नोटबंदीमुळे मंदी आली की काय?

    दिनांक :11-Nov-2019
|
गेल्या तीन वर्षांपूवीची ती 8 नोव्हेंबरची रात्र कोण बरे विसरेल? त्या रात्री 8 वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेमुळे 500 रुपये व 1000 रुपयांच्या नोटा रद्दीत जमा झाल्या होत्या! त्यानंतर सुमारे पावणेदोन महिन्यांपर्यंत नोटा बदलून घेण्यासाठी जी सर्वसामान्यांसह श्रीमंतांचीही धावपळ झाली ते आठवून आजही अंगावर काटा येतो. ती रात्र म्हणजे 500 रु. व 1000 रु.च्या नोटांच्या स्वरुपात प्रचंड प्रमाणावर काळा पैसा बाळगणार्‍या दृष्टीने काळरात्रच ठरली होती.
नंतर काही दिवसांनी 2000 रुपये व 500 रुपयांच्या तसेच 200 रुपयांच्या नव्या नोटाही जारी करण्यात आल्या. कालांतराने 100 रु., 50 रु. व 10 रु. च्या नोटांनीही नवे रुप धारण केले. तरीही जुन्या शंभर, पन्नास व दहा रुपयांच्या नोटा अजूनही चलनातच आहे.
 
 
 
नोटबंदीमागे सरकारचा उद्देश भारी किमतीच्या नोटांमध्ये दडवलेला काळा पैसा शोंधून काढणे हा होता. तो काही प्रमाणात सफल झालेला असला तरी आता अर्थव्यवस्थेला गेल्या काही महिन्यांपासून ग्रासत असलेल्या मंदीच्या संकटाला नोटबंदी कारणीभूत असल्याची आवई उठविण्यात येत आहे. अनेक जागतिक किर्तीचे नामवंत अर्थतज्ञ म्हणवणार्‍यांनीही तिचीच री ओढीत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे यापैकी काही जण हे देशातील अनेक उच्च पदांवरही राहिलेले आहेत. तरीही ते त्यांच्या काळात काळ्या पैशाच्या प्रभावाला आळा घालू शकले नव्हते. उलट काळा पैशाचे व्यवहार करणार्‍यांना त्यांनी रोखण्याचे प्रयत्नही केले नव्हते.
आता मंदीच्या बाबतीत पहिले तर केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाला आर्थिक सुस्तीने वेढलेले आहे. याची काही राजकीय व आर्थिक कारणेही आहेत. त्यात अमेरिका-चीन व्यापार युद्ध (ट्रेड वॉर), दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या महागाईमुळे मर्यादित उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गाची घटती क्रयशक्ती व अतिरिक्त उत्पादनाचा खप वाढविण्यासाठी आवश्यक तेवढी ग्राहकांची संख्या नसणे यांचाही समावेश आहे.
या संदर्भात एका सर्वेक्षणानुसार नोटबंदीमुळे काळ्या पैशाच्या व्यवहारात मोठी घट झालेली आहे. तर करवसुलीत वाढ होत आहे.
• विजय सरोदे
(लेखक जळगाव तरुण भारतचे
अर्थविषयक स्तंभलेखक आहेत.)