अमोल पालेकरांचे रंगभूमीवर पुनरागमन

    दिनांक :11-Nov-2019
|
ज्येष्ठ अभिनेते आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते अमोल पालेकर रंगभूमीवर २५ वर्षांनी पुनरागमन करण्यास सज्ज आहेत. हिंदी नाटक ‘कसूर’मधून ते रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. ‘कसूर’ या नाटकाची निर्मिती जे.एस.डब्ल्यू आणि अनान यांनी एकत्रितरित्या केली असून नाटकाचं दिग्दर्शन संध्या गोखले आणि अमोल पालेकर यांनी केलं आहे. विशेष म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने अमोल पालेकर तब्बल २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगमंचावर वावरतांना दिसणार आहे. अमोल पालेकर २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करणार असून याच दिवशी टाटा थिएटर, एनसीपीए, मुबंईमध्ये या नाटकाच्या शोचा प्रीमियर होणार आहे. या नाटकामध्ये पालेकर मुख्य भूमिकेत झळकणार असून ते सेवानिवृत्त एसीपी दंवडते यांची व्यक्तीरेखा साकारणार आहेत.
 
 
 
“कलाकार म्हणून या वयामध्ये ही भूमिका निभावणं आव्हानात्मक आहे. कारण, या पात्रासाठी जबरदस्त भावनात्मक आणि शारीरिक ऊर्जेची आवश्यकता आहे. वेगाने पुढे जाणारी ही कथा अचानक वळण घेत असल्याने, नाटक पाहताना तुम्ही केलेला विचार चुकीचा ठरतो. गंभीर विषयामुळे पडदा पडल्यानंतरही हे नाटक प्रेक्षकांच्या मनात घोळत राहिल” असं पालेकर म्हणाले. तर, या नाटकाला सोशल थ्रिलर असंही म्हटलं जाऊ शकतं, असं कथा लिहिणाऱ्या संध्या गोखले यांनी म्हटलंय. अमोल पालेकर ७५ व्या वर्षामध्ये पुनरागमन करणार असून आजही त्यांच्यातील अभिनयाची आवड तसूभरही कमी झालेली नाही. त्यामुळेच त्यांना परत एकदा रंगमंचावर पाहायला प्रेक्षक आतूर झाले आहेत.