कर्मचार्‍यांचा काढावा विमा

    दिनांक :11-Nov-2019
|
आंतरराष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना व्यावसायिक कारणांसाठी परदेशी जावं लागतं. अनेक जण कामासाठी वरचेवर परदेशात जातात. पर्यटनासाठी परदेशात जाणार्‍यांच्या तुलनेत व्यावसायिक कारणांसाठी परदेशात जाणार्‍यांच्या गरजा वेगळ्या असतात. कामानिमित्ताने परदेशात जाणार्‍यांनी प्रवास विमा काढून घ्यायला हवा. किमान कंपनीने त्यांच्या प्रवासविम्याची तरतूद करायला हवी.
कर्मचारी कंपनीच्या कामासाठी परदेशात जाण्याचा धोका पत्करतात. त्यामुळे त्यांचा परदेश दौरा ही पूर्णपणे कार्यालयाची किंवा कंपनीची जबाबदारी असते. याच कारणामुळे बर्‍याच कंपन्या कर्मचार्‍यांच्या प्रवास विम्यासाठी निधी राखून ठेवत आहेत. कर्मचार्‍यांच्या परदेश दौर्‍यात कंपनीचे पैसे गुंतलेले असतात. त्यातच काहीच अडचण आली तर कंपनीचं आर्थिक नुकसान होऊ शकतं.
 
 
 
 
महत्त्वाचं म्हणजे असे दौरे कधीही रद्द होऊ शकतात. बरेचदा कार्यक्रमात बदलही संभवतो. अशा वेळी विमा पॉलिसी तुमच्या मदतीला धावून येते. व्यावसायिक प्रवास विमा पॉलिसीमध्ये काही वेगळ्या तरतुदी असतात. दौरा रद्द झाला तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते. व्यावसायिक कारणांसाठी परदेश दौर्‍यावर जाणार्‍या कर्मचार्‍यांकडे कंपनीची महत्त्वाची कागदपत्रं, लॅपटॉप, टॅबलेटसारखी महागडी उपकरणं आणि इतर महागड्या वस्तू असतात. प्रवासादरम्यान सामान हरवण्याचा किंवा चोरीला जाण्याचा धोका असतां. बरेचदा या वस्तू कंपनीने दिलेल्या असतात. प्रवास विमा काढण्यात आला नाही तर कंपनीचं बरंच नुकसान होऊ शकतं.
कर्मचारी परदेशात आजारी पडू शकतात. परदेशातल्या आरोग्यसेवेचा खर्च प्रचंड असतो. हा खर्च कंपनीला करावा लागतो. अशा वेळी प्रवास विमा पॉलिसी कामी येते. कर्मचार्‍याला अचानक आजारपण आल्यास किंवा अपघात झाल्यास प्रवास विम्यामुळे नुकसान भरपाई मिळू शकते. बर्‍याच कर्मचार्‍यांना वर्षातून दोन किंवा तीन वेळा परदेशात जावं लागतं. अशांसाठी वार्षिक प्रवास विम्याची सुविधा उपलब्ध आहे. हा विमा काढून घेतल्यावर कंपनीला वर्षभर काहीच काळची करावी लागत नाही. त्यामुळे कामासाठी परदेश दौर्‍यावर जाणार्‍या कर्मचार्‍यांंचा विमा काढणं गरजेचं आहे.