'तानाजी' नव्हे 'तान्हाजी'च!

    दिनांक :10-Nov-2019
|

मुंबई, 
कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी सिंहासारखे लढणारे तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर आधारित चित्रपटाचे नाव ‘तान्हाजी’ ठेवण्याच्या मुद्दय़ावरून चित्रपटकर्त्यांवर समाजमाध्यमातून टीका होत होती. संख्याशास्त्रानुसार हा बदल करण्यात आल्याच आरोप होत होता. मात्र, मालुसरे यांच्या वंशजांपासून ते काही इतिहास अभ्यासकांनी मूळ नाव ‘तान्हाजी’ असल्याकडे लक्ष वेधले आहे. आणि म्हणूनच नावात बदल करण्यात आला असल्याचे चित्रपटकर्त्यांनी स्पष्ट केले.

 
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात नरवीर तानाजी मालुसरे यांना अनन्यसाधारण महत्व आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील तानाजी मालुसरे हे अत्यंत पराक्रमी आणि विश्वासू साथीदार होते. अनेक लोककला आणि बखर वाड्मयात ‘तान्हाजी’ असा उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती मालुसरे यांच्या वंशज डॉ. शीतल मालुसरे यांनी दिली. मोडी लिपीतील कागदपत्रांतही ‘तान्हाजी’ असा उल्लेख आढळतो, असे त्या म्हणाल्या. कोही ऐतिहासिक पुस्तके-पोवाडे यातूनही तान्हाजी असा उल्लेख आहे, यासंदर्भातील माहिती देताना कोल्हापूर येथे पारगड किल्ल्यावर रचलेला पोवाडा, लेखक सचिन पवार यांनीही मावळ्यांविषयी लिहिलेल्या पुस्तकात तान्हाजी असा उल्लेख केला असल्याचे त्यांनी सांगितले.
 
इतिहासप्रेमी आणि अभ्यासक असलेल्या दिग्दर्शक दिग्पाल लांजकेर यांनीही ‘शिवकालीन दस्त’ या पुस्तकात शिवकालीन बखरी आणि पत्रांचे संकलन करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या पान क्रमांक ४३१ वर ‘तान्हाजी मालुश्रा’ असा उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती दिली. प्रामुख्याने शिवकालिन इतिहासावर लिहिणारे लेखक अशोकराव शिंदे (सरकार) यांनी तानाजींवर लिहिलेल्या पुस्तकाचे शीर्षकही ‘नरवीर तान्हाजी मालुसरे’ असे आहे.
 
‘तान्हाजी’ या नावामागचा संदर्भ अधिक उलगडून सांगताना डॉ. शीतल मालुसरे यांनी तान्हाजी या शब्दाचा अपभ्रंश होत तानाजी असे नाव पडल्याचे सांगितले. तानाजींचा जन्म हा सातारा जिल्ह्य़ातील जावळी तालूक्यातील गोडोली गावचा आहे. तेथे तपनेश्वराचे शंकराचे मंदिर आहे, तानाजींचे वडील सरदार काळोजीराव हे मोठे शिवभक्त होते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी जन्मलेल्या आपल्या बाळाचे नाव त्यांनी शंकराच्या नावावरून तान्हाजी असे ठेवल्याची माहिती डॉ. शीतल यांनी दिली.
 
सिंहगडावर मालुसरे यांचा जो पुतळा आहे, त्यावर ‘तान्हाजी मालुसरे’ असेच नाव देण्यात आले आहे. याशिवाय, तान्हाजी मालुसरेंच्या वंशज असलेल्या डॉ. शीतल मालुसरे यांनीही तानाजी यांचे मूळ नाव तान्हाजीच असल्याचे आम्हाला सांगितले होते. त्यामुळे चित्रपटाचे शीर्षक ‘तान्हाजी’ असे करण्यात आले आहे.
 
 -ओम राऊत, 
दिग्दर्शक – तान्हाजी