रामजन्मभूमी

    दिनांक :10-Nov-2019
|
प्रख्यात उर्दू शायर महंमद इकबाल यांच्या या ओळी. श्रीराम आणि श्रीरामकथा जाती, संप्रदाय, धर्म यांच्या भिंतीला ओलांडून प्रत्येक भारतीयाच्या अंतःकरणात कशी रुजली आहे, याचे यापेक्षा दुसरे प्रत्ययकारी उदाहरण कोणते देता येईल? सकल भारतीयांमध्ये राष्ट्रीय चेतना पालविण्याची, जातपात, प्रांत, भाषा या सगळ्या भेदांवर मात करून एकराष्ट्रीयत्वाचा अलख जागविण्याची अलौकिक आणि अद्भुत क्षमता ‘श्रीराम’ या तीन अक्षरी मंत्रात सामावली आहे. श्रीराम हे केवळ हिंदू समाजाच्या श्रद्धेचा, आस्थेचाच तेवढा विषय नाही. श्रीराम ही या राष्ट्राची ओळख आहे. राजकारणाचा पडदा बाजूला सारून निखळ मनाने या देशाच्या इतिहासात डोकावलं तर या सत्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही.
प्रख्यात समाजवादी विचारवंत आणि नेते डॉ. राम मनोहर लोहियांना याच सत्याचा साक्षात्कार झाला. केवळ रामच नव्हे, तर राम, कृष्ण आणि शिव या तीन देवतांचा भारताच्या राष्ट्रीय जीवनाशी असणारा अनुबंध डॉ. लोहियांनी अतिशय उत्कट शब्दात मांडला आहे. ते म्हणतात- राम, कृष्ण आणि शिव यांची नावे धर्माशी जोडलेली आहेत म्हणून काही केवळ त्या व्यक्ती लोकप्रिय झालेल्या नाहीत. जीवनातील आदर्श म्हणून या त्रिमूर्तीकडे भारतीय जनता पाहात आली आहे.
राम, कृष्ण, शिव या महान व्यक्ती एका दिवसात घडलेल्या नाहीत. कोट्यवधी हिंदूवासियांनी युगानुयुगाच्या काळात, हजारो वर्षांत त्यांच्या व्यक्तित्वात आपल्या प्रसन्नतेचे, स्वप्नांचे रंग भरले आहेत.
राम मर्यादा पुरुषोत्तम आहे तर कृष्ण स्वयंभू, अनिर्बंध आहे. शिवाच्या व्यक्तित्वात एक वेगळाच आविष्कार आहे. शिवकथेसारखी लांबी-रुंदी-जाडी असलेली दुसरी कथा या जगात नसेल. राम, कृष्ण, शिव ही हिंदुस्थानची महान व परिपूर्ण स्वप्ने आहेत. उदास गांभीर्याची प्रतीके आहे. राम जीवनाचा परमोत्कर्ष आहे, तर कृष्ण मुक्त जीवनाची सिद्धी आहे आणि शिव ही असीमित व्यक्तिमत्त्वाची संपूर्णता आहे.
 
 
 
हे भारतमाते, आम्हाला शिवाची बुद्धी दे, कृष्णाचे हृदय दे आणि रामाचा एकवचनीपणा व कर्मशक्ती दे. असीमित बुद्धी, उन्मुक्त हृदय आणि मर्यादायुक्त जीवन यांनी आमचे सृजन कर. म्हणूनच रामजन्मभूमीचा लढा हा विटामातीच्या एका इमारतीसाठीचा संघर्ष नाही. या देशातील प्रत्येक नागरिकाला जीवन कसं जगावं, आदर्श जीवनमूल्य म्हणजे काय, याचा वस्तुपाठ देणार्‍या एका राष्ट्रीय आदर्शाच्या गौरवाचा तो विषय आहे. तो या देशाच्या राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे. राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय आहे. या आदर्शावर घाला घालणार्‍या परकीय आक्रमणाचा कलंक कायमचा पुसून टाकायचा की षंढासारखा मिरवायचा, हा जळजळीत प्रश्न उपस्थित करणारा विषय आहे.
जगभरात असे परदास्याचे कलंक मिटवून टाकण्याची शेकडो उदाहरणे आहेत. ज्येष्ठ इतिहासकार सर अर्नाल्ड टॉएनबी यांनी एका व्याख्यानमालेत बोलताना एक अतिशय मार्मिक उदाहरण दिले. 1814 मध्ये रशियाने पोलंड हिंकल्यावर वार्सा शहराच्या मध्यभागी एक भव्य चर्च बांधले होते. पोलंडने ते 1918 मध्ये पाडले. का? तर स्वधर्मी प्रार्थनास्थळ असूनही त्यांच्यासाठी ते गुलामगिरीचे प्रतीक होते. रशियाने चर्च कशासाठी बांधले, तर त्यांना पोलिश लोकांना हे दाखवून द्यायचे होते की आता आम्ही तुमचे मालक आहोत. रशियाने ते धार्मिक हेतूंनी बांधले नव्हते. त्यांचा उद्देश केवळ राजकीय होता. पोलंडने संधी मिळताच परदास्याचा तो कलंक उद्ध्वस्त केला.
म्हणूनच अशी प्रतीकं केवळ जमिनीचे वाद नसतात. जेत्यांनी जीतांचे केलेले ते मानसिक खच्चीकरण असते. असे खच्चीकरण एकदा झाले की मनातील विजयाची आकांक्षा समूळ नष्ट होऊन परदास्याच्या शृंखलेलाच वैजयंती मानणार्‍या पिढ्या पैदा होतात. म्हणूनच श्रीराम जन्मभूमी असो, काशी विश्वनाथ असो की कृष्ण जन्मभूमी, या सार्‍या राष्ट्रीय मानिंबदूंवर नृशंस आघात करण्याचे प्रयत्न विदेशी आक्रात्यांनी केले. गांधीजी या आघातांना गुलामीची चिन्हे म्हणतात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तत्काळ कायदा करून सोमनाथचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. त्या निर्णयाचे स्वागत करताना महात्मा गांधी नवजीवनच्या अंकात जे म्हणाले होते ते अतिशय मननीय आहे. अयोध्या आंदोलनामागची सैद्धांतिक भूमिका नेमकेपणाने स्पष्ट करणारे आहे-
कोणत्याही धार्मिक प्रार्थनास्थळावर बळजबरीने ताबा मिळवणे हे फार मोठे पाप आहे. मोगलांच्या काळात मोगल शासकांनी धर्मांधतेेमुळे हिंदूंची पवित्र प्रार्थनास्थळे, जी हिंदूंची पवित्र धर्मस्थळे होती, ती आपल्या ताब्यात घेतली. त्यापैकी बर्‍याच ठिकाणी लुटालूट करून ती नष्टभ्रष्ट करून टाकली आणि अनेकांना मशिदीचे रूप दिले. मंदिर आणि मशीद ही दोन्ही ईश्वराच्या उपासनेची पवित्र स्थळे असली आणि (पवित्रतेबाबत) दोहोतही काही फरक नसला, तरी हिंदू आणि मुसलमान या दोहींच्या उपासनापद्धती वेगळ्या आहेत.
धार्मिक दृष्टिकोनातून कोणताही मुसलमान आपल्या मशिदीत किंवा ज्या ठिकाणी विधिपूर्वक नमाज पढला जातो अशा ठिकाणी एखाद्या हिंदूने एखादी (अपवित्र) वस्तू टाकली तर ते कृत्य सहन करीत नाही. त्याचप्रमाणे कोणताही हिंदू त्याच्या मंदिरात जिथे राम, कृष्ण, शंकर, विष्णू किंवा देवी यांची उपासना केली जाते ते स्थान पाडून कुणी तिथे मशीद बांधू लागला तर ते सहन करणार नाही. जिथे अशा घटना घडल्या ती खरोखर धार्मिक गुलामीची चिन्हे आहेत.
श्रीरामजन्मभूमीवरील आक्रमणाचा इतिहास तर इसवी सन पूर्व दुसर्‍या शतकातील ग्रीक सेनानी मिनांडरपासून सुरू होतो. अयोध्येत रामपुत्र कुश याने आपल्या पित्याचे स्मारक म्हणून उभे केलेले भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिर मिनांडरने उद्ध्वस्त केले. जन्मभूमीवर 2200 वर्षांपूर्वी झालेले हे पहिले आक्रमण. परंतु, मिनांडरला या विजयाचे समाधान फार काळ मिळू शकले नाही. द्युमत्सेन या शुंगवंशीय राजाने त्याचा निःपात करून अयोध्या मुक्त केली. मात्र, पुढील काळात कुशाणाचे हल्ले होत राहिल्याने मंदिर भग्नावस्थेतच राहिले. तरीही तेथे नित्य पूजापाठात खंड पडला नाही. पुढे शंभर वर्षांनी सम्राट विक्रमादित्याने जन्मभूमीवर पुनः भव्य आणि वैभवशाली मंदिराची निर्मिती केली. पुढे एक हजार वर्षे अयोध्या वैभवात होती. इ.स. 1029 मध्ये महंमद गझनीचा भाचा सालार मसूदने अयोध्येवर हल्ला केला. परंतु, कोसल नरेश महाराजा सुहेलदेव आणि त्यांची शूर कन्या पद्मा यांनी दिगंबर आखड्यातील सेनेच्या साहाय्याने तब्बल चार वर्षांच्या रक्तरंजित संघर्षानंतर मसूदचा पूर्ण पाडाव केला.
इसवी सन 1526 मधे मुघल आक्रमक बाबर भारतावर चाल करून आला. भारतीय मानमर्यादा, मंदिरे यांची अक्षरश: धुळधाण करीत बाबराचा वरवंटा फिरत फिरत 1528 मधे अयोध्येतील श्रीजन्मभूमीवर फिरला. इतिहासकार किंनघम याने लिहून ठेवले आहे की, बाबराचा सेनापती मीर बाकी याने श्रीरामजन्मभूमीवर तोफगोळे डागून भारतीय अस्मितेचा मानभंग केला. सुमारे 15 दिवस सतत चाललेल्या या धर्मांध धुमाकुळाने 1 लाख 74 हजार हिंदू साधू, संत, बैरागी आणि सामान्य नागरिक यांची कत्तल अयोध्येत घडवली गेली. श्रीरामजन्मभूमीचा विध्वंस केल्यानंतर मंदिराच्या मलब्यातील अवशेषांचा उपयोग करून त्याच जागेवर मीर बाकीने एक ढाचा निर्माण केला. पण, या ढाच्याला जाणत्या धार्मिक मुस्लिम बांधवानी मशीद म्हणून कधीच मान्यता दिली नाही. त्याचा इतिहासही रंजक आहे.
मंदिर तर पाडले, परंतु मशीद उभी करणे सोपे नव्हते. मंदिराच्याच मलब्यातून ती घाईघाईने उभी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. तरीही सकाळपासून सायंकाळपर्यंत उभ्या केलेल्या भिंती रात्रीतून भुईसपाट व्हायच्या. महिन्यांमागून महिने उलटूनही मशीद अर्धवटच उभी राहिली. अखेर मीर बाकीने बाबराला खलिता पाठवून बोलावले. आमचे मंदिरस्थान आम्हाला परत मिळाले पाहिजे तेथे मशीद होता कामा नये, असे संघर्षरत हिंदू आखाड्यानी त्याला निक्षून सांगितले. अखेर तडजोड झाली. या तडजोडीत- 1. जे मिनार उभे होत आहेत ते पाडून टाकण्यात यावे. 2. प्रदक्षिणापथ मोकळा ठेवण्यात यावा. 3. राममंदिराचे लाकडी भव्य प्रवेशद्वार कायम ठेवावे. 4. दारावर ‘श्री सीतापाक’ अशी नाममुद्रा असावी. 5. हिंदूंना नित्यपूजा पाठाची परवानगी असावी आणि मुसलमानांना फक्त शुक्रवारीच नमाज पढता यावा. या पाचही अटी मान्य झाल्या. त्यामुळे खरेखुरे धार्मिक मुसलमान त्या ठिकाणी कधीच नमाज पढायला गेले नाही. या तडजोडीची अंमलबजावणी झाली. हिंदूंचा हा पहिला विजय होता. या विजयामुळे तिथे मीर बाकीने जो ढाचा उभारला तो मशीद या संज्ञेस कधीच पात्र झाला नाही. त्याची कारणे म्हणजे जिथे मिनार नाही ती मशीद नाही. प्रदक्षिणापथ, लाकडाचा वापर, श्री सीतापाक हे नाव आणि मुख्य म्हणजे काफ़िरांचा (हिंदू) पूजापाठ चालतो ते स्थान मशीद म्हणून कसे मान्य होणार? पुढे राणी जयराजकुमारीने हे स्थान पूर्णपणे हिंदूंच्या ताब्यात आणण्यासाठी पुन्हा संघर्ष केला. त्यात ती पराभूत झाली आणि पुन्हा मुस्लिम वर्चस्व तिथे प्रस्थापित झाले. तरीही मशिदीचा दर्जा त्या स्थानाला कधीही मिळाला नाही. अर्वाचीन इतिहासात तर तेथे एकदाही नमाज पढला गेला नाही.
जन्मभूमीसाठी हिंदू समाजाने 1526 पासून आजवर तब्बल 77 वेळा संघर्ष केला आहे. त्याचा तपशील याच लेखात अन्यत्र एका कोष्टकात दिलेला आहे. संघर्षाचा हा सारा इतिहास रक्तरंजित आहे. आपल्या राष्ट्रीय मानिंबदूच्या पुनः प्रतिष्ठेसाठी अखिल हिंदू समाजाने आपल्या रक्ताने लिहिलेला विजीगीषुतेचा तो दिव्य आणि दाहक अध्याय आहे.
मुळात प्रश्न मशीद वा मंदिराचा नाहीच. तो तसा आहे हे कितीही रंगविण्याचा प्रयत्न केला तरी कोणत्याही सच्च्या मुसलमानाने त्या स्थानाला कधीच मशीद मानले नाही. तसेही कुणा दुसर्‍याच्या जमिनीवर त्याच्या परवानगीशिवाय मशीद बांधण्यास पवित्र कुराणाने बंदी घातली आहे. दुसर्‍या कुणाच्या जागेवर त्याच्या परवानगीशिवाय बांधलेली मशीद ही खर्‍या अर्थाने मशीद ठरणार नाही. अशा मशिदीत नमाज पढणे हे पाप ठरेल. तो नमाज मंजूर होणार नाही, असेच मुस्लिम धर्मशास्त्र सांगते. पवित्र हदीसमध्ये पैगंबरसाहेबांनी दिलेल्या एका निकालाचा उल्लेख आहे. एका यहुदी प्रजाननाची जागा बळकावून इस्लामी सरकारच्या अधिकार्‍यांनी तेथे मशीद बांधली. पैगंबरसाहेबांनी ती जागा त्याला परत करावी, असा निकाल दिला. त्याप्रमाणे त्याला ती परत करण्यात आली.
24 ऑक्टोबर 1994 च्या आपल्या बहुमताच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, डिसेंबर 1949 मध्ये विवादित जागेत मूर्ती स्थलांतरित करण्यात आली तेव्हापासून हिंदू तिथे पूजाअर्चा, दर्शन, उत्सव हे सर्व विना हरकत करीत आहेत. खरी वस्तुस्थिती तर ही आहे, 1934 पासूनच तेथे नमाज झालाच नाही. या बाबरी ढाच्याला तो उभा करण्यार्‍या मिर बाकीनेही मशीद म्हटलेले नाही. त्याने तेथे जो शिलालेख प्रवेशद्वारी बसविला होता त्यात फारसीमध्ये ‘फरिशतो के ठहरने का ठिकाना’ असेच म्हटले होते. बाबरी मशीद या नावाची नोंद महसुली नोंदीतही नाही, नोंद आहे ती मस्जिद जन्मस्थान या नावाची.
राम नावाची व्यक्तिरेखा खरंच झाली काय? पुढे देवता झाला असा कुणी माणूस कधी जन्माला आला होता का? आला असेल तर त्याचा पुरावा काय? असे प्रश्न रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात आणि आजही विचारले जातात. रामायणाचा दाखला देणार्‍यांना ही मंडळी ते एक काव्य आहे, असे सांगून चूप बसवण्याचा प्रयत्न करतात. असे प्रश्न मोहम्मद पैगंबर किंवा येशू ख्रिस्त यांच्याविषयी विचारण्याची हिंमत मात्र या मंडळींची कधीच होत नसते. काश्मिरातील एका मशिदीमधील एक पवित्र बाल (केस) मुस्लिम बांधवांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय असतो.
मात्र, करोडो हिंदूंच्या आस्थेचा विषय असलेला राम काल्पनिक पात्र आहे, असे निर्लज्ज प्रतिज्ञापत्र सरकारी स्तरावर देण्यात येते. मंदिरे अनेक असू शकतात, पण जन्मभूमी एकच असते. ती आमची आम्हाला परत द्या, या आर्ततेला पायदळी तुडवले जाते. तब्बल सत्तर वर्षे न्यायालयीन गुंत्यात अडकवले जाते. त्यावरचा निर्णय हा आमच्यासाठी प्राधान्यक्रम नाही, असे सांगितले जाते. देशद्रोही आतंकवाद्यांना आपली बाजू मांडता यावी म्हणून चक्क मध्यरात्री उघडणारी न्यायासने या संवेदनशील प्रश्नावर मात्र तारीख पे तारीख देत राहतात. हिंदू भावनांनी स्वतःला कुठवर सांभाळायचे?
रामजन्माचा आणि तो तिथेच जन्मला याचा पुरावा मागणार्‍यांसाठी विश्व हिंदू परिषदेने ‘एव्हिडन्स ऑफ दि रामजन्मभूमी मंदिर’ असे पुस्तकच प्रसिद्ध केले आहे. त्यात- 1. पौराणिक काळातील उल्लेख, 2. हिंदूंच्या बाजूचा कागदोपत्री पुरावा, 3. प्रत्यक्ष स्थळाविषयीचा पुरावा, 4. मुस्लिम कागदपत्रांचा पुरावा, 5. युरोपियन कागदोपत्री पुरावा, 6. राजस्व नोंदीतील पुरावा, 7. पुरातत्त्वीय पुरावा, 8. इतिहासपूर्व काळातील पुरावा आणि 9. ऐतिहासिक पुरावा असे भक्कम पुरावे दिले आहेत. त्यातील केवळ मुस्लिम लेखकांच्या लेखनाचा आढावा घेतला तरी वस्तुस्थिती स्पष्ट होते. सतराव्या शतकापासून या पुढील काळाचा जो प्रादेशिक इतिहास उपलब्ध समकालीन सूत्रांप्रमाणे, मुस्लिम लेखकांनी लिहून ठेवलेला आहे, त्या सर्वांनी कोट रामचंद्र, परगणा हवेली, अवध येथील जन्मस्थानावरच्या दशरथ महल, राममंदिर आणि सीता रसोई या सर्व वस्तू बाबराचा सेनापती मीर बाकी याने, बाबराच्या हुकुमावरून आणि सय्यद मुसा आशिकान या फकिराच्या प्रोत्साहनाने पाडल्या आणि तेथे 1528 मध्ये मशीद बांधली, याची नि:संदिग्ध पुष्टी करणार्‍या आहेत. यातील सर्वात पहिले लेखन औरंगजेबाच्या नातीचे आहे. ‘सोफिया-ए-चहल-नसाइह-बहादुर शाही’ असे त्या पुस्तकाचे नाव. अकबरनामा लिहिणारा अबुल फजल, मिर्झा जान यांनी लिहिलेले ‘हदिक इ शहादा’ 1858 मध्ये महंमद असघर या बाबरी कमिटीच्या खातीबाने ब्रिटिश सरकारकडे दाखल केलेले निवेदन, डॉ. झाकी काकोरावी यांचे ‘फसाना इ इब्रत’, हाजी मोहम्मद हसन याचे ‘झिया इ अखतर’, मौलवी अब्दुल करीम यांचे ‘गुमगस्ते हालात इ अयोध्या’, अलाम्‌ मुहम्मद नाजामुलघनी खान रामपुरी यांचे ‘तारीख ए अवध’, मौलाना हकीम सय्यद अब्दुल यांचे ‘िंहदुस्थान इस्लामी अहदमे’ हे पुस्तक अशा अनेक पर्शियन, उर्दू ग्रंथांमधून मीर बाकीने केलेल्या रामजन्मभूमी मंदिराच्या उद्ध्वस्ततेची, अयोध्येतील अन्य विध्वंसाची प्रत्ययकारी वर्णने आली आहेत. या मुस्लिम लेखकांनाही खोटं ठरवायचं का? श्रीरामजन्मभूमीवरील मंदिर पाडूनच मीर बाकीने तेथे ढाचा उभारला, याचे सुस्पष्ट उल्लेख युरोपियन लेखकांच्या लेखनातही सापडतात. विलियन िंफज, टायफेन्थेेलर, मॉन्टगॉमरी मॉर्टिन, ईस्ट इंडिया कंपनी गॅझेटिअर 1854, एन्सायक्लोपीडिया ऑफ इंडिया 1858, हिस्टॉरिकल स्केच ऑफ फैजाबाद 1870, अवध प्रांताचे गॅझेटियर 1857, फैजाबाद सेटलमेंट रिपोर्ट 1881, इम्पेरियल गॅझेटिअर ऑफ इंडिया 1881, ऑर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया 1891, बाराबंकी डिस्ट्रिक्ट गॅझेटिअर, ऍनेटी बेव्हरीजचा बाबरनामा, एन्स्लायकोपीडिया ब्रिटानिका 1978, व्हाल्युम-1 अशा अनेक दस्तऐवजांतून रामजन्मभूमीवरच बाबरी ढाचा उभारण्यात आल्याचे समकालीन संदर्भ दिले गेले आहेत.
सर्वात महत्त्वाचे पुरावे पुरातत्त्वीय आहेत. 18 जून 1992 ला जन्मस्थानापासून समतल करण्याचे कार्य जेव्हा सुरू झाले, तेव्हा बारा फुटांच्या खोलीवर हलक्या पिवळ्या लाल रंगाचे नक्षीकाम असलेले खरपी दगडाचे अनेक सुंदर तुकडे दिसले. या तुकड्यांचा पुरातत्त्ववेत्ते आणि इतिहासकार यांच्या तुकडीने सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर, हे सारे प्रस्तरखंड अकराव्या शतकातील प्रचलित नागर शैलीतील िंहदू मंदिराचे भग्नावशेष आहेत, असा निर्वाळा त्यांनी दिला. 6 जुलै रोजी केलेल्या खोदकामात 12 फूट खोलीवर पक्क्या विटांनी बनवलेली फरसबंदी आहे आणि ही फरसबंदी जन्मस्थान मंदिरापासून सीता रसोईपर्यंत सोळा हजार वर्गमीटर इतकी विस्तारित आहे, याचाही शोध लागला. पुढे 6 डिसेंबरच्या बाबरी ढाचा विध्वंसातून जो मलबा बाहेर आला त्यात तेथे असलेल्या प्राचीन मंदिराचा जो शिलालेख गवसला त्यामुळे तर मंदिर विरोधकांची बोलतीच बंद झाली! या मुख्य शिलालेखाव्यतिरिक्त वनमाला धारण केलेली विष्णुमूर्ती, भैरव मूर्ती असे अनेक अवशेष हाती लागलेे. मुख्य शिलालेखाचे सरकारी परवानगीने वाचन करण्यात आल्यानंतर तर त्या स्थानी मंदिरच होते, यावर शिक्कामोर्तब झाले. सलक्षणाचा पुत्र अल्हण. त्याचा मुलगा मुलगा नयचंद्राने अकराव्या शतकात पूर्वी कधी उभारले गेले नसेल असे भव्य शोभिवंत आणि सुवर्ण शिखर असलेले विष्णू हरीचे मंदिर त्या ठिकाणी उभारले, असा स्पष्ट उल्लेख त्या शिलालेखात आहे.
पुढे लखनऊ खंडपीठाच्या निर्देशानुसार फेब्रुवारी 2003 मध्ये ग्राउंड पेनट्रेेिंटग रडार सर्वे म्हणजे भूगर्भात खोलवर जाणार्‍या रडार मार्फत सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण टोजो इंटरनॅशनल या संस्थेने केले. 12 मार्च 2003 ते 7 ऑगस्ट 2003 या काळात केलेल्या या उत्खननाचा अहवाल अलहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सादर केल्यावर तो खंडपीठाने 25 ऑगस्ट 2003 रोजी उघडून जाहीर केला. निष्कर्षांचा गोषवारा पुढीलप्रमाणे आहे- रामजन्मभूमी या वादग्रस्त ठिकाणी एक भव्य असे बांधकाम पूर्वी होते. हे जे भव्य बांधकाम आढळले ते दहाव्या शतकातील आहे. सार्वजनिक उपयोगासाठी असलेले हे भव्य बांधकाम तेथे दीर्घकाळ अस्तित्वात होते. सोळाव्या शतकाच्या प्रारंभी याच बांधकामाच्या डोक्यावर वादग्रस्त बांधकाम उभारण्यात आले. जे अवशेष सापडले ते उत्तर भारतातील मंदिराची जी वैशिष्ट्ये आहेत, त्यासारखे आहेत. मंदिराचे गर्भगृह ज्या ठिकाणी असल्याचा दावा करण्यात येतो त्या ठिकाणी काहीतरी महत्त्वाचे विद्यमान असल्याचा पुरावा मिळतो, परंतु तेथेच रामलला विराजमान असल्याने तेथे उत्खनन करण्यात आले नाही. वादग्रस्त ठिकाणी सार्वजनिक उपयोगाचे बांधकाम मोगल काळापर्यंत होते. पन्ना स्तंभांच्या बैठकी, अलंकृत विटा, दगड आणि एका दैवी युगलाची शिल्पप्रतिमा यांचेही अवशेष आढळल्याचे हा अहवाल सांगतो. निर्देशित भव्य बांधकाम एक भव्य सभागृह होते. एकावर एक तीन मजले होते आणि टप्प्याटप्प्याने प्रदीर्घ अशा काळात बांधले गेले असावे.
इतक्या सर्व सुस्पष्ट वास्तविकतेनंतरही रामजन्मभूमीवर भव्य मंदिराच्या निर्मितीला स्वतंत्र भारतातही सातत्याने विरोध व्हावा, हा केवढा मोठा दैवदुर्विलास! वस्तुतः ज्या वेळी सोमनाथच्या मंदिरावरील परआक्रमणाचा कलंक कायमचा मिटवून त्याचा शासकीय इतमामाने जीर्णोद्धार करण्यात आला त्याच वेळी रामजन्मभूमीही मुक्त व्हायला हवी होती. पण, कधी न्यायालयीन निर्णयाचा गुंता, तर कधी अल्पसंख्य समुदायाच्या अनुनयापोटी हिंदू जनभावना पायदळी तुडवण्याचा खेळ राजकारणी खेळत राहिले. याच अन्यायाविरोधातील उद्रेक 6 डिसेंबर 1992 ला झाला. िंहदू पुरुषार्थाच्या पराक्रमी प्रकटीकरणाने शतकानुशतकं राष्ट्रजीवनाला लागलेला कलंक उद्ध्वस्त झाला. परदास्याचे बर्बर प्रतीक असणारा बाबरी ढाचा भुईसपाट झाला. श्रीरामजन्मभूमी मुक्त झाली. ते केवळ एका इमारतीचे पडणे नव्हते. ती एक युगप्रवर्तक घटना होती. निद्रिस्त राष्ट्रपुरुषाला आलेली ती जाग होती. तो हुंकार म्हणजे राष्ट्रीय अस्मितेचे पाञ्चजन्य होते. राष्ट्रीय स्वाभिमानाची ती गर्जना होती. ज्यांना िंहदू समाज कधीच एक राहू नये, तो कायम शबल, परभृत राहावा असे वाटत होते त्यांना बसलेली ती चपराक होती. नोबेल पुरस्कार विजेते विद्याधर नायपॉल यांनी या घटनेवर जी मार्मिक प्रतिक्रिया दिली ती या घटनेचे सार आहे. ते म्हणतात, भारतात जे सुरू आहे ती नवी ऐतिहासिक जागृती आहे. इतिहासात मागे जे काही घडले त्यामागे काय दडले होते, याचा बोध आत्ता भारतीयांना होतो आहे. आक्रमकांच्या आक्रमणामागे त्यांचे कोणते उद्देश दडले होते, कोणते सत्य होते, ते आता त्यांना कळू लागले आहे. ही निद्रिस्त भारतवर्षाला आलेली आत्मजागृतीची पहाट आहे. तिचा मथितार्थ राष्ट्रीयताविरोधी शक्तींनी नीट समजून घेतला पाहिजे.
श्रीरामजन्मभूमी आंदोलन आता शेवटच्या निर्णायक टप्यावर आले आहे. कोणत्याही क्षणी न्यायालयीन निर्णय येण्याची शक्यता आहे. नव्वदीच्या दशकातला मंदिरनिर्माणाला असणारा विरोध आज काही छुटपुट इस्लामी कट्टरतावादी वगळता जवळपास मावळला आहे. त्या स्थानी पुन्हा बाबरी ढाचा उभा करा, अशी मागणी करण्याची िंहमत आता कोणी करू शकणार नाही इतकी ताकद आज िंहदुजागृतीने उभी केली आहे. कायदा करून राममंदिर उभारल्यास आमचा मुळीच आक्षेप राहणार नाही, हे या प्रकरणातील मुस्लिम पक्षकार इकबाल अन्सारी यांचे मध्यंतरी आलेले विधान बदलत्या मुस्लिम मानसिकतेची चुणूक दाखविणारे आहे. गेली पाचशे वर्षे िंहदू समाजाने दिलेल्या लढ्याचा हा विजय आहे. जवळपास पन्नास वर्षांपासून देशाला वेठीला धरणार्‍या या प्रकरणाचा भव्य राममंदिराच्या निर्माणाने सुखद शेवट व्हावा, हीच करोडो भारतीयांची आज आस आहे. न्यायालयाला या जनभावनांची जाण असणारच. इतिहास घडविणार्‍या एका शुभंकराची प्रासादचिन्हे उमटायला सुरुवात झाली आहे. जन्मभूमीवरील मंदिरनिर्माणाचा मार्ग प्रशस्त होण्याची आता प्रतीक्षा आहे.
जन जन के मनमे राम रमे,
हर प्राण प्राण मे सीता है।
कंकर कंकर शंकर इसका,
हर सांस सांस मे गीता है।
जीवन की धडकन रामायण,
पग पग पर बनी पूनिता है।
यदी राम नही है सासो मे,
तो प्राणो का घट रीता है।
नरनाहर श्री पुरुषोत्तमका,
हम मंदिर नया बनायेंगे।
सौगंध राम की खाते है,
हम मंदिर भव्य बनायेंगे ।।
हा शंखनाद पुन्हा एकदा सारा आसमंत निनादून टाकणार आहे. कुठलाही शंखनाद हा मंगलकारकच असतो. तो आश्वासक असतो, पण उन्मादक नसतो. आसमंतातील अशुभाची, आपदांची वायुमंडले नष्ट करून शुभंकराचे, विजयाचे अवगाहन करण्याची अद्भुत शक्ती त्यात असते. िंहदू मानसाचा हा हुंकारही अशा मंगलमय शुभंकरासाठीच आहे. श्रीरामजन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माण हे ते शुभंकर आहे. हे शुभंकर कुणाच्याही विरोधासाठी नाही. सर्वेपि सुखीन: सन्तु... हाच या शुभंकराचा मंत्रजागर आहे. रामजन्मभूमीवरील भव्य आणि वैभवशाली राममंदिर हे संपूर्ण राष्ट्रात सामर्थ्य, एकात्मता आणि समरसता निर्माण करणारे शुभंकर आहे.
श्रीरामजन्मभूमी आंदोलन हा राष्ट्राचे आत्मतेज जागृत करणारा एक अभूतपूर्व महायज्ञ आहे. लाखो िंहदूंनी या यज्ञात स्वजीवनाच्या समिधा अर्पण करून तो प्रज्वलित ठेवला आहे. शेकडो पराजयांच्या प्रतिकूल आघातांनी तो विझला नाही आणि विजयाच्या क्षणांनी मातला नाही. कारण मर्यादापुरुषोत्तम राम हे त्याचे आराध्य! विजयाचे क्षण जास्त कसोटीचे असतात. विलक्षण सावधानता पाळण्याचे असतात. प्रतिकूल परिस्थितीतही विचलित न होता सेतुबंधनाची उमेद जागविणारा तर विजयाच्या क्षणी अपार नम्रतेने मी कोणी महान विभूती नाही, सामान्य माणूसच आहे; ‘आत्मानम्‌ मानुषम्‌ मन्ये, रामम्‌ दशरथात्मज:’ असं म्हणणारा आणि रावणाच्या निर्णायक निर्दालनानंतर ‘मरणांती वैराणी’चा उदारमनस्क उपदेश करणारा श्रीराम आमच्या राष्ट्‌जीवनाचा आदर्श आहे आणि त्याच आदर्शाचा अलख मनामनात निरंतर जागविण्यासाठीच राममंदिर घडवायचे आहे.
••