सोनाली कुलकर्णी- संग्राम समेळची जोडी चित्रपटात

    दिनांक :12-Nov-2019
|
मुंबई,
'विक्की वेलिंगकर' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आणि या टीझरनं चांगलीच चर्चा रंगली. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत असताना तिच्यासोबत अभिनेता संग्राम समेळ दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

 
संग्रामसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल सांगताना सोनाली म्हणते, 'मला ‘विक्की वेलिंगकर’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. संग्राम आणि मी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे, संग्राम या चित्रपटात विक्कीच्या मित्राची भूमिका साकारत आहे आणि तो एक हॅकरदेखील आहे. मैत्रीसाठी जीवाला जीव देणारा मित्र असतो तसं हे पात्र आहे. सग्रामसोबत या चित्रपटात काम करताना मला खूप मज्जा आली’ असं ती म्हणाली.
अभिनेता संग्राम समेळ हा यापूर्वी 'उंडगा', 'ब्रेव्ह हार्ट', 'ललित २०५' यांसारख्या मालिकांमधून तसेच 'एकच प्याला', 'कुसुम मनोहर लेले', 'वर खाली दोन पाय' यांसारख्या नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची ही कथा आहे' असं चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ शर्मा यांनी सांगितलं. त्यांनी यापूर्वी ‘मिकी व्हायरस’ आणि ‘7 अवर्स टू गो’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
सौरभ वर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.