अमेरिकी सैनिकांना मारणार्‍या अतिरेक्याला पाकी आश्रय

    दिनांक :12-Nov-2019
|
-निक्की हेले यांचा नवीन पुस्तकात दावा
 
 
वॉशिंग्टन, 
अमेरिकी सैनिकांना ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या अतिरेक्याला पाकिस्तानने आश्रय दिल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेले यांनी केला आहे. 

 
 
 
हेले यांचे नवीन पुस्तक ‘विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट : डिफेन्डिंग अमेरिका विथ ग्रीट ॲण्ड ग्रेस’ मंगळवारी पुस्तकांच्या दुकानात दाखल झाले आहे. अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात निधी लाटणार्‍या पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेविरोधातच केवळ मतदान केले नाही, तर अतिरेक्यांनाही आश्रय दिल्याचे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितले, त्यावेळी पाकिस्तान प्रचंड खवळले होता, असे हेले यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.
 
 
इतर देशांच्या तुलनेत आम्ही पाकिस्तानला कितीतरी जास्त निधी दिला. मात्र, त्याचा उपयोग झालेला नाही. 2917 मध्ये अमेरिकेने 100 कोटी डॉलर्सचे लष्करी साह्य केले होते. संयुक्त राष्ट्रसंघातील एकूण कामकाजापैकी 76 टक्के वेळी पाकिस्तानने आम्हाला विरोध केला. अमेरिकी सैनिकांना ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या अतिरेक्याला आश्रय देण्याचा सर्वाधिक वाईट प्रकार पाकिस्तानने केला, असेही हेले यांनी आपल्या नवीन पुस्तकात म्हटले आहे.
 
 
यासह इतर तथ्ये मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर ठेवली. त्यानंतर लगेच त्यांनी, अमेरिकी हितासाठी आणि अमेरिकेच्या मित्रांनाच अमेरिकेचा विदेशी निधी देण्याचा ठराव पारित करावा, असे त्यांनी काँग्रेसला सांगितल्याचा उल्लेख त्यांनी पुस्तकात केला आहे.