दिवस-रात्र कसोटीसाठी भारतीय संघाचे इंदूरमध्ये सरावाचे आयोजन

    दिनांक :12-Nov-2019
|
इंदूर, 
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेत विजय मिळवला. दिल्लीच्या मैदानात पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर, भारतीय संघाने राजकोट आणि नागपूरच्या मैदानावर दणक्यात पुनरागमन केलं. या मालिकेनंतर भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. १४ नोव्हेंबरपासून इंदूरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु होणार आहे.

 
मात्र या कालावधीदरम्यान भारतीय संघाने आपल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याची तयारी सुरु केली आहे. २२ नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर दिवस-रात्र कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ इंदूरमध्ये आपल्या सरावसत्रातले काही तास गुलाबी चेंडूवर सराव करणार आहे. इंदूरच्या मैदानाचे मुख्य क्युरेटर समंदरसिंह चौहान यांच्याकडे भारतीय संघाने सरावासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.
“भारतीय संघ मंगळवारी संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान गुलाबी चेंडूवर सराव करणार आहे. आम्हाला भारतीय संघाने यासाठी विनंती केली होती, आणि त्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत”, क्युरेटरने प्रसारमाध्यमांना माहिती दिली. आतापर्यंत भारतीय संघ एकही दिवस-रात्र कसोटी सामना खेळलेला नाहीये. सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर संघटनेत बदलांचे वारे वहायला लागले आहेत. त्यामुळे कसोटी मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.