रामलला...

    दिनांक :10-Nov-2019
|
ती घटिका आता समीप आली आहे. अयोध्येत रामललाच्या जन्मस्थळाच्या जमिनीचा वाद आता संपण्याची घटिका जवळ आली आहे. हा लेख आपण वाचत असताना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला असेल किंवा पुढील आठवड्यात तो निकाल येईल. भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगई हे 17 नोव्हेंबर 2019ला निवृत्त होत आहेत. तत्पूर्वी हा निकाल जनतेला माहीत झाला असेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी तसेच सार्वजनिक जीवनात वावरणार्‍या नेत्यांनीही जनतेला संयम, शांततेने हा निर्णय स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संयम, शांततेची हीच भाषा अधोरेखित केली आहे. निर्णय काय लागणार याबाबत आडाखे बांधण्यात काहीच अर्थ नाही. कारण, या घटनापीठात कार्यरत 5 न्यायमूर्तींविना अन्य कुणालाही त्याची माहिती असणार नाही.
पण, याच समयी रामजन्मभूमी आंदोलन बघण्याचे, त्याचे वृत्तसंकलन करण्याची जी संधी मला तरुण भारतामुळे मिळाली त्याचे स्मरण करणे अप्रस्तुत होणार नाही. रामजन्मभूमी आंदोलनाचा महत्त्वाचा टप्पा हा भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेपासून सुरू होतो. आता त्याला 25 वर्षांपेक्षाही अधिक कालखंड उलटून गेला आहे. त्यामुळे नव्या पिढीला त्याचे स्मरण करून देणे, माहिती करून देणे हे गरजेचे आहे.
 
 

 
 
रामजन्मभूमी आंदोलनासाठी इतिहासाला ज्ञात असणारी नावे म्हणजे लालकृष्ण अडवाणी, विहिंपचे नेते अशोकजी सिंघल, गिरिराज किशोरजी, उ.प्र.चे निवृत्त पोलिस महासंचालक श्रीशजी दीक्षित वगैरे वगैरे. पण, एक नाव कधीच पुढे आले नाही. ते या आंदोलनाचे खरे योजक होते. योजनकार होते. त्यांचे नाव मोरेश्वर निळकंठ पिंगळे. आताच 30 ऑक्टोबर 2019ला त्यांची जन्मशताब्दी सुरू झाली. त्यांनी संघ स्वयंसेवक व प्रचारक म्हणून विविध जबाबदार्‍या पार पाडल्यात. ते काही काळ रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाहही होते. 1981 ला मीनाक्षीपुरम्‌ धर्मांतरप्रकरण झाले. त्यानंतर संघाने हिंदू जागरणाच्या ज्या अनेक योजना आखल्या त्याचे मुख्य कल्पक मोरोपंत होते. एकात्मता रथयात्रा हा त्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. देशातील चारही भागांतून रथयात्रा निघाल्या. त्या नागपूरला एकत्र मिळाल्या होत्या. ते विश्व हिंदू परिषदेचे मार्गदर्शक होते. त्यांनीच ‘श्रीराम जन्मभूमी आंदोलन’ या चळवळीला हिंदू अस्मितेचे प्रतीक बनविले. त्या वििंहपच्या योजनेला भाजपाने पािंठबा दिला व लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा सोमनाथपासून 25 सप्टेंबर 1990ला निघाली. त्यांनी जवळजवळ 6 राज्यांचा प्रवास केला. या रथयात्रेवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारने- त्या वेळी व्ही. पी. सिंग यांच्या सरकारने निर्णय घेतला व लालूप्रसादांनी तो अंमलात आणला. लालकृष्ण अडवाणी यांची ही रथयात्रा, बिहारची राजधानी पाटणा पार करून पुढे निघाली, तेव्हा समस्तीपूरला 23.10.90 ला अडविण्यात आली. राजदचे नेते असलेले लालूप्रसाद यादव यांनी लालकृष्ण अडवाणी यांना अटक करून त्यांची रवानगी मंदसोर येथील विश्रामगृहात केली.
 
ही रथयात्रा थांबविल्यावर अयोध्येत काहीही होणार नाही, असे सरकारला वाटत होते. उ.प्र.चे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमिंसह यांनी जबर पोलिसी बंदोबस्त लावला होता. अयोध्येला जाणार्‍या गाड्या रद्द केल्या होत्या. रस्ते खोदून ठेवले. जेणेकरून कारसेवक अयोध्येत पोहोचणार नाहीत. ठिकठिकाणी गाड्या थांबवून कारसेवकांना अटक करण्यात आली. जवळजवळ दीड लाख लोकांना अटक करण्यात आली. उ.प्र.चे सर्व कारागृह भरल्यानंतर तात्पुरते कारागृह निर्माण करण्यात आले. अयोध्येत कारसेवा होणार नाही याबाबत मुलायमिंसह दर्पोक्ती करीत होते- ‘परिंदाभी पैर नही मार पायेगा!’ पण, ऑक्टोबर व नंतर 1 नोव्हेंबरला अयोध्येत कारसेवक पोहोचले. स्वत: अशोकजी सिंघल, श्रीशजी दीक्षित व नंतर उमा भारती या त्या चळवळीचे नेतृत्व करीत होत्या. त्यात पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात कोठारी बंधू शहीद झालेत. बळी गेलेल्या कारसेवकांची संख्या अधिकृत रीत्या 20 सांगण्यात आली. या प्रतीकात्मक कारसेवेनंतर व्ही. पी. सिंग यांना राजीनामा द्यावा लागला. कारण भाजपाने त्या सरकारचा पािंठबा काढून घेतला. त्यानंतर कॉंग्रेसच्या पािंठब्यावर चंद्रशेखर यांनी केंद्रात सरकार बनविले. लालकृष्ण अडवाणी यांची कारागृहातून (अतिथिगृहातून) मुक्तता झाली. ते अयोध्येत गेलेत. मुलायमिंसह यांचेही सरकार कोसळले. नंतर निवडणुका होऊन कल्याणिंसह यांचे सरकार स्थापन झाले.
 
चंद्रशेखर यांचे केंद्रातील सरकार कोसळले. त्यानंतर पी. व्ही. नरिंसह राव यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस पक्षाचे अल्पमतातील सरकार स्थापन झाले. केंद्रात भाजपाचे संख्याबळ वाढले. मात्र, रामजन्मभूमी आंदोलन शांत झाले नव्हते. जनक्षोभ उसळत होता. त्यात 6 डिसेंबर 92ला कारसेवा करण्याचा संकल्प वििंहपने घोषित केला. देशभरातून कारसेवक अयोध्येत, फैजाबादला पोहोचत होते. ख्यातनाम संगीतकार, गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी, डॉ. सुजित धर लखनौला पोहोचले होते. रथयात्रा निघाली होती. ती लखनौला पोहोचली. लखनौला रात्री विशाल जाहीर सभा घेण्यात आली. त्यात लालजी व अटलजींची भाषणे झाली. अटलजी या भाषणानंतर दिल्लीला रवाना झालेत. कल्याणिंसह यांचे सरकार सत्तेवर होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात असे आश्वासन दिले होते की, बाबरी ढॉंचा हा अबाधित राखला जाईल, त्याला धक्का पोहोचविला जाणार नाही.
 
6 डिसेंबरला अयोध्येत जाहीर सभा सुरू होती. कारसेवा करता येणार नाही म्हणून कारसेवकांचा जनसमूह प्रक्षुब्ध झाला. बघता बघता तणाव वाढत होता. व्यासपीठावरून होणार्‍या भाषणांकडे कारसेवकांचे लक्ष नव्हते. भाषणेही ऐकली जात नव्हती. सूचनांकडे कुणीही लक्ष देत नव्हते. तेवढ्यात तथाकथित बाबरी मशिदीच्या गुंंबजावर काही कारसेवक चढले. व्यासपीठावरून त्यांना गुंबजावरून खाली उतरण्याचे आवाहन केले जात होते, पण ते जणू कुणालाही ऐकूच येत नव्हते. सर्वत्र एकच गोंधळ माजला. कुणीतरी गुंबजावर भगवा फडकविला. संपूर्ण वातावरण भारून गेले. जे कुणी संयम, शांतता याचे आवाहन करीत होते, भाषा बोलत होते, त्यांना घटनास्थळावरून पळविण्याचा उद्योग सुरू झाला. कारसेवकांच्या या पराक्रमाची माहिती त्वरित जगाला कळू नये म्हणून तार, फॅक्स पाठविण्याची व्यवस्था असणारे पोस्ट ऑफिस बंद करण्यात आले होते. सुरक्षा पथकेही हवालदिल होऊन बघत होते. क्षुब्ध झालेला कारसेवकांचा समूह अश्रुधूर व लाठीहल्ला या उपायाने अजीबात शांत झाला नसता उलट अधिक उग्र झाला असता. त्यांना नियंत्रणात आणण्याचा मार्ग फक्त गोळीबार हाच उरला होता. पण, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याणिंसह यांनी ठाम भूमिका घेतली की, कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश मी देणार नाही. त्या वेळी आम्ही अयोध्येहून बातमी कशी पाठविता येईल यासाठी धडपडत होतो. माझ्यासमवेत तरुण भारतचे छायाचित्रकार जयंतराव हरकरे होते. आम्ही अयोध्येबाहेर पडण्याचा प्रयास सुरू केला. त्या वेळी अण्णा डांगे हे महाराष्ट्र विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते. ते कारसेवेला आले होते म्हणून उत्तरप्रदेश शासनाची डी. व्ही. कार त्यांच्या दिमतीला होती. अण्णा डांगे मुंबईला जायला निघणार होते. त्यांच्यासमवेत प्रकाश जावडेकर होते (विद्यमान केंद्रीय मंत्री). त्या कारमध्ये त्यांनी आम्हाला घेतले, त्यामुळे फैजाबादला पोहोचता आले. दुपारी दीडच्या सुमारास आमची गाडी अयोध्येहून निघाली. त्या वेळी पहिला ‘गुंबज’ जमीनदोस्त झाला होता. काही क्षण गाडी थांबवायला लावून जयंतराव हरकरे यांनी त्या गुंंबज जमीनदोस्त होण्याचा फोटो घेतला. गाडी फैजाबाद रेल्वेस्टेशनला पोहोचली. अण्णा डांगे यांना रेल्वे गाडी मिळाली. ते रवाना झाले. जावडेकरांना ती गाडी घेऊन पुन्हा अयोध्येला जायचे होते. पण, जयंतराव हरकरे यांना फोटो धुवूून प्रिंटआउट घ्यायचे होते. मलाही बातमी द्यायची होती. आम्ही फैजाबादला एका या वृत्तपत्राच्या कार्यालयात ठाण मांडले होते. त्या वृत्तपत्राचे प्रमुख हे तसे कॉंग्रेसवाले होते. त्यांच्या कॅबिनमध्ये सर्वोदयी नेत्या निर्मला देशपांडे बसल्या होत्या. त्या कॅबिनमधून पंतप्रधान नरिंसह राव यांना फोन लावीत होत्या. पण, पंतप्रधान त्यांचा फोन घेत नव्हते. गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांना फोन लावीत होत्या, पण शंकररावही पंतप्रधानांसमवेत होते. फोन कुणीच घेत नव्हते.
 
तेवढ्यात बातमी आली की, दुसरा गुंबजही उद्ध्वस्त झाला. संध्याकाळी तिसरा गुंबजही धराशायी झाला आणि हिंदूंच्या  इतिहासात सातवे सोनेरी पान रचले गेले. साकार झाले. त्यानंतर पंतप्रधान नरिंसह राव व केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी निर्मला देशपांडे यांचा फोन घेतला व त्यांना सांगितले की, राष्ट्रपती राजवट उत्तरप्रदेशात लागू करण्यात आली आहे. कल्याणिंसह यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने राजीनामा दिला. त्यानंतर त्या तिघांचे काय बोलणे झाले ते बाहेर ऐकू आले नाही. पण, पंतप्रधानांनी त्यांना सांगितले असावे की, बाबरी तर उद्ध्वस्त झालीच आहे. आता तिथे तात्पुरते रामललाचे मंदिर कारसेवकांना करू देऊ व नंतर त्यांना हुसकावण्याचा उपक्रम अयोध्येत राबवू.
हिंदू पराक्रमाचे सातवे सोनेरी पान सिद्ध झाले, अशी बातमी तोवर नागपूरला रवाना झाली होती आणि जयंतराव हरकरे यांचे फोटोही तयार होऊन फॅक्सवरून तरुण भारताला पाठविले गेले. त्यानंतर आम्ही दोघेही फैजाबादवरून पुन्हा अयोध्येला गेलो. यावेळी मात्र पायीच ते अंतर तुडवावे लागले. बातमी पाठविण्याचा आनंद होता. तो काळ आजच्यासारखा इंटरनेट वा संगणकाचा नव्हता. हाताने बातम्या लिहाव्या लागत आणि फॅक्स मिळाला नाही तर फोनवरून वाचून दाखवाव्या लागत. त्या काळात वृत्तसंकलन जसे आव्हान होते तसेच बातमी पाठविणेही अवघड काम होते.
 
अयोध्येत मध्यरात्रीनंतर पोहोचलो. तेव्हा तिथे तर आनंदोत्सव सुरू होता. त्या वेळी प्रतिक्रिया देताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, ‘‘बाबरी पाडणारे जर शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे.’’ ते पहिले राजकीय नेते होते, ज्यांनी कारसेवकांच्या क्षुब्धतेचा आदर केला होता. राष्ट्रिंचतक असणार्‍या लालजींनी बाबरी उद्ध्वस्त होण्याबद्दल क्षमायाचना केली होती. अयोध्येत आम्ही दोघेही कारसेवेत सहभागी झालो. रामललांचे मंदिर होण्याच्या अभिक्रमात सुरक्षा पथकेही हातभार लावीत होते. तिसर्‍या दिवशी रामललाचे तात्पुरते मंदिर तयार झाले. रामललांची मूर्ती विधिवत प्रस्थापित झाली आणि सुरक्षा पथकांनी सर्व कारसेवकांना अयोध्या सोडण्यास सांगितले. मिळेल त्या वाहनाने, गाडीने कारसेवक घरी परतू लागले. त्यांचे जागोजागी वीरोचित स्वागत होत होते.
काही दिवसांनी सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री (आंदोलन काळातील) कल्याणिंसह यांना न्यायालयात पाचारण केले. ‘मी बाबरीचे संरक्षण करीन असे अभिवचन तुम्ही न्यायालयाला, या देशाला दिले होते’ याचे कल्याणिंसहांना स्मरण करून दिले. त्यांनी न्यायालयाची क्षमा मागितली. पण, त्या वेळी कल्याणिंसह यांचा सर्वोच्च न्यायालयातील वावर एखाद्या हिरोसारखा होता. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयात ते नायक म्हणूनच वावरत होते.
 
अयोध्येतील या घटनाचक्रानंतर रामललांच्या जन्माच्या जागी भव्य राममंदिर उभारले जाणार, ही बाब अगदी काळ्या दगडावरील रेघ ठरली. हे मंदिर कसे होणार हा प्रश्न होता. पण, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ पीठाने दि. 30 सप्टेंबर 2010ला निवाडा दिला व वादग्रस्त जागा वगळता उर्वरित जागा कुणाकुणाच्या मालकीची आहे याबाबत निवाडा दिला. 2.77 एकर जागा- 1/3 रामललांना, तर 1/3 निर्मोही आखाड्याला व 1/3 सुन्नी वक्फ बोर्डाची असा हा निकाल होता. हा श्रद्धेचा प्रश्न नव्हता, तर सरळ सरळ टायटल सुट होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यावर सर्वोच्च न्यायालयात सर्वांनीच अपील केले. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी सलग 40 दिवस सुरू ठेवली होती. सुरुवातीला सरन्यायाधीश दीपक मिश्रा या खंडपीठाचे प्रमुख होते. तेव्हा सर्वोच्च न्यायालयातील एक विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सुनावणीच लोकसभा निवडणुकीनंतर सुरू व्हावी, असे सुचविले होते. रंजन गोगई सरन्यायाधीश होताच त्यांनी 5 सदस्यीय पीठ गठित केले. त्यात न्या. ललित यांचा समावेश होता. पण त्यांनी सांगितले की, मी एका खटल्यात कल्याणिंसह यांचा वकील होतो, त्यामुळे या सुनावणीत मी राहणार नाही. त्यानंतर न्या. रंजन गोगई यांनी नवीन खंडपीठ गठित केले. त्यांनी 17 ऑक्टोबरपावेतो युक्तिवाद पूर्ण करायला सांगितले. हेही स्पष्ट केले की, 17 नोव्हेंबरला मी निवृत्त होणार आहे, त्या आधी हा निकाल मला द्यायचा आहे. त्याप्रमाणे न्या. रंजन गोगई, न्या. शरद बोबडे, न्या. डॉ. धनंजय चंद्रचुड, न्या. अशोक भूषण व न्या. एस. ए. नाझर. या खंडपीठाचा निकाल अपेक्षित आहे. चला तर, त्याचा संयमाने स्वीकार करू या.
खरा नायक बनवारीलालजी!
रामजन्मभूमी आंदोनलनातील एक नायक नागपुरातील होते. ते म्हणजे बनवारीलालजी पुरोहित! आज ते तामिळनाडूचे राज्यपाल आहेत. ते भाजपाचे नागपूरचे खासदारही होते. त्या वेळी बनवारीलालजी कॉंग्रेस पक्षाचे नागपूरचे खासदार होते. लोकसभेत रामजन्मभूमी प्रश्नावर चर्चा सुरू होती. गोंडे लावलेल्या टोप्या घातलेले खासदार हिरिरीने रामजन्मभूमीला बाबरी मशीद सिद्ध करण्यासाठी बोलत होते. दोन दिवसांची ती चर्चा होती. दुपारी भोजनाच्या विश्रांतीनंतर चर्चा सुरू झाली. त्या वेळी बनवारीलालजींना सत्तारूढ पक्षाकडून बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी रामललांचा जन्म इथेच झाला हे सांगून मंदिराची आग्रही मागणी केली. त्या चर्चेच्या संथ वातावरणात एकदम खळबळ निर्माण झाली. सभागृह संपल्यावर पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना भेटायला बोलाविले व पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. बनवारीलालजी म्हणाले, रामलला ही माझी श्रद्धा आहे. त्यांची मी घेतलेली मुलाखत त्या वेळी दै. तरुण भारतात प्रसिद्ध झाली.
पुढे रामललांची कारसेवा होणार होती, तेव्हा मी कारसेवेला जात आहे, असे सांगून बनवारीलालजी अलाहाबादला आलेत. त्यांच्या या कृतीमुळे पक्षाने त्यांच्याविरुद्ध कारवाई केली. पण, रामभक्त मात्र त्यांना बिभीषण संबोधू लागले. 1992 साली त्यांची भाषणे खूप लोकप्रिय होत होती. बनवारीलालजींनी नंतर भाजपात प्रवेश केला. एक आधुनिक बिभीषण रामाच्या पक्षात आला व खर्‍या अर्थाने नायक ठरला!
 
सुधीर पाठक