आडोसा घेऊन गप्पा मारतात. जे बोलायचे ते उजेडात बोला. अंधारात कृष्णकृत्यं होतात.
 
 
सध्या मोबाईलचे युग आहे. त्यावर एक मेसेज येतो- ‘आप अकेले हो? हमसे मैत्री करो!’ खूप जण मजा, गंमत म्हणून त्याला प्रतिसाद देतात. प्रथम आदरणीय भाषेत बोलणारे एकेरीवर केव्हा येतात कळतच नाही. आपल्याला मैत्रीची भुरळ पडते. सहजपणे आपण त्याला बँकेचा अकाऊंट नंबर देतो, तर कधी लग्न करून मोकळे होतो. आपल्या पैशावर त्याचा डोळा असतो िंकवा इतर दृष्टीने आपण फसलो आहोत हे लक्षात येते. परंतु, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तेव्हा स्त्री-पुरुष मैत्रीत नेहमी सावधता हवी. समोरच्या व्यक्तीचे वागणे-बोलणे समजले पाहिजे. कधीकधी अशी मैत्री ‘आ बैल मुझे मार!’प्रमाणे वाटते.
आपली मानसिकता अशी आहे की, स्त्री-पुरुष एकत्र राहतात, बोलतात, हसतात म्हणजे त्यांच्यात काहीतरी काळंबेरं आहे. निखळ मैत्री एखादीच. परंतु, सर्वांना आपण एकाच तराजूत तोलतो.
 
 
म्हणूनच स्त्री-पुरुष मैत्री काळाची गरज असली, तरी आदराने मर्यादेत वागावे. विस्तवाजवळ लोणी म्हणजे वितळणारच. स्त्रीची अब्रू काचेप्रमाणे असते. तडकली तर पुन्हा नीट जुळत नाही. कुठंतरी खूण दिसतेच. स्त्रीच्या चारित्र्याला भारतात अनमोल महत्त्व आहे. मैत्रीमुळे, भारताचे ब्रीदवाक्य ‘वसुधैव कुटुंबकम्‌’ याला धक्का लागू नये...
9112275284