नृत्याचा सराव करताना विद्यार्थीनीचा मृत्यू!

    दिनांक :12-Nov-2019
|
*सेन्ट अ‍ॅन्स् पब्लिक स्कूलमधील घटना
वरोडा, 
वरोडा शहरातील सेन्ट अ‍ॅन्स् पब्लिक स्कूलच्या 7 व्या वर्गात शिकणार्‍या 13 वर्षीय विद्यार्थीनीचा शाळेत नृत्याचा सराव करीत असताना अचानक मृत्यू झाल्याने शोककळा पसरली.
शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मंगळवारला सुट्टीच्या दिवशी शाळेत विद्यार्थीनींना नृत्याचा सराव करण्यासाठी बोलावले होते. रूचा दिलीप दातारकर ही विद्यार्थीनी नजिकच्या टेमुर्डा येथून सकाळी 8 वाजताच्या दरम्यान शाळेत आली. त्यावेळी शाळेच्या शिक्षिका सपना या 15 मुलींचा सराव घेत होत्या. बराच वेळ मुलींनी सराव केल्यानंतर रूचाला भोवळ आली आणि तिला अस्वस्थ वाटू लागल्याने ती जमिनीवर कोसळली. तेव्हा काही शिक्षकांच्या सहायाने तिला डॉ. विजय चांडक यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही घटना पालकांना कळताच पालकांनी मोठ्या प्रमाणात दवाखान्यात गर्दी केली आणि शालेय प्रशासनावर रोष व्यक्त केला. घटनेची तक्रार शाळेचे जनसंपर्क अधिकारी योगेश ठक्कर यांनी पोलिसात नोंदवली.
 
 
 
यासंदर्भात डॉ. चांडक यांना विचारले असता, विद्यार्थीनीचा मृत्यू हायपर कोलोस्ट्रालने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. तर पालकांनी रूचा व्यवस्थित होती. अलिकडे तिचे कोलोस्ट्रालचे प्रमाण कमी झाले होते आणि सकाळी ती स्वत:चा ‘टिफीन’ तयार करून शाळेत गेल्याचे सांगितले. यासंदर्भात शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ब्लेसी पिटर या रुग्णालयात न आल्यामुळे भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
आजारपणात विद्यार्थ्यांना परिक्षेकरिता आणि विविध उपक्रमांसाठी हजर राहणे सातत्याने बाध्य केले जात असल्याचे पालकांनी सांगितले. पोलिस निरीक्षक उमेश पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.