भावेश झा याची कहाणी ऐकून अमिताभ भावुक

    दिनांक :01-Nov-2019
सध्या मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा शो 'कौन बनेगा करोडपती'चा छोट्या पडद्यावर बोलबाला आहे. या शोला दर्शकांची मोठी पसंती मिळत आहे. टीआरपीच्या चार्टमध्येही या शोने टॉप-५ मध्ये स्थान मिळवले आहे. या वेळी खेळ खेळताना बिग बी आपल्या आगळ्या शैलीत समोर बसलेल्या स्पर्धकाला खुलवण्याचे काम करतात. अशाच एका संवादात स्पर्धकाचा किस्सा ऐकल्यानंतर हा अभिनयाचा शहेनशाह भावुक झाला.

 
त्याचे झाले असे, गुरुवारच्या 'कौन बनेगा करोडपती' शोच्या भागात हॉटसीटवर आला नोए़डाचा भावेशकुमार झा. भावेश खूपच चांगला खेळला. मात्र, २५ लाखांच्या प्रश्नावर भावेशने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. भावेश या खेळातून १२ लाख ५० हजार रुपये घेऊन घरी परतला.
हा खेळ खेळत असताना भावेशने अमिताभ बच्चन यांच्याशी एक अतिशय भावुक गोष्टही शेअर केली. यासाठी त्याने अमिताभ यांचे आभारही मानले. भावेशने सांगितले की, त्याचे वडील खूपच आजारी असायचे. त्यांची स्थिती अत्यंत नाजूक झाली होती. ते कुणाला ओळखत देखील नव्हते अशा अवस्थेत होते. परंतु, जेव्हा अमिताभ बच्चन यांना टीव्हीवर नमस्कार करताना ते पाहायचे तेव्हा ते प्रतिसाद अमिताभ यांना द्यायचे. भावेशकुमारसाठी ही अत्यंत मोठी आणि दिलासा देणारी गोष्ट होती. भावेशकुमार याची ही कथा ऐकून महानायक अमिताभ बच्चन देखील भावुक झाले.भावेशकुमार झा हा स्पर्धक गेल्यानंतर फास्टेट फिंगर फर्स्ट जिंकून उत्तर प्रदेशातील हवालदार नरेंद्र कुमार हे हॉटसीटवर बसले.