जय जय रघुवीर समर्थ...

    दिनांक :10-Nov-2019
|
महर्षी वाल्मिकींच्या दिव्य प्रतिभेतून रामायण हे महाकाव्य उदित झाले आहे. प्रभू रामचंद्रांची मोक्षदायिनी कथा संपूर्ण भारतात सर्वांना माहीत आहे. संतांनी ही कथा ‘ब्रह्मांडपल्याड’ नेण्यासाठी आपले संपूर्ण जीवन खर्ची घातले. मग ते संत तुलसीदास असोत वा श्री समर्थ रामदास स्वामी असोत. संतांच्या या अथक परिश्रमांचा परिणाम म्हणजे भव्य मंदिरांपासून, राजप्रासादांपासून तो गरिबांच्या झोपडीपर्यंत रामायण पोहचले. रामभक्तीचा प्रसार झाला. प्रभू श्री रामचंद्रांच्या नामस्मरणाने त्यांची जीवने अलंकृत झालीत, पवित्र झालीत.
 
 
 
प्रभू श्रीराम हे भगवान श्री विष्णूंचा अवतार आहेत. अयोध्यापती, इश्र्वाकु कुलोत्पन्न राजा दशरथाचे ज्येष्ठ सुपुत्र आणि कौसल्यानंदन आहे. मानवी जीवनातील सर्व भूमिकांमध्ये एक श्रेष्ठतम उच्चतम आदर्श प्रस्थापित करणारे महापुरुष आहेत. चक्रवर्ती श्री महाराज दशरथाची आज्ञापालन करणारा सुपुत्र, राजर्षी आणि ब्रह्मर्षी वशिष्ठ-विश्वामित्रांचा आवडता, एकनिष्ठ शिष्य, वनराज, गुहराज, वानरराज, सुग्रीव, राक्षसेन्द्र, बिभिषण यांचा परममित्र, बुद्धिमतांवरिष्ठ, महाबलवान, भक्तश्रेष्ठ शिरोमणी श्री हनुमंतांचा आदर्श स्वामी, लोकरंजनार्थ, प्रजारंजनार्थ प्राणाहून प्रिय असलेल्या, बहिश्चर प्राण असलेल्या प्रिय पत्नीचा त्याग करणारा आदर्श प्रजावत्सल राजा, शरणागताला आश्रय देणारा आणि शिळेतही चैतन्याची निर्मिती करणारा दिव्यस्पर्शी, परम शक्तिशाली असुरांचा निःपात करणारा शस्त्रधारी ‘मरणान्तानि न वैराणी न मे कृतानिच’ या उदात्त भावनेने युद्धक्षेत्रातही मानवतेची श्रेष्ठ मर्यादा पालन करणारा अजात शत्रू, ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी’ या श्रेष्ठ मातृभूमीच्या भक्तीने ‘अपिस्वर्णमयी लंका न रोचते लक्ष्मण’ असे निर्मोहीपणे सांगणारा निरासक्त राजा! मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम! असे हे जगाच्या इतिहासात, साहित्यात आपल्या विविध गुणवैशिष्ट्याने, समृद्धतेने विनटलेले आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व! अशा गुणांनी अलंकृत असणारा राजाच खर्‍या अर्थाने ‘रामराज्याची’ निर्मिती करू शकतो. हाच महर्षी वाल्मिकींंच्या रामायणाचा संपूर्ण मानवजातीला संदेश आहे.
भारत- अवतारी पुरुषांची जन्मदात्री
भारत ही अनादिकाळापासून अवतारी पुरुषांची जन्मदात्री म्हणून ओळखली जाते. परमेश्वराला अवतार का घ्यावा लागतो, हे भगवद्गीतेत स्पष्टपणे सांगितलेच आहे. ‘जेव्हा धर्म निस्तेज होतो, अधर्माची वृद्धी होते तेव्हा सज्जनांच्या संरक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी आणि धर्मरक्षणासाठी मी अवतार घेत असतो.’ (अ. चौथा) त्याचा मथितार्थ हाच आहे की, सृष्टीत अनादिकाळापासून सूर आणि असुर, दैवी शक्ती आणि दुष्ट शक्ती, देवदूत आणि सैतान (बायबल) सज्जन शक्ती आणि दुर्जन शक्ती यांचा अखंड संघर्ष चालतच असतो. त्या त्या शक्तींचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती आणि केन्द्र युगपरत्वे बदलते, पण त्यांच्याद्वारे सज्जन शक्तींचे संरक्षण, श्रेष्ठ आणि शाश्वत जीवनमूल्यांचे प्रस्थापीकरण व त्याच्या आडवे येणार्‍या दुष्ट शक्तींचे निर्दालन या गोष्टी अखंडपणे चालतच असतात. त्रोतायुगातही हेच घडले. देवसंघापासून तो संपूर्ण विश्वाला स्वतःच्या दूषित आणि असुरी महत्त्वाकांक्षेने त्राहि भगवान करून सोडणार्‍या पौलस्त्य कुलोत्पन्न दशानन लंकाधिपती रावणाच्या निर्दालनाचे महत्त्वाचे अवतारी कार्य प्रभू रामचंद्रांनी केले. तेहतीस कोटी देवांनाही त्याच्या बंदिवासातून मुक्त केले. श्री प्रभू रामचंद्रांच्या या महत्कार्याचे वर्णन करताना श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात-
जेणे फेडिला पांग ब्रह्मादिकांचा।
बळे तोडिला बंद त्या त्रिदशांचा।
म्हणोनि कथा थोर या राघवाची।
जनी ऐकता शांति होते भवाची।।
रावणशाही नष्ट करून सीतामाईला त्याच्या बंदिवासातून मुक्त करून प्रभू रामचंद्र अयोध्येला परतले. त्या आनंदाप्रीत्यर्थ अयोध्येतील जनांनी ‘दीपोत्सव’ संपन्न केला. तेव्हापासूनच दिवाळी साजरी करण्याची परंपरा भारतात प्रारंभ झाली. अयोध्याधीश म्हणून श्री प्रभू रामचंद्राचा अभिषेक झाला. ‘रामराज्य’ निर्माण झाले.
‘रामराज्य’ ही संकल्पना म्हणजे ‘आदर्श राज्य (आयडियल स्टेट) कसे असावे? त्याची कार्यवाही करणारा आदर्श राजा कसा असावा? याचे विवेचन आणि तपशिलात जाऊन सूक्ष्म मार्गदर्शन महर्षी वाल्मिकींनी केले आहे. आदर्श पद्धतीने राज्य कारभार करणार्‍या राजप्रमुखाच्या अंगी कोणते गुण असावेत, त्याने राजधर्माचे पालन कसे करावे, याचा उपदेश भरताला पादुका देताना प्रभू श्री रामचंद्रांनी केला आहे. इंडोनेशियात प्रचलित असलेल्या ‘काकाविन’ रामायणात त्याचा पुढीलप्रमाणे उल्लेख आहे-
शील रक्ष्यु रक्षन्‌ रागद्वेष हिलडकॅन।
किम्बरु यत हीलनु, शुन्याम्बक्त लवन अवव।।
गॉंङग हँकार यत हिलन। निन्दा तन्‌ गवयाकॅन्‌
तं जन्मामुहर वॅक्र। थेरु प्रश्नय सुमुख।।
म्हणजे- हे भरता! चारित्र्याचे रक्षण कर. रागद्वेष सोडून दे.
ईर्ष्या आदी दोषांपासून मन आणि शरीर शून्य कर. अत्याधिक अहंकारापासून स्वतःला वाचव. िंनदा करू नकोस. कुलिन घराण्याचा गर्व करू नकोस (आजच्या परिभाषेत घराणेशाहीचा). हे भरता! हाच खरा धर्म आहे व हेच खरे सत्य आहे. हा उपदेश ग्रहण करून भरत अयोध्येला परत गेला आणि भक्तिपूर्वक राज्यरक्षणात व्यग्र राहिला.- ‘भरत सिर तमोल भक्ती मंराक्ष राज्य।’ ‘रामराज्य’ आणि ते निर्माण करणारा ‘प्रभुराम’ याचे आकर्षण संपूर्ण जगात निर्माण झाले. त्याचा परिणाम म्हणजे चीन, तिबेट, सायबेरिया, कांबोडिया, इंडोनेशिया या सर्व देशांमध्ये रामायण पोहचले. काकाविन रामायण हे त्याचेच दर्शक आहे.
अयोध्या- सांस्कृतिक-राष्ट्रीय उत्थानाचे केन्द्र
भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण हे भारताचे राष्ट्रीय महापुरुष आहेत. रामायण आणि महाभारत हे राष्ट्रीय- केवळ धार्मिक नव्हे- ग्रंथ आहेत. अयोध्या, द्वारका, मधुरा या असुरी शक्तींच्या निर्दालनाची प्रेरणा देणार्‍या नगरी आहेत. त्याचमुळे भारताच्या उत्थानाच्या प्रेरणा या संघर्ष केन्द्रांकडूनच इतिहासाच्या प्रदीर्घ वाटचालीत हिंदू समाजाला सतत मिळत गेल्यात आणि त्यांनी हिंदू धर्म, संस्कृती, समाजाचा विनाश करणार्‍या सर्व शक्तींना नामोहरम केले. परास्त केले. सनातन हिंदू धर्माचे संरक्षण करणारे भगवान श्रीकृष्णांचे सुदर्शन चक्र आणि असुरांचे, राक्षसांचे निर्दालन करणारे श्री प्रभू रामचंद्रांचे प्रत्यंचा ताणलेले ‘कार्मुक-कोदंड’ धनुष्य ही भारतीय समाजाच्या ‘शामादपि-शरादपि’ ‘इदं क्षात्रं-इदं ब्राह्म’ या मनोवृत्तीची प्रतीके आहेत. प्राणार्पण करूनही ती प्रतीके, ती प्रेरणा देणारी ऐतिहासिक स्थाने जपणे ही राष्ट्रीय कर्तव्ये आहेत. त्यांत कसल्याही प्रकारची भावनिक, मानसिक, वैचारिक स्वार्थलोलुपतेमुळे केलेली वंचना हा राष्ट्राशी केलेला द्रोह आहे. पाप आहे. अधर्म आहे. ते पाप, ती वंचना आपण केली. हिंदू धर्माचा समूळ उच्छेद करून ‘दारुल-इस्लाम’चे स्वप्न साकारण्यासाठी बाबर, त्याचा सेनापती मिरबाकी येथे आला, त्याने अयोध्येचे राममंदिर उद्ध्वस्त केले. तेथे बाबरी मशीद उभी केली. त्यासाठी पारतंत्र्याच्या काळात, इतिहासाच्या वाटचालीत अनेक संघर्ष झालेत. धर्मासाठी मरणार्‍यांनी त्यांचे त्या काळातील कर्तव्य पार पाडले. रामकार्यी त्यांनी देह अर्पण केला. त्यांच्या जिवाचे सोने झाले. सन 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. जगाला वाटले होते, आता सारेकाही ठीक होईल. स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या जीवनाचा होम करणार्‍यांना, ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांना वाटले, चला, आता आपण जी स्वप्ने पाहिली होती त्यांच्या पूर्ततेचा क्षण आला. मोगलांच्या, आदिलशाहीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, गुरुगोिंवदिंसग, पहिले बाजीराव पेशवे, हरििंसह नलुवा यांचे स्वप्न होते- ‘सकल तिर्थे मुक्त करावी.’ स्वातंत्र्यानंतर हे सहजपणे पूर्ण होईल, असे त्यांच्याही आत्म्यांना कदाचित वाटले असेल. पण, हे स्वप्न कुणाचेच आम्ही पूर्ण केले नाही. कारण आम्ही ‘पछाडलेलो’ होतो. ‘बाधित’ झालो होतो.
मुस्लिम तुष्टीकरण नीती (व्होट बँकेचे राजकारण), सर्वधर्मसमभाव, निधार्मिकता, (सेक्युलिरॅझम) लोकशाहीच्या गोंडस आवरणाखाली पोसल्या जाणारी उदासीनता आणि षंढपणा या विकृतींच्या रूपाने त्राटिका, शूर्पणखा, खर, दूषण, कुंभकर्ण यांच्या अतृप्त वासनामय पिशाचांंनी आमचा ताबा घेतला होता. पण, एखादा कुशल मांत्रिक जशी राममंत्राने सगळी भूतबाधा नाहीशी करतो, त्याप्रमाणे रामशिलापूजन, रामज्योतिपूजन, गंगाजल यात्रा, भारतमाता रथयात्रा, ‘श्रीराम जय राम जयजयराम’ या त्रयोदशाक्षरी मंत्राचे कोटीसंख्येचे पुरश्चरण, संपर्क सभा या विविध उपक्रमाने आसेतू हिमाचल पसरलेल्या या समाजपुरुषाला जागृत करण्याचे अथक परिश्रम विविध संघटनांद्वारा सुमारे तीन दशके केले गेलेत. समाजपुरुष जागा झाला. त्याच्या हृदयातील ‘आत्माराम’ जागृत झाला.
तो ‘राम’ जागा झाल्याबरोबर बाधा करणारी सारी पिशाच नाहीशी झालीत. श्री समर्थ म्हणतात त्याप्रमाणे-
जन हे वोळतु जेथे अंतरात्माची वोळला।
जन हे खवळले जेथे अंतरात्माची खवळला। आणि...
अंतरात्म्यापासून खवळलेल्या, क्रोधित झालेल्या, संतप्त झालेल्या जनसागराने रामललाच्या छातीवर उभे केलेले तीनही घुमट उरबाडून फेकले. ‘जय श्रीराम’च्या गगनभेदी गर्जनेने देव मस्तकी घरून अवघा हलकल्लोळ केला. मवाळ, सहिष्णू, प्रतिकारशून्य राहणार्‍या हिंदू समाजाच्या आक्रमकतेने आणि उग्र हुंकाराने संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले.
...आता त्याच मूळ जागी- आक्रमकतेची निशाणी असणारी बाबरी मशीद नष्ट करून श्री प्रभू रामचंद्राचे भव्य दिव्य मंदिर होऊ घातले आहे, नव्हे, ते होणारच आहे. हिंदू समाजाच्या संघटित सामर्थ्याचे ते प्रतीक असेल. भारतात ‘राम राज्य’ निर्माण करण्याचा तो ‘शिलान्यास’ असेल! श्री समर्थ म्हणतात त्याप्रमाणे-
बुडाले सर्वही पापी। हिंदुस्तान बळावले। (हिंदुत्व दृढ झाले)
अभक्तांचा क्षयो जाला। आनंदवनभुवनी।।
बुडाले भेदवाही ते। नष्ट चांडाळ पातकी।
श्री रामजन्मभूमी आणि मंदिराला विविध पद्धतीने विरोध करणारे जे पापी, भेद पाडणारे आहेत त्यांनी केलेले सर्व प्रयत्न, युक्तिवाद परास्त झालेत. कारण
राम भोक्ता राम दाता। रामचि सर्वत्र असे।
यश काीर्ति प्रतापाने। रामचि यश देतसे।।
।।जय जय रघुवीर समर्थ।।
 
रामलला...
(पान 1 वरून)
शांतता याचे आवाहन करीत होते, भाषा बोलत होते, त्यांना घटनास्थळावरून पळविण्याचा उद्योग सुरू झाला. कारसेवकांच्या या पराक्रमाची माहिती त्वरित जगाला कळू नये म्हणून तार, फॅक्स पाठविण्याची व्यवस्था असणारे पोस्ट ऑफिस बंद करण्यात आले होते. सुरक्षा पथकेही हवालदिल होऊन बघत होते. क्षुब्ध झालेला कारसेवकांचा समूह अश्रुधूर व लाठीहल्ला या उपायाने अजीबात शांत झाला नसता उलट अधिक उग्र झाला असता. त्यांना नियंत्रणात आणण्याचा मार्ग फक्त गोळीबार हाच उरला होता. पण, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याणिंसह यांनी ठाम भूमिका घेतली की, कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश मी देणार नाही. त्या वेळी आम्ही अयोध्येहून बातमी कशी पाठविता येईल यासाठी धडपडत होतो. माझ्यासमवेत तरुण भारतचे छायाचित्रकार जयंतराव हरकरे होते. आम्ही अयोध्येबाहेर पडण्याचा प्रयास सुरू केला. त्या वेळी अण्णा डांगे हे महाराष्ट्र विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते. ते कारसेवेला आले होते म्हणून उत्तरप्रदेश शासनाची डी. व्ही. कार त्यांच्या दिमतीला होती. अण्णा डांगे मुंबईला जायला निघणार होते. त्यांच्यासमवेत प्रकाश जावडेकर होते (विद्यमान केंद्रीय मंत्री). त्या कारमध्ये त्यांनी आम्हाला घेतले, त्यामुळे फैजाबादला पोहोचता आले. दुपारी दीडच्या सुमारास आमची गाडी अयोध्येहून निघाली. त्या वेळी पहिला ‘गुंबज’ जमीनदोस्त झाला होता. काही क्षण गाडी थांबवायला लावून जयंतराव हरकरे यांनी त्या गुंंबज जमीनदोस्त होण्याचा फोटो घेतला. गाडी फैजाबाद रेल्वेस्टेशनला पोहोचली. अण्णा डांगे यांना रेल्वे गाडी मिळाली. ते रवाना झाले. जावडेकरांना ती गाडी घेऊन पुन्हा अयोध्येला जायचे होते. पण, जयंतराव हरकरे यांना फोटो धुवूून िंप्रटआऊट घ्यायचे होते. मलाही बातमी द्यायची होती. आम्ही फैजाबादला एका या वृत्तपत्राच्या कार्यालयात ठाण मांडले होते. त्या वृत्तपत्राचे प्रमुख हे तसे कॉंग्रेसवाले होते. त्यांच्या कॅबिनमध्ये सर्वोदयी नेत्या निर्मला देशपांडे बसल्या होत्या. त्या कॅबिनमधून पंतप्रधान नरिंसह राव यांना फोन लावीत होत्या. पण, पंतप्रधान त्यांचा फोन घेत नव्हते. गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांना फोन लावीत होत्या, पण शंकररावही पंतप्रधानांसमवेत होते. फोन कुणीच घेत नव्हते.
तेवढ्यात बातमी आली की, दुसरा गुंबजही उद्ध्वस्त झाला. संध्याकाळी तिसरा गुंबजही धराशायी झाला आणि िंहदूंच्या इतिहासात सातवे सोनेरी पान रचले गेले. साकार झाले. त्यानंतर पंतप्रधान नरिंसह राव व केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी निर्मला देशपांडे यांचा फोन घेतला व त्यांना सांगितले की, राष्ट्रपती राजवट उत्तरप्रदेशात लागू करण्यात आली आहे. कल्याणिंसह यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने राजीनामा दिला. त्यानंतर त्या तिघांचे काय बोलणे झाले ते बाहेर ऐकू आले नाही. पण, पंतप्रधानांनी त्यांना सांगितले असावे की, बाबरी तर उद्ध्वस्त झालीच आहे. आता तिथे तात्पुरते रामललाचे मंदिर कारसेवकांना करू देऊ व नंतर त्यांना हुसकावण्याचा उपक्रम अयोध्येत राबवू. 
िंहदू पराक्रमाचे सातवे सोनेरी पान सिद्ध झाले, अशी बातमी तोवर नागपूरला रवाना झाली होती आणि जयंतराव हरकरे यांचे फोटोही तयार होऊन फॅक्सवरून तरुण भारताला पाठविले गेले. त्यानंतर आम्ही दोघेही फैजाबादवरून पुन्हा अयोध्येला गेलो. यावेळी मात्र पायीच ते अंतर तुडवावे लागले. बातमी पाठविण्याचा आनंद होता. तो काळ आजच्यासारखा इंटरनेट वा संगणकाचा नव्हता. हाताने बातम्या लिहाव्या लागत आणि फॅक्स मिळाला नाही तर फोनवरून वाचून दाखवाव्या लागत. त्या काळात वृत्तसंकलन जसे आव्हान होते तसेच बातमी पाठविणेही अवघड काम होते.
अयोध्येत मध्यरात्रीनंतर पोहोचलो. तेव्हा तिथे तर आनंदोत्सव सुरू होता. त्या वेळी प्रतिक्रिया देताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, ‘‘बाबरी पाडणारे जर शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे.’’ ते पहिले राजकीय नेते होते, ज्यांनी कारसेवकांच्या क्षुब्धतेचा आदर केला होता. राष्ट्रिंचतक असणार्‍या लालजींनी बाबरी उद्ध्वस्त होण्याबद्दल क्षमायाचना केली होती. अयोध्येत आम्ही दोघेही कारसेवेत सहभागी झालो. रामललांचे मंदिर होण्याच्या अभिक्रमात सुरक्षा पथकेही हातभार लावीत होते. तिसर्‍या दिवशी रामललाचे तात्पुरते मंदिर तयार झाले. रामललांची मूर्ती विधिवत प्रस्थापित झाली आणि सुरक्षा पथकांनी सर्व कारसेवकांना अयोध्या सोडण्यास सांगितले. मिळेल त्या वाहनाने, गाडीने कारसेवक घरी परतू लागले. त्यांचे जागोजागी वीरोचित स्वागत होत होते.
काही दिवसांनी सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री (आंदोलन काळातील) कल्याणिंसह यांना न्यायालयात पाचारण केले. ‘मी बाबरीचे संरक्षण करीन असे अभिवचन तुम्ही न्यायालयाला, या देशाला दिले होते’ याचे कल्याणिंसहांना स्मरण करून दिले. त्यांनी न्यायालयाची क्षमा मागितली. पण, त्या वेळी कल्याणिंसह यांचा सर्वोच्च न्यायालयातील वावर एखाद्या हिरोसारखा होता. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयात ते नायक म्हणूनच वावरत होते.
अयोध्येतील या घटनाचक्रानंतर रामललांच्या जन्माच्या जागी भव्य राममंदिर उभारले जाणार, ही बाब अगदी काळ्या दगडावरील रेघ ठरली. हे मंदिर कसे होणार हा प्रश्न होता. पण, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ पीठाने दि. 30 सप्टेंबर 2010ला निवाडा दिला व वादग्रस्त जागा वगळता उर्वरित जागा कुणाकुणाच्या मालकीची आहे याबाबत निवाडा दिला. 2.77 एकर जागा-  1/3 रामललांना, तर 1/3 निर्मोही आखाड्याला व 1/3 सुन्नी वक्फ बोर्डाची असा हा निकाल होता. हा श्रद्धेचा प्रश्न नव्हता, तर सरळ सरळ टायटल सुट होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यावर सर्वोच्च न्यायालयात सर्वांनीच अपील केले. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी सलग 40 दिवस सुरू ठेवली होती. सुरुवातीला सरन्यायाधीश दीपक मिश्रा या खंडपीठाचे प्रमुख होते. तेव्हा सर्वोच्च न्यायालयातील एक विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सुनावणीच लोकसभा निवडणुकीनंतर सुरू व्हावी, असे सुचविले होते. रंजन गोगई सरन्यायाधीश होताच त्यांनी 5 सदस्यीय पीठ गठित केले. त्यात न्या. ललित यांचा समावेश होता. पण त्यांनी सांगितले की, मी एका खटल्यात कल्याणिंसह यांचा वकील होतो, त्यामुळे या सुनावणीत मी राहणार नाही. त्यानंतर न्या. रंजन गोगई यांनी नवीन खंडपीठ गठित केले. त्यांनी 17 ऑक्टोबरपावेतो युक्तिवाद पूर्ण करायला सांगितले. हेही स्पष्ट केले की, 17 नोव्हेंबरला मी निवृत्त होणार आहे, त्या आधी हा निकाल मला द्यायचा आहे. त्याप्रमाणे न्या. रंजन गोगई, न्या. शरद बोबडे, न्या. डॉ. धनंजय चंद्रचुड, न्या. अशोक भूषण व न्या. एस. ए. नाझर. या खंडपीठाचा निकाल अपेक्षित आहे. चला तर, त्याचा संयमाने स्वीकार करू या.
खरा नायक बनवारीलालजी!
रामजन्मभूमी आंदोनलनातील एक नायक नागपुरातील होते. ते म्हणजे बनवारीलालजी पुरोहित! आज ते तामिळनाडूचे राज्यपाल आहेत. ते भाजपाचे नागपूरचे खासदारही होते. त्या वेळी बनवारीलालजी कॉंग्रेस पक्षाचे नागपूरचे खासदार होते. लोकसभेत रामजन्मभूमी प्रश्नावर चर्चा सुरू होती. गोंडे लावलेल्या टोप्या घातलेले खासदार हिरिरीने रामजन्मभूमीला बाबरी मशीद सिद्ध करण्यासाठी बोलत होते. दोन दिवसांची ती चर्चा होती. दुपारी भोजनाच्या विश्रांतीनंतर चर्चा सुरू झाली. त्या वेळी बनवारीलालजींना सत्तारूढ पक्षाकडून बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी रामललांचा जन्म इथेच झाला हे सांगून मंदिराची आग्रही मागणी केली. त्या चर्चेच्या संथ वातावरणात एकदम खळबळ निर्माण झाली. सभागृह संपल्यावर पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना भेटायला बोलाविले व पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. बनवारीलालजी म्हणाले, रामलला ही माझी श्रद्धा आहे. त्यांची मी घेतलेली मुलाखत त्या वेळी दै. तरुण भारतात प्रसिद्ध झाली.
पुढे रामललांची कारसेवा होणार होती, तेव्हा मी कारसेवेला  जात आहे, असे सांगून बनवारीलालजी अलाहाबादला आलेत. त्यांच्या या कृतीमुळे पक्षाने त्यांच्याविरुद्ध कारवाई केली. पण, रामभक्त मात्र त्यांना बिभीषण संबोधू लागले. 1992 साली त्यांची भाषणे खूप लोकप्रिय होत होती. बनवारीलालजींनी नंतर भाजपात प्रवेश केला. एक आधुनिक बिभीषण रामाच्या पक्षात आला व खर्‍या अर्थाने नायक ठरला!
••
प्रा. प्र. श्री. डोरले   
9860296131