भासमान जगात तिला तिचाच शोध!

    दिनांक :01-Nov-2019
अश्विनी पंडित
 
ती तशीही हळवी असते. तिच्या डोळ्यांच्या पापणकाठांवर नेहमी स्वप्नंच रुंजी घालत असतात. कधी ते आपणही दादांसारखं दांडगाई करतो आहोत असं असतं, तरी कधी तिच्या डोळ्यांच्या किरमिजी पडद्यावर तिच्या स्पप्नांतल्या राजकुमाराचा चेहरा रुंजी घालत असतो. अगदी वास्तवातला जोडीदार मिळाल्यावरही तो स्वप्नातला राजकुमार स्वप्नातल्या दुनियेतील त्याची सत्ता काही सोडायला तयार नसतो. मुळात तो अस्तित्वात नसतो. ते वास्तव नसते, तरीही वास्तवापेक्षा मौल्यवान असते. तिच्या अस्तित्वाच्या मुळापर्यंत तिची ही सारीच स्वप्नं पोहोचलेली असतात. स्वप्न आणि वास्तव यातच ती हिंदकाळत असते. 
 
 
 
ती आणि तिचे वास्तव यांच्यात नेहमीच अंतर असते. ते कसे कमी करता येईल, यातच तिचे सगळेच कसब पणाला लागते. स्त्री म्हणून तिचे जे काय अस्तित्व असते... संयम, सोशीकपणा, क्षणी कठोर होणे आणि कधी तडजोड करणे, हे सगळेच ती डावावर लावत असते. अशा अनेक ती पाहिल्या आहेत की, त्यांनी त्यांची स्वप्नं घरांच्या उंबर्‍याशी गाडून टाकली आहेत. एखादे घर किंवा त्या घरच्या कर्त्या म्हणवल्या जाणार्‍या पुरुषाचे कर्तृत्व हे त्या घरच्या स्त्रीने गाडून टाकलेल्या ‘स्व’(प्न)वर उभी राहिलेली असतात. तुम्ही सहज मागे वळून बघितले, तर लक्षात येईल की तुमची आई, आजी अशा गेल्या पिढीतल्या स्त्रियांनी त्यांना जे काय व्हायचे होते, करायचे होते ते संपविले आहे. एखाद्या सांजेला तुम्ही तुमच्या आईला खूप छान सुरांत गाताना ऐकले असेल किंवा घरात तुमचे आजोबा, काका किंवा वडील नसताना ती तन्मयतेने गात असते, याचा अदमास घेत की कुणाच्या कानी तर पडत नाही ना हे? किंवा मग कधीकाळी तिच्या जुन्या चोपड्या काढल्या तर तिने कविता करून ठेवलेल्या आहेत. तिला वाचनाचा खूपच छंद होता... शेजारच्या शाळेत जाणार्‍या लेकरांना शिकवितानाही तुम्ही तिला पाहिले असेल... असे ती काय काय करू शकत होती. तिच्या मनाच्या माचघराचे दार उघडलेत ना, तर तुम्हाला ती सांगेल की, ती शाळेत असताना खूप छान गायची. तिचे संगीताचे मास्तर म्हणाले होते तिच्या वडिलांना की, ही खूप छान गाते. तिला गाऊ द्या. मी मोफत तिला शिकवायला तयार आहे. त्या वेळी तिने आकाशवाणीवरही गायन केले आहे. शाळेत तर ती गायिका म्हणूनच ओळखली जायची... नंतर मग लग्न लावून दिले गेले. तिचे गाणे गाडले गेले. तिच्या संसाराचे सूर हे तिच्या गळ्यातील सुरांना श्रद्धांजली दिल्यावरच जुळलेले आहेत.
 
 
आता परिस्थिती बदलली आहे. ‘जेंडर इक्वॅलिटी’ नावाचा प्रकार आम्ही मान्य केला आहे. तीही आता शिकते. नोकरी करते. नवर्‍याचा व्यवसाय असला तर त्यात मदत करते. अगदी अंतराळातही ती पोहोचली आहे... पण, हे सारेच केवळ एक वरवर दिसणारे टोक आहे. मूळचा प्रवाह आहे तसाच आहे. नोकरीत तिचा टक्का किती? व्यवसायांत ती किती प्रमाणात आहे? सगळ्याच स्त्रिया काही खूप कर्तृत्ववान नसतात. म्हणजे तितकी सर्जनशीलता त्यांच्यात असतेच असे नाही, पण सर्जनाचे हळुवार अनुबंध पुरुषांच्या तुलनेत तिच्यात अधिक असतात. ती सगळीकडेच असते, आज आणि कालही होती. स्वातंत्र्यलढ्यात होती. राज्य कारभार करत होती. ती डॉक्टर झाली, सैनिक झाली... अगदी जुन्या काळीही ती हे करत होती. आजही करते आहे, पण बहुतांश स्त्रीजीवनाचा प्रवाह हा गृहिणींचाच असतो. तिला छोटेसे आपले असे काही निर्माण करायचे असते, करून दाखवायचे असते. ते करताच येते असे नाही. आज वातावरण बदलले आहे म्हणजे काय? तर तिला संधी मिळते िंकवा दिली जाते. तिची संधी ती का हस्तगत करू शकत नाही? तिला दिली जाते म्हणजे ती स्वयंभू नाही. तिचे अधिकार तिला नाही. मग प्रचंड सर्जनाच्या ऊर्जेने भरलेली ती उंबर्‍याच्या आड बसलेली असते. आताची शिकलेली गृहिणी असलेली स्त्री घर सांभाळत असते. आता घर ही संकल्पनाच बदलली.
 
आधीच्या काळी घर म्हणजे संसाराचा गाडा हाकण्यासाठी कमाई करून आणणे सोडले, तर बाकी सारेच घरातच व्हायचे. आता म्हणजे गावाच्या चौकटी मोडल्यापासून घरांच्याही चौकटी विस्कळीत झाल्या तेव्हापासून घरे आक्रसली. म्हणजे आधीच्या काळी घरातच मंदिर असायचे. घरात चौक असायचा तिथे सगळी मंगल कार्ये व्हायची. घरात कुठल्याही सणसमारंभाला पुरतील इतकी भांडी असायची. घरात कीर्तन- प्रवचने व्हायची. घरातच चक्की होती... म्हणजे पीठ दळायला बाहेर पडावे लागत नव्हते. मनोरंजनाच्या साधनापासून सगळेच कसे घरातच होते. अगदी शिक्षणदेखील. आता सगळे बाहेर झाले आहे. अगदी जेवण-नाश्ता, चहापानदेखील बाहेर मिळते. अगदी निद्रेसाठीही घर हवेच असे नाही... त्यामुळे तिलाही अनेक कामांसाठी बाहेर पडावे लागते. मुलांच्या शाळा, घरची बिले भरण्यापासून बँकांचे व्यवहार सांभाळण्यापर्यंतची कामे, असे सगळेच तिला करावे लागते. हे करावे लागते, या सदरात असते. तिला हे करायचेच असते असे नाही. तरीही आव असा आणला जातो की, तिला बाहेर पडण्याची आम्ही कशी संधी देतो. बुद्धीची कामे कशी देतो तिला...
 
 
मध्यंतरी ‘मंगळयान’ नावाचा एक हिंदी सिनेमा आला होता. त्यात नायिका स्पेस सेंटरला वैज्ञानिक आहे, तरीही ती घरचे सगळे करूनच तिच्या या दिव्य कामासाठी बाहेर पडते... हे खरेच आहे की, ती काहीही असली तरीही तिला तिचे घर काही सुटत नाही. म्हणजे रांधा-वाढा अन्‌ उष्टे सावडा हा प्रकार काही बंद होत नाही. तिला ते करावेच लागते. आजकाल थोड्या प्रमाणात अत्यंत प्रामाणिकपणेही पुरुष तिला सोबत करतात, पण मूळ काम हे तिचेच आहे.
 
 
...तर ती अशी घरात अडकते आणि बाहेरच्या जगात तिचे स्वप्नवत वास्तव तिला खुणावत असते. मग ती तशीही भासांच्या जगातच जगत असते. आधीही ती तशीच होती- भासमान जगात जगणारी. तिचे डिल्युजन्स खूप स्ट्रॉंग होते. आताही आहेत. म्हणजे तिची कल्पनाशक्ती तगडी होती, कारण तिला प्रत्यक्षात फार काही करण्याची संधी मिळालेली नाही. दिव्यांगाची मने बळकट असतात, कारण शरीराने जे काय करावेसे वाटते त्याला मर्यादा पडतात आणि मग ती भरारी ते मनाने मारतात... तसेच स्त्रियांच्या बाबत होते. ती भासांच्या जगात स्वत:च्या कर्तृत्वाचे जग उभे करते. तिचे असे हे आपले विश्व असते. काही स्त्रिया त्यांच्या या विश्वातले सर्जन बाहेर आणतात किंवा ते इतके स्ट्रॉंग असते की तेच बाहेर पडते अन्‌ मग जगाला अचंबित करते. कधी कुणी तिच्या त्या जगतात प्रवेश करतो आणि ते मग सार्‍या जगाला दाखवितो. अगदी बहिणाबाईंचेच उदाहरण घ्या ना. अत्र्यांनी तिच्या कविता जगाला दाखविल्या नसत्या, तर त्या तिच्यासोबतच गेल्या असत्या. स्त्रीवाद उदंडपणे जगणारी चित्रकार फ्रिदा कालोदेखील अशीच. तिच्या चित्रांमध्ये ती स्वत:चा शोध घेत राहिली उदंड आणि एका प्रख्यात शिल्पकाराची बायको म्हणूनच तिची ओळख होती. तिनेच मग बंड केले आणि तिच्या चित्रांचे जग वास्तव जगासाठी खुले झाले... अशा कितीतरी स्त्रिया आहेत.
 
 
त्यांना त्यांच्या कर्तृत्वाचे भास होत राहतात. आता तर असे झाले आहे की, भासांचेच एक जग तयार झाले आहे. आजची एक पिढीच्या पिढीच त्या भासांच्या जगात वावरत असते. प्रत्यक्षात जे जसे असावे किंवा आपण जे असावे असे वाटते ते सगळेच या भासांच्या जगात जगून घेतले जाते आहे. समाजमाध्यमांवर दोन हजार फ्रेंडस्‌ असतात. वास्तवात तसे काहीच नसते. आजकाल मित्र असणे ही केवळ कल्पना झालेली आहे. जीवनाला इतकी गती आलेली आहे आणि जगणार्‍यांची इतकी गर्दी झालेली आहे की, मग त्यांच्या गरजाच छेदत असतात एकमेकांना. त्यामुळे गरज भागते तिथेच सबंध आणि मग तिथेच मैत्री-स्नेह यांचे भास माणूस मुद्दाम निर्माण करतो. ही स्वत:ची केलेली फसवणूक असते. वास्तवात ते तसे कधीच नसते. स्त्रिया अगदी तरुणींपासून प्रौढ, ज्येष्ठांपर्यंत समाजमाध्यमांवर असतात. त्यावरचे लाइक्स वगैरे सगळेच भास असतात. हे माहिती असूनही त्या त्यात अडकतात.
 
 
पुरुष नसतात का या भासमान जगात अडकलेले? असतात, पण त्यांच्या त्या असण्याची तीव्रता आणि त्यातली भावनिक गुंतवणूक स्त्रियांच्या तुलनेत खूप कमी असते. कारण त्यांना खर्‍या अर्थाने हक्काचे बाहेर पडता येते. स्वत:साठी काही जगता येते. अगदी व्यसनेही करता येतात. बाहेर वेळ घालविण्यावर मर्यादा नसतात. स्त्रीमुक्ती कितीही म्हटली तरीही मर्यादा आहेतच आणि मग ती रात्री खूप वेळ फेसबुकवर आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत असते. घरी भजी केली तर त्यांचे फोटो ती समाजमाध्यमांवर टाकते आणि मग त्यावर तिला लाइक्स-कॉमेंट मिळतात. एरवी केवळ जबाबदारी असलेले आणि मजुरी म्हणूनच करावे लागणारे भजी करण्याच्या कामालाही भासमान जगात असे अॅप्रिसिएशन मिळते. तिला ते बरे वाटते. त्यात ती स्वत:ला शोधत राहते.
 
 
मग आता तिच्या डोळ्यांच्या किरमिजी पडद्यावर ती वयात आल्यापासूनच एक तिला हवा तसा पुरुष असतो आणि मग ती तिच्या वाट्याला आलेल्या पुरुषाला तसे घडविण्याचा प्रयत्न करते... हाही तिचा एक खेळच असतो. आता मात्र भास आणि आभासांच्या या जगाने तिच्या या स्वप्नालाही एक सुरक्षितता प्रदान केली आहे. प्रौढावस्थेकडे झुकत असताना तिला तो तिचा राजकुमार अधिक छळत असतो आणि मग एक धाडस तिला करावेसे वाटत असते. पुरुष हे असे धाडस- थ्रील अनुभवून घेतात किंवा किमान त्यावर बोलतात, प्रयत्न करतात. स्त्रियांना तर त्याची कल्पनाही व्यभिचार वाटावा, असेच संस्कार केले गेले असतात. आता समाजमाध्यमांमुळे अनेक पुरुषांशी अप्रत्यक्ष असा सहवास तिला लाभतो. बर्‍याचदा त्याचा चेहरा आणि खरे अस्तित्वही तिला माहिती नसते. तो खूप दूर असतो. भौगोलिकदृष्ट्या जवळ असला तरीही ती तसा जवळ कधीच येऊ शकत नाही. त्याच्याही ते संस्कारात बसत नाही अन्‌ हिला तर ते परवडणारे नसतेच. ‘गुड मॉर्निंग’च्या मेसेजपासून हा प्रवास सुरू होतो. मग कविता, शेर किंवा मग असाच आपला राहून गेलेला छंद... अगदी गाणे गाऊनही त्याला पाठविले जाते. तो त्याची तारीफ करतो आणि भासांच्या जगातले हे प्रेम भासांतच फुलते. तिथेच संपतेही. तिला ते तितकेच हवे असते. त्याची उबदार धगच काय ती हवी असते. पुन्हा त्यात शारीरभाव किंवा इच्छा नसतेच. त्याचे मात्र तसे नसते. तो प्रत्यक्ष भेटण्याची किंवा त्यापुढची इच्छा करतो. ती तर मेसेजरूपी संवादातही पुराव्यादाखल काही राहणार नाही, याची काळजी घेते. दीर्घ चॅिंटगनंतर तिचा त्याला अखेरचा संदेश हाच असतो, ‘‘घरी जाण्याच्या आधी सगळे मेसेज डीलिट कर.’’ तिला त्याची अन्‌ स्वत:चीही वास्तवाची संसारिक चौकट कशीही असली तरीही ती मोडायची नसते. हे सगळे केवळ भासांच्या पुरतेच मर्यादित आहे, या वास्तवाची जाणही तिलाच असते. वास्तवात तो आपल्या स्वप्नातल्या जोडीदारासारखा नाहीच, हे तिला माहिती असते; पण म्हणून ती भासांच्या जगातच त्याचे नि तिचे असे जग निर्माण करते. वास्तवाची टाचणी लागून ते फुटू नये यासाठी ती प्रत्यक्षात त्याला भेटत नाही किंवा त्याने कधी अनावर होऊन प्रत्यक्ष कॉल केला, तर त्याच्याशी बोलणारी ‘ती’ त्या भासांच्या जगातली नक्कीच नसते.
 
 
माझ्या असंख्य मैत्रिणी का कोण जाणे, पण या त्यांच्या गोष्टी माझ्याशी शेअर करतात. डिल्युजन्सच्या जगातले हे त्यांचे वागणे म्हणजे व्यभिचार नक्कीच नाही. नव्या जगाने सुरक्षित हळवेपणाने जगण्याची अन्‌ स्वप्नसख्यासोबत स्वप्नांतच जगून घेण्याची तिला दिलेली संधी आहे, असे वाटते. मात्र, ही वाट नक्कीच धोकादायक आहे. त्यातली तरलता कळण्याइतके निरागस असे जग राहिलेले नाही. त्यामुळे मैत्रिणींना सांगावेसे वाटते की, भासांच्या जगातले हे प्रणयाराधन प्रत्यक्षातल्या व्यक्तीसोबतच असते आणि तो तुम्हाला जाळू शकतो... म्हणून मग राख होण्याच्या आधीच सावध व्हा आणि यापासून दूर राहा!