‘‘मेरे पीछे फौज खड़ी हैं।’’

    दिनांक :01-Nov-2019
 न मम
श्रीनिवास वैद्य
पाकिस्तानात रविवारी जमात उलेमा-इ-इस्लाम (फजल) या कट्‌टरपंथी राजकीय पक्षाचा आझादी मार्च सुरू झाला. या पक्षाचे नेते मौलाना फजलुर रहमान यांच्या नेतृत्वात निघालेला हा मार्च, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे पोहचून तिथे धरणे आंदोलन करणार आहे. पूर्ण इस्लामाबाद शहराला घेराव घालून या शहराची नाकेबंदी करण्याचा त्यांचा निर्धार आहे. सध्या, तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाचे नेते इम्रान खान यांचे पाकिस्तानात सरकार असून ते पंतप्रधान आहेत. मौलाना फजलुर रहमान यांचा आरोप आहे की, पाकिस्तानी लष्कराने निवडणुकीत घोटाळा करून इम्रान खान यांना निवडून आणले आहे. त्यामुळे हे सरकार अवैध आहे आणि म्हणून इम्रान खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी हा मोर्चा निघाला आहे. सुरवातीला इम्रान खान यांनी या मोर्चाकडे दुर्लक्ष केले. परंतु, या मोर्चाला मिळत असलेला पािंठबा बघून मात्र त्यांचे धाबे दणाणले. म्हणून मग इम्रान खान यांनी एक पत्रपरिषद घेऊन सरकारची भूमिका मांडली. त्यात त्यांनी ठणकावून सांगितले की, मी कुठल्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही. कारण माझ्या मागे लष्कर उभे आहे. (मेरे पीछे फौज खड़ी हैं।) या त्यांच्या वक्तव्याची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. मूळ पाकिस्तानचे, परंतु आता कॅनडा येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद रिझवान यांनी म्हटले आहे की, इम्रान खान म्हणतात की माझ्या मागे लष्कर उभे आहे. परंतु, लष्कर तर रेतीच्या पोत्यांमागे (सॅण्ड बॅग्ज) उभे असते आणि या पोत्यांवर मशीनगन ठेवून ते समोरच्यांवर गोळीबार करतात. इम्रान खान रेतीच्या पोत्यांसारखे आहेत काय, असा त्यांचा प्रश्न आहे.
 
 
 
बोलण्याच्या ओघात इम्रान खान, नको ते बोलून गेले आहेत. कारण, पाकिस्तानात खरे शासक लष्करच असते, असे आतापर्यंत म्हटले जात होते. पंतप्रधान असलेल्या इम्रान खानने ही लपवून ठेवलेली वस्तुस्थिती उघड केली आहे. जगात गमतीने म्हटले जाते की, प्रत्येक देशासाठी त्याचे लष्कर असते. पाकिस्तानात मात्र लष्करासाठी देश आहे. परंतु, याच लष्करामुळे आज पाकिस्तानची राजकीय, सामाजिक व आर्थिक स्थिती इतकी दयनीय झाली आहे की, हा देश आणि यातील समाज एकेकाळी भारताचा एक भाग होता, यावर विश्वासच बसत नाही. भारतातील बहुसंख्य समाज िंहदू असल्यामुळेच इथे लोकशाही टिकली, ही वस्तुस्थिती ज्यांना मान्य नाही, त्यांनी पाकिस्तानकडे बघावे. म्हणजे मग त्यांनाही ही वस्तुस्थिती मान्य होईल. पाकिस्तानातील परिस्थिती तिथल्या लष्करामुळेच इतकी बिघडली आहे. परंतु, हे तिथला समाज मान्य करायला आजही तयार नाही.
 
 
झाले काय की, भारतापासून वेगळा झालेल्या पाकिस्तानचा भारतद्वेष, काश्मीर प्रदेशावर केंद्रित करण्याचा पाकिस्तानी लष्कराने प्रथमपासून प्रयत्न केला. ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ ही त्यांची घोषणा होती. कसेही करून आपल्याला काश्मीर ताब्यात घ्यायचे आहे, या मुद्यावर पाकिस्तानी जनतेचे भावनिक शोषण लष्कराने केले. त्यासाठी भारताशी युद्धेही केलीत. त्यात पाकिस्तानी लष्कराचा पराभव झाला असला, तरी पाकिस्तानात लष्कराने मात्र जनतेला सतत भ्रमात ठेवले आणि काश्मीर मुद्यावरून त्यांचे आधी भावनिक आणि नंतर आर्थिक शोषण सुरूच ठेवले.
 
 
पाकिस्तानी लष्कराने पद्धतशीरपणे पाकिस्तानात लोकशाहीची राजकीय मानसिकता विकसित होऊच दिली नाही. कुठलाही पंतप्रधान शक्तिशाली व लोकप्रिय होत आहे, असे लक्षात येताच त्याला लष्कराने एकतर हटविले आहे िंकवा जगातून नाहीसेतरी केले आहे. काश्मीरचा बाऊ उभा करून पाकिस्तानी जनतेला सतत आपल्या पाठीशी उभे करण्याचा लष्कराने प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वीही झाला आहे. आज पाकिस्तानी जनतेला निवडून आलेल्या सरकारपेक्षा लष्करावर अधिक विश्वास आहे. आपल्या लष्करामुळेच पाकिस्तान जिवंत आहे, असे ही जनता मानते. लष्करानेही जनतेचे शोषण करण्यात कुठलीही कसर ठेवली नाही. ‘आधी रोटी खाएंगे, अॅटम बॉम्ब बनाएंगे’ या घोषणा लोकांसमोर ठेवून लष्कराने आधीच दरिद्री असलेल्या जनतेच्या हितासाठी असलेला पैसा आपल्याकडे ओढून, स्वत: अतिशय समृद्ध झाले आहेत. आज या देशातील बहुसंख्य उद्योग लष्करी अधिकार्‍यांच्या मालकीचे आहेत. निर्यात त्यांच्याच ताब्यात आहे. लष्करी अधिकार्‍यांची मुले परदेशात शिकतात. त्यांची परदेशात स्थावर संपत्ती आहे. देशातील सर्व प्रशासकीय संस्था लष्कराच्याच प्रभावाखाली आहेत. मीडियादेखील लष्कराचेच बाहुले आहे. आतापर्यंत पाकिस्तानात तीनदा लष्करी राजवट आली. परंतु, जगात लष्करी राजवटीला मान मिळत नाही म्हणून मग, नाइलाजाने लष्कराने लोकशाही प्रक्रियेचे नाटक करत, आपल्या तालावर नाचणारे पंतप्रधान सत्तेवर बसविले. लष्कर जे म्हणेल तेच पंतप्रधान बोलणार आणि वागणार. जगालाही हे सर्व माहीत आहे. त्यामुळेच जगातील कुठलाही देश, पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी बोलणी करत नाही. तो लष्करप्रमुखांशी बोलतो. म्हणजे काश्मीरप्रश्नावरून पाकिस्तानी जनतेचे भावनिक ब्लॅकमेिंलग करून लष्कर सर्वशक्तिमान झाले आहे.
 
 
एक ना एक दिवस आपले लष्कर काश्मीरला पाकिस्तानात सामील करून दाखवेल, या आशेवर प्रत्येक पाकिस्तानी असताना, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीर राज्याला विसर्जित करून, तिथे दोन नवे केंद्रशासित प्रदेश तयार केलेत. आपल्या विश्वासाला बसलेला हा तडा पाकिस्तानी जनता अजूनही स्वीकारण्याच्या मन:स्थितीत नाही. यावरून मोदींनी घेतलेला हा निर्णय किती धाडसाचा होता, हे लक्षात येईल. मोदींनी पाकिस्तानी जनतेची जीवनेच्छाच नष्ट करून टाकली आहे. सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवाळखोरीच्या काठावर पोहचली आहे. त्यातच, काश्मीर हातातून निसटले आहे. श्रीनगर पाकिस्तानात आणण्याच्या वल्गना करणारे पाकिस्तानी आता (गुलाम काश्मिरातील) मुजफ्फराबाद कसे वाचवायचे, या विवंचनेत आहेत. लष्करदेखील हतबल झालेले पाकिस्तानी जनता बघत आहे. पाकिस्तानचे मनोबल तोडण्यात नरेंद्र मोदी यशस्वी झाले आहेत. आता पाकिस्तानात किती नवे देश तयार होतील, अशी चर्चा सुरू आहे. बलुचिस्तान, िंसध आणि पंजाब असे तीन नवे देश तयार होतील. वझिरीस्तानचा भाग अफगाणिस्तानकडे जाईल आणि आझाद काश्मीर भारताकडे, अशी भीती लोकांना आहे. पाकिस्तानात लोकांना खायला अन्न नाही, रोजगार नाही, उद्योगधंदे बसले आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणी विचारत नाही अन्‌ भीकही देत नाही. नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हटवून पाकिस्तानची अवस्था अशी खिळखिळी केली आहे. परंतु, दुर्दैवाने भारतात मात्र मोदींची टर उडविली जात आहे. असो.
 
 
अशातच इम्रान खान यांचे ‘‘मेरे पीछे फौज खड़ी है’’ हे वक्तव्य, परिस्थिती आणखीनच चिघळवणारे ठरले आहे. लष्करही इम्रान खानवर नाराज झाले आहे. तसे नसते तर मौलाना फजलुर रहमान यांना हा मोर्चा काढणे शक्यच झाले नसते. लष्कराला वाटले होते की, पश्चिमी देशांना आवडणारा चेहरा असलेला, ऑक्सफर्ड शिक्षित इम्रान खान उपयोगी सिद्ध होईल. परंतु, आता इम्रान खान लष्करावर ओझे झाले आहे. इम्रान खान यांना काश्मीरप्रकरणी जगातील इतर देश तर सोडाच, पण इस्लामी देशदेखील पाकिस्तानच्या मागे उभे करता आले नाहीत. तसेच पाकिस्तानसाठी जगातून पैसाही उभा करता आला नाही. त्यामुळे इम्रान खान यांच्या मागे उभे असलेले लष्कर त्यांचा कधी घात करेल, हे सांगता येत नाही. लष्करही हळूहळू पाकिस्तानची परिस्थिती आणखी खराब होऊ देईल आणि नंतर हळूच तिथे मार्शल लॉ लावून, लष्करी राजवट लादण्यात येईल, अशी शक्यता आहे. थोडक्यात काय की, इम्रान खान यांचे दिवस भरले आहेत, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. अशा परिस्थितीत भारतात मोदींचे चाणाक्ष, तत्पर, सावध आणि चाणक्यनीतीने चालणारे सरकार आहे, हे भारताचे सुदैवच म्हटले पाहिजे.
9881717838