ट्रक दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

    दिनांक :12-Nov-2019
|
 
 

 
 
हिंगणघाट,
राष्ट्रीय महामार्गावरिल येरला जवळच्या पुलावर काल सायंकाळी झालेल्या अपघातात दोन मोटरसायकिल स्वारांचा मृत्यु झाला.
दोन्ही मृतक जवळच्या पोहणा (ता. हिंगणघाट) येथील रहिवासी असून मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने त्यांचा अपघात झाला. या अपघातात चंदू चरडे याचा जागीच मृत्यु झाला तर दूसरा सुनील सिताराम नेहारे याचा हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला. राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वरिल येरला या गावाजवळ  असलेल्या पुलावर रस्त्याचे दुरुस्तीचे काम चालू असल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. मृतक सुनील व चंदू हे दोघे शेतातील इंजनकरीता डीजल आणण्यासाठी  वड़कीजवळ असलेल्या पेट्रोलपंपवरती गेले होते, परत येतांना यवतमाळ-वर्धा जिल्हा सिमेवरती असलेल्या पुलावर त्यांचा मागून येणाऱ्या आरजे-११ जिए ८०७१ या ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिल्याने त्यांना गंभीर अपघात झाला, त्यात चंदू याचा घटनास्थळीच मृत्यु झाला. अपघात एवढा जबरदस्त होता की चंदू याची कवटी बाहेर आली. ट्रक चालकाने मृतकाच्या मोबाइलवरुन त्याच्या मालकास अपघाताची माहिती दिली.व घटनास्थळावरुन पसार झाला यादरम्यान तेथून योगायोगाने जात असलेल्या रुग्णवाहिकेने त्या दोघांना वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. चंदू चरडे यांस मृत घोषित करत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर जखमी सुनील यांस हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठविले, परंतु सुनील याचासुद्धा मृत्यु झाला. सुनील हा मुळचा यवतमाळ जिल्ह्यातील करंजी येथील रहिवासी असून शेतगड़ी म्हणून शिक्षक सुनील चौधरी यांचेकडे काम करायचा,तो आपल्या पत्नी व दोन मुलांसह पोहणा येथेच निवासास होता. घटनास्थळीच मृत्यु पावलेला चंदू हा पोहणा येथीलच रहिवासी असून त्याचा पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ज्या ट्रकने अपघात झाला तो ट्रक वडनेर पोलिसांनी ताब्यात घेतला असून ट्रकचालक व क्लीनर फरार आहेत.