महाराजा विक्रमादित्यद्वारा मंदिरनिर्माण

    दिनांक :10-Nov-2019
|
धर्मग्रंथांच्या आधारे समाजाची धारणा आहे की, जेव्हा श्रीरामाने प्रजेसह दिव्यधामाला प्रयाण केले तेव्हा संपूर्ण अयोध्या, तेथील भवन, मठ-मंदिर सर्व शरयू नदीत समाहित झालेत. अयोध्येचा केवळ भूभाग शेष राहिला. अयोध्या बराच काळपर्यंत ओसाड राहिली. तत्पश्चात कुशावती (कौशाम्बी) येथे राज्य करीत असलेले महाराज कुश पुन्हा अयोध्येत आले आणि अयोध्येला वसविले. याचा उल्लेख महाकवी कालिदास यांच्या ‘रघुवंश’ ग्रंथात आहे. लोमश रामायणानुसार त्यांनी कसोटी दगडांच्या स्तंभांनी युक्त मंदिर जन्मभूमीवर बनविले. जैन ग्रंथांनुसार दुसर्‍यांदा ओसाड झालेल्या अयोध्येला पुन्हा ऋषभदेव यांनी वसविले. भविष्य पुराणात लिहिले आहे की, उज्जयिनीचे राजा विक्रमादित्य यांनी मोक्षदायिनी सप्त पूर वसविले. इ. स. पूर्व 57 मध्ये विक्रमादित्य उज्जयिनीच्या राजिंसहासनावर आरूढ झाले, तेव्हापासून विक्रम शक प्रारंभ झाला. विक्रमादित्याच्या आधी अयोध्या पुन्हा एकदा ओसाड झाली होती. ग्रंथांमध्ये आलेल्या वर्णनानुसार त्यांनी शरयू नदीच्या लक्ष्मण घाटाला आधार मानून विविध स्थळांना चिन्हित करीत 360 मंदिर उभारले. त्यांनी चिन्हित केलेल्या विशेष स्थळांमध्ये रामकोट-राम जन्मभूमी, नागेश्वरनाथ मंदिर, मणिपर्वत इत्यादी प्रमुख आहेत. भगवान विष्णूचे परमभक्त असल्यामुळे विष्णुपद नामक पर्वतावर विष्णुध्वजाची स्थापना केली, तसेच श्रीराम जन्मभूमीवर एक भव्य मंदिर बांधले.
 

 
 
सालार मसूदचे आक्रमण
आक्रमणकारी सालार मसूदने इ. स. 1033 मध्ये साकेत अर्थात अयोध्येत मुक्काम ठोकला होता तेव्हा त्याच वेळी त्याने जन्मभूमीच्या प्रसिद्ध मंदिराला उद्ध्वस्त केले होते. मंदिर तोडून सालार मसूद परत जात होता तेव्हा बहराइच येथे 14 जून 1033 रोजी झालेल्या घनघोर युद्धात, वीर पराक्रमी राजा सुहेलदेव याने त्याचा वध केला. महाराजा सुहेलदेवच्या भीषण युद्धाने हे आक्रमक इतके भयभीत झाले होते की, त्यानंतरच्या शेकडो वर्षांत कुणा आक्रमकांची भारतात येण्याची हिंमतच झाली नाही. गहडवाल वंशीय राजांनी पुन्हा मंदिर बांधून काढले.
 
बाबरचे आक्रमण
इ. स. 1526 मध्ये बाबर अयोध्येकडे आला. त्याने आपली छावणी शरयू नदीच्या पलीकडील तीरावर टाकली. त्याला भारतावर विजय प्राप्त करायचा होता. म्हणून तो आपल्या धर्मगुरूला भेटला. त्यांनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीच्या मंदिराला तोडण्याचा सल्ला दिला. यामुळे हिंदू सैनिकांचे मनोबल तुटेल, असे सांगितले. अशा प्रकारे बाबरने आपला सेनापती मीरबाकीला जन्मभूमीचे मंदिर तोडण्याचा आदेश दिला. इ. स. 1528 मध्ये अयोध्येवर आक्रमण करून जन्मभूमीवर बनलेले मंदिर तोडून तिथे मशीद उभारण्याचा प्रयत्न करताच, हिंदूंच्या प्रचंड प्रतिकारामुळे तो सफल झाला नाही. या कारणामुळे तो तिथे मिनारे उभारू शकला नाही, वजू करण्याचे स्थानही तयार करू शकला नाही. अशाप्रकारे तो एक प्रकारचा ढॉंचाच राहिला. मशीद कधीच झाली नाही. ढॉंच्याच्या बाहेर लागलेल्या दगडावर फारसीत लिहिले आहे- ‘फरिश्तों का अवतरण स्थल.’ त्यावरून हे स्थान जन्मभूमी असल्याची पुष्टी होते. एका ठिकाणी सीता पाक स्थान असेही लिहिले होते. सततचे आक्रमण आणि संघर्षामुळे अयोध्येतील बरीचशी ठिकाणे रिकामी झाली होती.
••
 
• अनुवाद : श्रीनिवास वैद्य