सार्वत्रिक निवडणुकीत काश्मीरचा मुद्दा नको

    दिनांक :12-Nov-2019
|
ब्रिटनमधील मजूर पक्षाची कणखर भूमिका 

 
 
लंडन, 
येत्या 12 डिसेंबर रोजी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार काळात जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला जाऊ नये आणि भारतविरोधी भूमिकाही घेतली जाऊ नये, असे स्पष्ट मत मजूर पक्षाने मांडले आहे.
 
 
जम्मू-काश्मीर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा नसून, तो भारताचा अंतर्गत विषय आहे आणि हा मुद्दा निवडणुकीत उपस्थित करण्यास येथील भातीयांनीही तीव्र विरोध केला आहे. त्यांच्या भावनांचा सन्मान केला जावा, असे मजूर पक्षाचे अध्यक्ष इयान लेव्हेरी यांनी जारी केलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
 
 
काश्मीर प्रश्नी तिसर्‍या कोणत्याही देशाला हस्तक्षेपाचा अधिकार नसताना, अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित करणे योग्य होणार नाही. हा प्रश्न भारत आणि पाकिस्तानलाच चर्चेतून सोडवू द्या, असेही या पत्रात म्हटले आहे.
 
केवळ काश्मिरातच मानवी हक्काचे उल्लंघन होत आहे, हा समज चुकीचा आहे. एक तटस्थ आंतरराष्ट्रीय सदस्य म्हणून, आपण जगभरात होत असलेल्या मानवी हक्काच्या उल्लंघनाकडेही पाहायला हवे. जगात फक्त काश्मीर हाच एक गंभीर विषय नाही. जगाच्या पाठीवर कुठेही मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्यास, त्याची आपल्याला काळजी वाटायलाच हवी, असेही इयान लेव्हेरी यांनी स्पष्ट केले.
 
आपल्या देशात वास्तव्य करणार्‍या भारतीयांची सं‘या फार जास्त आहे आणि त्यांच्या भावनांचा आपण सन्मान करायलाच हवा. सप्टेंबरमध्ये माझ्या पक्षाने एका परिषदेत घाईघाईत काश्मीरवर ठराव पारित केला होता, पण त्यानंतर आम्हाला आपल्या चुकीची जाणीव झाली. या ठरावात भारतविरोधी भाषा वापरायला नको होती, याची जाणीव आम्हाला झाली, असेही त्यांनी पत्रात नमूद केले.