शुभस्य शीघ्रम...

    दिनांक :01-Nov-2019
डॉ. अपेक्षा तारे
हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी।
छाव है कभी कभी है धूप जिंदगी।
हरपल यहाँ जी भर जियो।
जो है समा कल हो न हो।।
 
जीवनाचं सार सांगणार्‍या, आयुष्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव करून देणार्‍या या चार ओळी किती सुंदर, किती यथार्थ आहेत, नाही का? ‘इकिगाई’ तरी आणखी वेगळं काय सुचवते? ‘इकिगाई’ हा शब्द जपानी भाषेतला. जीवनात आनंद आणण्याची कला असा त्याचा साधा, सरळ, सोपा अर्थ. जीवनाचं सारं सांगणारा तो शब्द आहे, एक शास्त्र आहे. म्हटलं तर अवघड, पण मनःपूर्वक स्वीकारलं तर सोपं. कळायला सोप जरी असलं, तरी अंगवळणी पडायला जरा कठीणच. 

 
 
मला आठवतोय तो लहानपणीचा एक छोटासा, फार महत्त्वाचा न वाटणारा प्रसंग. माझ्या मैत्रिणीच्या वडिलांनी चारचाकी विकत घेतल्याची बातमी तिसर्‍याच मैत्रिणीकडून माझ्यापर्यंत आली आणि ती बातमी खूपच आनंदाने मी माझ्या वडिलांना सांगितली. त्यावर ते म्हणाले, असाच दुसर्‍याचा आनंद आपल्याला आनंद मानता आला पाहिजे. नकळत जीवनातला महत्त्वाचा धडा ते देऊन गेले अन्‌ तो फार महत्त्वाचं न वाटणारा प्रसंग माझ्यासाठी महत्त्वाचा बनला.
 
 
त्या दिवशी बेडरूमच्या खिडकीवर पक्ष्यांचं एक जोडपं बसलं होतं. जोडी म्हणून या हवं तर. शेजारी-शेजारी बसले होते ते, पण एकाचं तोंड मात्र दुसरीकडे होतं. चोच घट्ट मिटलेली अन्‌ मान वळवलेली. दुसरा पक्षी मात्र चोच हलवत या पक्ष्याकडे बघत होता आणि पुन्हा मान वळवून दुसरीकडेच बघत होता. इतकी गंमत वाटत होती ना! पहिल्याचं रुसणं, दुसर्‍याचं जाणीवपूर्वक केलेलं दुर्लक्ष. बराच वेळ हा खेळ चालू होता. एका क्षणी पक्षी दुसरीकडे कुठेतरी उडून गेेला. तर हा दुसराही त्याच्या मागोमाग उडालाच. नक्कीच मादी आणि नर असणार! पण, त्यांचं ते रुसणं, समजूत काढणं इतकं सुंदर आणि निरागस होतं, ते पाहून इतकी मजा वाटली की, दिवसभर जो भेटेल त्याला हे सर्व मी वर्णन करून सांगत होते आणि त्या आनंदी क्षणांचा पुन:पुन्हा आनंद घेत होते. अनुभव घेत होते. क्षण छोटाच, परंतु माझा संपूर्ण दिवस आनंदाने भरून गेला.
 
 
अशा निरागस, निर्भेळ आनंदाचं मोल करताच येत नाही आणि तो मोल देऊन विकतसुद्धा घेता येत नाही. एखादी वस्तू विकत घेतली, छोटा टीव्ही बदलून मोठा टीव्ही घेतला, सुंदर, आवडता दागिना मिळाला, छानसा ड्रेस घालून मिरवायला मिळालं म्हणूनही आनंद होतोच. परंतु, तो हळूहळू कमी कमी होत जातो. त्यातलं नावीन्य, त्याची तीव्रता काही क्षणानंतर उतरणीला लागते. कारण अशा प्रकारचे आनंद मोल देऊन, िंकमत मोजून आपण अनुभवलेले असतात.
 
 
आमचे एक शेजारी आहेत. गुलाबप्रेमी! नुसतेच प्रेमी नाहीत तर घराच्या गच्चीवर त्यांनी गुलाबाचा मिनी (?) बगिचाच फुलवला आहे. मिनी म्हणजे 100-125 झाडं हं! काय एकेक सुरेख मनमोहक रंग आहेत! रंगांची नुसती उधळण, लाल, पिवळा, पांढरा अगदी तानापिहिनिपाजा! रंग मनात आणा आणि तो इथे सापडणार नाही असं होणारच नाही आणि फुलांचा आकार तरी केवढा! तळहात झाकून जाईल एवढा. ते पुष्पवैभव आपल्याला स्तिमित करतं. वर्णनासाठी शब्द शोधण्याचं भानच राहात नाही. निसर्गाची कमाल आणि यांचे कष्ट यांची सांगड निव्वळ कौतुकास्पद. ती रंगांची उधळण, तो हलकासा गंध मन सुगंधित करून जातो. त्या कुटुंबाने त्यांचा आनंद गुलाबमय करून टाकला आहे आणि आमचे प्रत्येक सण साजरे होतात ते यांच्या बागेतल्या गुलाबांनीच. देण्यातही आनंद आणि घेण्यातही आनंद. आनंंदाचे डोही आनंदतरंग.
 
 
आमची एक मैत्रीण. स्वतः फुलं तोडेल, गजरे करेल आणि आम्हाला केसांत माळायला लावेल आणि आमच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून स्वतः आनंदी होईल.
 
 
सकाळच्या हास्य क्लबमधील मैत्रिणींचा सहवास, एकमेकींच्या सहवासात घालवलेला तो तास-दीड तास, व्यायाम, गप्पाटप्पा, कधीमधी एखाद्या पदार्थाचा घेतलेला आस्वाद, साधेपणाने साजरे होणारे वाढदिवस... सारेकाही दिवसभराच्या उर्जेचा स्रोेतच. अगदी अकृत्रिम, निर्भेळ आणि विनामूल्य. गैरहजर असणारीची टिंगलटवाळी ,गॉसिपिंग नाही, हा अलिखित नियम.
 
 
परवाच एका लेखिकेचा अनुभव वाचण्यात आला. ही लेखिका परगावला व्याख्यान देण्यासाठी गेली होती. अचानक हॉटेलच्या रूमच्या दारावर टकटक झाली. दरवाजा उघडून बघते तो समोर एक साठीची बाई हातात पिशव्या घेऊन, धापा टाकत तरीही हसतमुखाने उभी. आत येऊन लेखिकेच्या हातांत त्या पिशव्या सोपवताना तिच्या चेहर्‍यावर तृप्त आनंद झळकत होता. ओळख नसलेल्या, परंतु फक्त नावाने ओळखणार्‍या या साहित्यिकेसाठी तिने स्वतः बनवून लोणची, पापड, मेतकूट आणि इतर बराच तोंडी लावण्याचा मेवा आणला होता. जेव्हा जेव्हा, ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांना त्यांना या वस्तू भेट देण्याचा तिचा परिपाठ होता. हीच तिच्या दृष्टीने समाजसेवा होती, त्यातच तिचा आनंद दडला होता. लेखिकेच्या डोळ्यांतून आश्चर्यमिश्रित आनंदाश्रू वाहू लागले नसतील तरच नवल.
 
 
खूप छोट्याछोट्या गोष्टींत आनंद दडलेला असतो. आपल्याला फक्त तो शोधावा लागतो. गल्लीतल्या मुलांबरोबर शेवटचे क्रिकेट केव्हा खेळलो, दांडकं उडवल्यावर िंकवा कॅच घेतल्यावर अत्यानंदाने आरोळ्या ठोकत उड्या केव्हा मारल्या होत्या आठवतंय? गच्चीवरून पतंगांची काटाकाटी भान हरपून केव्हा पाहिली होती काही स्मरतंय? आपणच लावलेल्या झाडाची वाढ होताना, त्याची काळजी घेताना आणि त्याला आलेल्या कळीचे फुलांत रूपांतर होतानाचा अनुभव कधी घेतला होता, आठवताय काही? गाण्याच्या मैफिलीत भान हरपून, वय विसरून गाण्यावर धरलेला ताल िंकवा पहाटेचा अंधारपट फाडून हळूहळू बाहेर येणारा सूर्याचा पिवळट लालसर गोल पाहून आपले डोळे शेवटचे कधी दिपले होते, आठवताय? सहज म्हणून मैत्रिणीकडे िंकवा मित्राकडे जाऊन आवडलेल्या पुस्तकावर शेवटची चर्चा केव्हा केली होती आहे लक्षात? सकाळी उठल्यावर गुडमॉर्निंग आणि रात्री झोपताना गुडनाईटचा मेसेज आपण टाकतो. पण, एखाद्या फुरसतीच्या दिवशी अचानक भेट देऊन मित्रासमवेत घेतलेला चहाचा आस्वाद शेवटचा केव्हा घेतला होता, नाही ना आठवत? नाहीच आठवणार. कारण, अशा छोट्याछोट्या गोष्टीतच आनंद दडलेला असतो, हे जणू आपण विसरतच चाललो आहोत.
 
 
परवा गंमतच झाली. आम्ही तिघी मैत्रिणी एका कार्यक्रमाला गेलो होतो, पण काहीतरी कारणानं तो कार्यक्रम रद्द झाला होता. मग काय, लागलीच घरी न येता आम्ही तिघी सत्तरीच्या तरुणी रस्त्यावरून रमतगमत िंहडत गप्पा मारत, थोडंफार खात, मन मानेल तसं भटकत होतो. गणपती नुकतेच आपल्या घरी परत गेले होते, पण उत्सवाचा माहोल अजून टिकून होता. ढोलताशे वाजत होते. लोक रस्त्यावर लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर गणपती विसर्जनाची मिरवणूक पाहात होते आणि त्या वातावरणात आम्ही तिघी एक उनाड सायंकाळ अनुभवत होतो. एकदम 50 वर्षे मागे  गेल्यासारखं वाटलं. तारुण्यातला उत्साह, तरारी पुन्हा एकदा शरीरात भिनली. हा उत्साह घरच्यांनाही जाणवला. अशाच छोट्याछोट्या आनंदात रमायला हवं, तरच आयुष्य सुसह्य होतं, संकटांवर मात करायची उभारी येते. कारण संकटं तर कुणालाच चुकली नाहीत.
 
 
परंतु, दुर्दैवाने आपल्या आनंदाच्या संकल्पनाच बदलत चालल्या आहेत. बेगडी, चकचकीत, महागड्या गोष्टींत आपण आनंद शोधत चाललो आहोत. मोबाईलवर तासन्‌तास घालवणारे आपण आपल्याच घरातल्या सदस्यांबरोबर गप्पा मारत असताना वेळेचं भान हरपून गेलो आहोत, हे दृश्य आता दुर्मिळ होत चाललं आहे. नव्हे, आपणच त्याला दुर्मिळ बनवलं आहे. एखादा छंद जोपासून त्यात आनंद मिळवणं कुठेतरी अडगळीत पडलं आहे, कारण आम्हाला तेवढा वेळच नाही. मन भरून कोणाची तरी स्तुती केली आहे, हे आता फारच क्वचित पाहायला मिळते. मला आठवत आहे, माझ्या वडिलांना कुठेही जेवायला गेलं की, त्या गृहिणीच्या स्वयंपाकाची तोंड भरून स्तुती करायची सवय होती. याबद्दल छेडले तर म्हणायचे, अगं किती कष्ट घेऊन तिने स्वयंपाक केला होता. मग आपल्या चवीशी तो जुळला नाही तरी त्याची स्तुती केली तर त्यात बिघडलं कुठे? सगळ्याला चांगलं म्हणावं. किती आनंद दिसतो त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर आणि आपल्यालाही समाधान मिळतेच की तिला आनंदी केल्यामुळे. किती साधे, सोपे, सरळ विचार, या घडीस दुर्लभ होत चाललेले. आपण अंगवळणी पाडण्याचा प्रयत्न करू या का? बघा तरी निर्भेळ आनंद मिळतो की नाही ते! अगदी या उलट आमच्या नात्यातल्या एक बाई. कुणाची स्तुती करायची नाही, कुणाला चांगलं म्हणायचं नाही. खरंच चांगलं असल्याशिवाय स्तुती करणं मला बाई जमतच नाही. असा त्यांचा तोरा! काय मिळतं यातून कधी विचार केलाय?
 
हल्लीचं जीवन फार धकाधकीचं झालं आहे. तंत्रज्ञानाची अफाट प्रगती, तिच्या बरोबरीनं धावण्यासाठी आपली उरस्फोड, जीवघेणी स्पर्धा, पैशाला आलेलं अवास्तव महत्त्व आणि त्यासाठी काहीही करण्याची आपली तयारी, बदललेली नीतिमूल्यं, सार्‍यामुळे छोट्याछोट्या गोष्टींमधून आनंद शोधण्याचं आपण विसरूनच गेलो आहोत. जीवनाच्या गाडीनं पकडलेल्या प्रचंड वेगामुळे हे छोटेछोटे अमूल्य आनंददायी थांबे आपल्या हातून वाळूसारखे निसटून चालले आहेत, मनाच्या आनंदाला विरजण लागत चाललं आहे. हे वेळीच थांबायला हवं, आपण ते थांबवायला हवं. नाहीतर आयुष्य रटाळ होईल, बोअरिंग होईल आणि त्याचं मळभ मनावर साठेल आणि परिणाम शरीरावर दिसायला लागतील. थोडक्यात काय, तर असे छोटेछोटे आनंद शोधण्याचा आपण प्रयत्न करू या. तुमच्या मनाचे आभाळ अशाच अनुभवाने निरभ्र-स्वच्छ- निळ्या आकाशात बदलून जाऊ द्या. कारण ती ताकद तुमच्यातच आहे. मग पाहा काय होते-
 
मन आनंद आनंद छायो।
मिटो गगन घन अंधकार।
अखियनमें जब सूरज आयो।
मन आनंद आनंद छायो।।
शुभस्य शीघ्रम्‌।
 
 9423151476