अबु इब्राहिम इसिसचा नवा म्होरक्या

    दिनांक :01-Nov-2019
- बगदादी ठार झाल्याची कबुली
बैरूत,
अमेरिकेच्या विशेष कमांडोंनी घेरल्यानंतर अबु बक्र अल्‌ बगदादीने आत्मघाती स्फोट घडवून तीन मुलांसह स्वत:लाही संपविले, अशी कबुली इसिसने दिली आहे. सोबतच, या संघटनेची सूत्रे आता अबु इब्राहिम अल्‌ हाशमी अल्‌ कुरेशीकडे सोपविण्यात आली आहेत, असेही या इसिसतर्फे जाहीर करण्यात आले आहे. बगदादीच्या मृत्यूचा आम्हाला फार मोठा धक्का बसला, असे इसिसचा प्रवक्ता अबु हमजा अल्‌-कुरेशीने एका ऑडिओ संदेशात सांगितले.
 
 
 
सीरियाच्या वायव्येकडील इडलिब प्रांतातील एका गुहेत बगदादी आपल्या तीन मुलांसह लपून बसला असताना, अमेरिकेच्या कमांडो पथकाने त्याला घेरले. आपला मृत्यू अटळ असल्याचे ओळखून त्याने आत्मघाती स्फोट घडविला होता. यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर लगेच अमेरिकेने इसिसच्या एका गुप्त अड्ड्यावर केलेल्या हल्ल्यात इसिसचा दुसर्‍या क्रमांकाचा नेता अबु हसन अल्‌ मुजाहिरही ठार झाला. मुजाहिर हा इसिसचा प्रवक्ता होता, असे या सात मिनिटांच्या ऑडिओ टेपमध्ये म्हटले आहे. बगदादी ठार झाल्याच्या वृत्ताची पुष्टी झाल्यानंतर आम्ही कुरेशीला आमचा प्रमुख बनविले आहे. तसेच मुजाहिरची जागा आता कुरेशीने घेतली, असेही यात नमूद आहे.
 
 
अमेरिकेला धमकी
या टेपमधून इसिसने अमेरिकेलाही धमकी दिली आहे. बगदादी कुत्र्यासारखा मेला, असे आनंदाने जाहीर करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गोंधळलेले वृद्ध व्यक्ती आहेत. बगदादीच्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याच्या मृत्यूवर अमेरिकेने इतके खुश होण्याची गरज नाही, आम्ही आता तुमचा आनंद हिरावून घेणार आहोत, असे कुरेशीने यात म्हटले आहे.