पाहुणचारानं भारावला अक्षय कुमार

    दिनांक :01-Nov-2019
मुंबई,
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे आपल्या मुलांना द्यायला पुरेसा वेळ मिळत नसला तरी अक्षय कुमार मात्र याला अपवाद ठरलाय. धाकटी मुलगी नितारा हिच्यासोबत मॉर्निंग वॉकला गेलेल्या अक्षयनं त्याच्यासोबत घडलेला एक सुंदर किस्सा सोशल मीडियावर फॅन्ससोबत शेअर केला आहे.

अक्षय कुमारनं त्याचा आणि निताराचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. अक्षय लिहितो, ' आजचा मॉर्निंग वॉक माझ्या चिमुकलीसाठी आयुष्यातील एक सुंदर शिकवण देणारा ठरला. आम्ही एका वृद्ध जोडप्याच्या घरात घोटभर पाणी पिण्यासाठी थांबलो आणि त्या भल्या, उदार दाम्पत्यानं आम्हाला केवळ पाणीच दिलं नाही तर प्रेमानं अतिशय रुचकर अशी गुळ आणि पोळीदेखील आग्रहानं खाऊ घातली. खरोखर, दयाळूपणे वागण्याचे तुम्ही मोल लावू शकत नाही, परंतु ती खरी श्रीमंती असते' असं म्हणत त्यानं या वृद्ध जोडप्यासोबत काढलेला फोटोही शेअर केला आहे. अक्षयनं हा फोटो शेअर करताच त्याच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू केला. 'सुपरस्टार असूनदेखील अक्षयचे पाय आजही जमिनीवर आहेत' असं म्हणत अनेकांनी त्याचं कौतुक केलं तर 'नितारासाठी एक वडिल म्हणून तू उत्तम आदर्श घालून देत आहेस' अशी शाबासकीदेखील त्याला अनेकांनी दिली आहे.
दरम्यान, अक्षयचा 'हाउसफुल-४' सध्या सुपरहिट ठरतोय. सहा दिवसांत हाऊसफुल-४नं जवळपास १२४ कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडिया. कॉमनं दिलेल्या अहवालानुसार चित्रपटानं फक्त सहा दिवसांत १०० कोटींचा आकडा पार केला आहे. आणखी एका आठवड्यात चित्रपट १३५ कोटी कमाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सिनेमानं १८.५० कोटींचा गल्ला जमावला होता. दिवाळीच्या सुट्ट्या आणि विकेंड यामुळं चित्रपटाला अधिक फायदा झाला. रविवारच्या तुलनेत सोमवारी चित्रपटानं अधिक कमाई केली आहे. सोमवारी ३४.२५ कोटींची रेकॉर्ड कमाई केलीय. सोमवारी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये हाऊसफुल-४ तिसऱ्या क्रमाकांवर आहे.