अंदमान यात्रा

    दिनांक :12-Nov-2019
|
• उषा अनिरुद्ध मुरकुटे
आसेतू हिमाचल प्रवास केला. चार धाम, सप्तपुरी, बारा जोतिर्लिंग अशा परमेश्र्वरी अधिष्ठानाच्या सर्व क्षेत्रांतून प्रवास झाला. परंतु, मनुष्याने पावन केलेले परमधाम म्हणजेच अंदमान अजूनही टप्प्यात यायचेच होते. 2019 चा स्वातंत्र्यदिन अंदमानमध्ये साजरा करायचे ठरवून सपरिवार आम्ही अंदमानला निघाले. साधारणत: कोलकाता किंवा चेन्नई या दोन ठिकाणांवरून अंदमानला जाता येते. आम्ही नागपूर ते कोलकाता आणि कोलकाता ते अंदमान असा विमानाने प्रवास केला. संपूर्ण प्रवासात, वीर सावरकर यांचा जीवनपट सतत डोळ्यांसमोर तरळत होता. ’वीर सावरकर विमानतळ’ अंदमान या विमानतळावर उतरलो. ’सेंट्रल आयलॅण्ड अॅग्रिकल्चर’ या संस्थेच्या अतिथिगृहात आमची राहण्याची व्यवस्था केलेली होती. त्याच संध्याकाळी कॉर्बिन कोव्ह या नयनरम्य समुद्रकिनार्‍यावर गेलो.
 
रिमझिम बरसत असलेल्या पावसात सागरीकिनारा मोहक भासत होता. ज्या सागराने स्वातंत्र्यवीराचे पाय धुतले ते पाणी पायाला लागताच विलक्षण, अचाट आणि अप्रतिम अशा अनुभूतीचा वावर स्वत:भोवती वाटू लागला व जीवन धन्य झाले असे भासू लागले. रात्री, सेल्युलर जेलमधील ’लाईट अॅण्ड साऊंड शो’ पावसात भिजतच पाहिला. साऊंड शो जसा सुरू झाला तसाच त्या काळी स्वातंत्र्यवीरांवर होणारा अन्याय, क्रौर्याला लाजवील अशा शिक्षा, विव्हळणे, ओरडणे, चीत्कार, वंदे मातरम्‌ आणि भारत माता की जय अशा आवाजांचा हा चित्रपट आपल्या सहनशीलतेच्या बाहेरचा आहे, असे जाणवू लागले. 11 वर्षे तेथील अन्यायाच्या विरोधात पाय रोवून असणार्‍या वि. दा. सावरकर यांच्यापुढे मस्तक नकळतच झुकले! 

 
 
दुसरे दिवशी क्रुझने हॅवलॉक बेटावर गेलो. समुद्रसफर रोमांचित व आंनददायी होती. जगातील पाचव्या क्रमाचा मानला जाणारा असा राधा बीच आणि कालापत्थर बीच पाहिला. अथांग सागरकिनार्‍यावर सुपारी आणि नारळांची झाडे आणि लक्ष वेघून घेणारी पेमा झाडे असा निसर्गाचा लेहजा काही वेगळाच होता! हॅवलॉक ते अंदमान असा परतीचा प्रवास पुन्हा क्रुझद्वारे सुरू झाला. यावेळी समुद्र अचानक बिथरला! दहा ते बारा फुटांची पाण्याची लाट बोटीवर आदळायला सुरुवात झाली. बोट सारखी वर-खाली होऊ लागली, प्रवासीकी किंचाळू लागले, काहींची प्रकृती बिघडली. साधारणत: एक तासाचा हा जीवघेणा प्रकार आणि थरार अनुभवला. खवळलेला समुद्र ऐकीवात होता, पण अनुभवलेला समुद्र अत्यंत भयावह होता. अंदमानला पोहोचल्यावर बोटीवरील सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
 
 
चौथ्या दिवशी सकाळी आम्ही प्रमुख स्थळी म्हणजेच सेल्युलर जेलमध्ये आलो. जेलच्या सात इमारतींपैकी आता उरलेल्या तीन बराकींच्या इमारती चांगल्या अवस्थेत आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये तीन मजले मिळून 693 खोल्या होत्या, त्यापैकी पहिल्या इमारतीतील तिसर्‍या मजल्याच्या अगदी शेवटी स्वातंत्र्यवीर सावकरांची कोठी होती. महात्म्याची ती खोली आणि आत ठेवलेला तात्यांचा फोटो यांस दंडवत केले आणि आपसूकच डोळे पाणावले. जेलच्या आंगणात असलेला मोठा वृक्ष आपल्याला त्या काळची माहिती देत आहे असेच वाटते. जवळच अॅक्टिव्हिटी सेंटर म्हणून एक छोटेखानी हॉल आहे. तेथे कैदी लोकांकडून काम करवून घेत असत, तेथेच शिक्षापण होत असे. कोलू फिरवणे, उघड्या शरीरावर फटके मारणे व इतर सर्व प्रकारांनी त्रास देणे, असा इतिहास गाईडकडून ऐकताना अंगाची लाहीलाही होत होती. इंग्रजी अधिकार्‍याला भिडून सांगणार्‍या सावरकरांचा बाणा तरळू लागला. ‘‘पन्नास वर्षे तुम्ही येथे टिकतच नाही!’’ अशी ग्वाहीच त्यांनी देऊन टाकली होती. मातृभूमी लवकरच स्वतंत्र होईल, ही दुर्दम्य आशा बाळगणारा श्रेष्ठ क्रांतिकारक, मातृभूमीला ललामभूत असलेले वीर सावकर पुन्हा होणे नाही, असे नकळतच जाणवून येते! रुद्ध कंठाने वीर सावरकरांना अभिवादन करून, जड पावलांनी आम्ही तेथून परतलो. त्याच दिवशी समुद्रिका म्युझियम, अॅक्वेरियम व वंडर बीचला जाऊन सूर्यास्त बघितला. पुढच्या दिवशी स्वातंत्र्यदेवतेचे पूजन करून परतीचा प्रवास सुरू केला. सावरकरांना आठवून आठवून भारावलेल्या मन:स्थितीतच नागपूरला सुखरूप येऊन पोहोचलो!

9822296295