विदर्भ हाऊसिंग वसाहतीतील नाली चोरीला!

    दिनांक :12-Nov-2019
|
*रामनगर पोलिसात तक्रार
*बांधकाम विभागाचा अजब कारभार
 
चंद्रपूर,
स्थानिक नगिनाबाग प्रभाग क्रमांक 13 मधील विदर्भ हाऊसिंग वसाहतमधील नालीच चोरीला गेल्याचा अजब प्रकार समोर आला. या प्रकाराने सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 चे पितळ उघडे पडले आहे. या वसाहतीमध्ये केवळ सिमेंट रस्ता व पेवर्स बांधकाम करण्यात आले. पण, विभागाने लावलेल्या फलकात सिमेंट रस्ता, पेवर्ससह नालीचे बांधकाम पूर्ण झाल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी ही नाली चोरीला गेल्याची तक्रार रामनगर पोलिसात केली आहे.
 
 
 
डिसेंबर 2018 मध्ये विशेष अनुदान कार्यक्रमांतर्गत महानगरात विविध विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले. यामध्ये स्थानिक नगिनाबाग प्रभाग क्रमांक 13 मधील विदर्भ हाऊसिंग वसाहतीमधील एक सिमेंट रस्ताही मंजूर करण्यात आला होता. या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पेवर्स व नाली बनविणे निविदेत होते. पण, कंत्राटदाराने नालीच बनवली नाही. विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागाने या परिसरात लावलेल्या फलकात नाली, पेवर्स व नालीचे बांधकाम पूर्ण झाल्याचा नामोल्लेख केला आहे. याशिवाय कामांच्या तारखांतही घोळ करण्यात आला आहे. खरे तर, हे काम डिसेंबर 2018 मध्ये सुरू करण्यात आले आणि बांधकाम विभागाच्या फलकावर डिसेंबर 2019 मध्ये काम सुरू झाल्याचे नमूद करण्यात आले असून, काम पूर्ण झाल्याचा दिनांक सप्टेंबर 2019 नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुनील तिवारी यांनी केली आहे.