शिवसेनेच्या हाती धुपाटणे!

    दिनांक :11-Nov-2019
|
परवा रामजन्मभूमी खटल्याचा चांगला निर्णय आला. एमआयएमच्या ठेवणीतल्या कुरबुरी सोडल्या, तर त्याचे सर्वच राजकीय पक्षांनी स्वागतच केले. कुठल्यातरी प्रश्नावर अशी राजकीय सहमती बघायला मिळाली याचा आनंद व्यक्त करत असताना, राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असल्याची काळी किनार त्याला आहे. शिवसेनेने अद्याप आपला हट्‌टाग्रह सोडलेला नाही. रामजन्मभूमीच्या संदर्भात शिवसेनेची आग्रही भूमिका याआधी त्यांनी दाखवून दिली आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी अयोध्येचा दौरा केला होता. त्या प्रश्नावर आम्ही भाजपापेक्षाही अधिक आग्रही- आक्रमक आहोत, हेच त्यांना दाखवून द्यायचे होते. आता नेमका तो प्रश्न असा सुटला असताना आणि मंदिरनिर्माणाचे काम हाती घ्यायचे असताना, शिवसेना मात्र युती तोडू की जोडू, याच संभ्रमात आहे. राज्यात काय होईल, हा प्रश्न अद्याप कायम आहे. हा सारा प्रवास राष्ट्रपती शासनाच्या दिशेने होतो आहे का? 

 
 
 
भाजपाला सर्वाधिक जागा असलेला पक्ष म्हणून राज्यपालांनी पाचारण केले होते. शिवसेनेसोबत संवादाची शिकस्त झालेली असल्याने, आता त्यांना पुन्हा पाठिंबा मागण्याचे पत्र देण्यापेक्षा भाजपाने शिवसेनेला सरकारस्थापनेसाठी शुभेच्छाच दिल्या आहेत. तडजोडीचे किंवा जोडतोडीचे राजकारण आम्ही करणार नाही, असे फडणवीस म्हणाले होते. त्यांनी शुचितेचा मार्ग सोडला नाही. आता शिवसेनेची गोची झालेली आहे.
 
 
जनादेशाचा हा घोळ आहे का? मतदार संभ्रमात होते म्हणून असे आता घडते आहे का? अगदी सहज वरवरचे विश्लेषण करायचे झाले तर तसे म्हणता येईल, मात्र ते तसे नाही. जनतेने भाजपा-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यात भाजपा सर्वाधिक जागा असलेला मोठा पक्ष म्हणून त्याला मतदारांनी मान्यता दिली आहे. भाजपाने आधीपासूनच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचेच नाव नि:संदिग्धपणे समोर केले होते. ते तसे आधी कुठल्याही पक्षाने केलेले नव्हते. अगदी शिवसेनेनेदेखील नाही. निवडणुकीनंतरही जो काय निकाल लागेल; पण मुख्यमंत्री म्हणून आमचा हाच नेता असेल, असे शिवसेनेने प्रचारकाळात म्हटलेले नव्हते. उलट, फडणवीस आत्मविश्वासाने सांगत होते की, मी पुन्हा येणार! मग त्या वेळीच शिवसेनेने त्याला विरोध का नाही केला? त्या वेळी शिवसेनेकडून हाच विचार केला गेला असावा की, निकाल काय लागतात त्यावरून आपली भूमिका ठरवू या... मतदारांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली आहे, कारण ते मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार- दावेदार म्हणूनच प्रचारात होते. आता जनतेच्या या पसंतीला नकार देणे, ही जनभावनेशी प्रतारणा झाली.
 
 
शिवसेनेच्या या हट्‌टामुळे राज्यात त्यांचे हसे होत आहे आणि भाजपाची साथ सोडल्याने पोरकेपणाची त्यांची अवस्था झालेली आहे. दोन्ही काँग्रेसचे धुरंधर त्यांचा खेळ करत आहेत. शिवसेनेच्या वाघाचा विदूषक झालेला आहे. वाघाचे शेपूट शेळीसारखे झालेले आहे. त्याने लाजही झाकता येत नाही अन्‌ माश्याही हाकलता येत नाहीत. जनभावनाही त्यांच्या विरोधात गेलेली आहे. उलट, भाजपाने प्रगल्भ सभ्यपणा सोडलेला नाही. भाजपाने नेहमीच मैत्रीचीच भाषा केलेली आहे. निकाल लागल्यावरही भाजपाची भूमिका बदललेली नव्हती. सत्तेत शिवसेनेला जो काय वाटा ठरला होता तो तसाच देण्याची भाजपाची भाषा आतावर केली गेली आहे. सेनानेते मात्र संवादालाही तयार नाहीत. कुणाच्याही इतक्या जवळ जाऊ नये की, दोघेही एकमेकांना नीट दिसूही नयेत अन्‌ इतक्या दूरही जाऊ नये की पुन्हा जवळीक शक्यच होणार नाही... हे सार्वजनिकच नाही, तर वैयक्तिक जीवनातलेही सूत्र शिवसेना विसरली. त्यांनी आता इतके ताणले आहे की, आता त्यांना इच्छा असतानाही पुन्हा भाजपाच्या जवळ जाणे अशक्य होऊन बसले आहे. त्यांची अवस्था आता ‘तेलही गेले, तूपही गेले अन्‌ हाती आले धुपाटणे,’ अशीच झाली आहे. एखाद्या मित्राच्या बालिशपणाचा फायदा शत्रूच घेत असतो, याचे दाखले इतिहासात अनेक आहेत, मात्र शिवाजी महाराजांचे राज्य आणण्याची भाषा करणारे शिवसेनानेते मात्र त्यापासून काही शिकलेले नाहीत, असेच दिसते आहे.
 
 
या सार्‍यांचे फलित हेच की, शिवसेनेचे राजकीय नुकसान होणार. आता भाजपाने भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे राज्यपालांना काय तो निर्णय घ्यायचा आहे अन्‌ जे काय होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी शिवसेनेवर आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसआघाडीने तर आधीच, आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश दिला आहे, असे म्हणत सत्तास्थापनेपासून फारकत घेतली आहे. त्यामुळे आता राज्यपाल सर्वात मोठा दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून शिवसेनेला पाचारण करू शकतात. निवडणूकपूर्व आघाडीचा विचार केला, तर संख्याबळ आघाडीकडे आहे. त्यांना निमंत्रण दिले तर तेही शिवसेनेलाच पाठिंबा मागू शकतात. तसे होण्याची शक्यता फारच कमी आहे. भाजपाने आपली भूमिका कधीही सोडलेली नाही.
 
शिवसेनानेते सतत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्क साधत असताना भाजपाने युती-धर्म सोडलेला नाही. त्यांनी कधीही असला प्रयत्न केलेला नाही. युती-धर्म सोडून शिवसेना मात्र बाहेरच्यांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करत राहिली आहे. ते मात्र आपल्याला खेळवत आहेत, हे अद्याप शिवसेनेच्या कथित चाणक्यांना कळलेले नाही. संजय राऊतांचे आलेले मोबाईल संदेश अजित पवार सार्वजनिक करतात, पक्षाच्या बैठकीत वाचून दाखवितात अन्‌ तरीही यांना शहाणपण येत नाही. गेली पाच वर्षे सरकारात सोबत असतानाही शिवसेनेने मैत्रीपूर्ण वागणूक ठेवलेली नाही. विरोधकांनीही केली नाही त्याहीपेक्षा कडवी आणि प्रसंगी अश्लाघ्य भाषा शिवसेनेने आपल्याच सरकारातील मित्राबद्दल वापरली. भाजपाच्या मोठ्या आणि आदरणीय नेत्यांचा तेजोभंग केला, तरीही भाजपाने घरातल्या गोष्टी घरातच शांत करण्याचा प्रयत्न केला.
 
 
शिवसेना नेहमीच रेम्या डोक्याच्या भरकटलेल्या तरुणासारखी वागत आलेली आहे. त्यांचे सळसळत्या रक्ताच्या भावनेने पेटलेल्या तरुणासारखे झालेले आहे. मित्राचा मुखवटा धारण केलेले पोरटे म्हणतात, इतका मोठा झाला अन्‌ अद्याप दारू नाही प्यायलास? अन्‌ मग हा दारू पितो... बाप कळवळ्याने समजावत राहतो की, अरे हे वाईट आहे आणि ज्यांना तू मित्र समजतोस ते तुझे मित्र नाहीत. तरीही त्या नादान तरुणाला ते कळत नाही. तसलीच अवस्था शिवसेनेची आहे. त्यांनी आता इतके ताणले आहे की, आता ते भाजपाकडे जाऊ शकत नाहीत. राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले, तरीही ते आता भाजपाकडे जाऊ शकत नाहीत. दोन्ही काँग्रेसकडे गेल्यास काय होणार, हे स्पष्ट आहे. मिलिंद देवरा यांनी आताच सांगून टाकले आहे की, मुख्यमंत्री काँग्रेसचा होणार असेल, तरच शिवसेनेला पाठिंबा दिला जाईल. त्यानंतर शिवसेनेला युतीची आठवण झाली. मात्र, त्यांनी इतका दुरावा साधला आहे की, आता भाजपाच्या जवळ येण्याची त्यांनाच लाज वाटते आहे. वास्तवात घरी परत येणे हाच पर्याय आहे, हे त्यांनाही कळून चुकले असावे, पण...
 
 
आघाडीला सत्तास्थापनेचे निमंत्रण मिळाले, तर तेदेखील शिवसेनेलाच पाठिंबा मागू शकतात आणि मग शिवसेनेचा पेच वाढेल. शिवसेनेची अवस्था आता आयुष्य हेच आहे आणि हाच पेच आहे, अशी झालेली आहे. आघाडीला पाठिंबा दिल्यावर ते काही शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देऊच शकत नाही. सरकारात वागणूकही काफिराचीच असेल. असे असताना सन्मानाने भाजपासोबतच राहणे अधिक योग्य आहे, हे तेव्हा आठवण्यापेक्षा आताच ते कळले असते तर अधिक शहाणपणाचे ठरले असते! आताही भाजपा त्यांना माफ करेल अन्‌ तसली माफी मागण्याचा शहाणपणा त्यांनी दाखविला नाही, तर महाराष्ट्राची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही!