ताडोबाची तात्काळ सफारी महागली!

    दिनांक :12-Nov-2019
|
*बफर दुपटीने, तर कोअर प्रवेशात 1 हजाराची वाढ
*9 नोव्हेंबरपासून नवे दर लागू
*अती महत्त्वाच्या व्यक्तींना मोजावी लागेल किंमत
चंद्रपूर, 
संकेतस्थळावर नोंदणी न करता अनेक महत्त्वाच्या व्यक्ती अगदी वेळेवर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीसाठी प्रकटतात. अशा विशेष पर्यटकांचा, ज्यांनी प्रयत्नपूर्वक आगाऊ नोंदणी केली अशांना मोठा हेवा वाटायचा. हा अन्याय असल्याची जाणीवही त्यांना व्हायची. अशा अती महत्त्वाच्या आणि वेळेवर अवतरणार्‍या पर्यटकांना आता त्याची अतिरिक्त किंमत मोजावी लागणार आहे. येत्या 9 नोव्हेंबरपासून वेळेवर येणार्‍या पर्यटकांसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात तब्बल दुपटीने, तर कोअर क्षेत्रात प्रवेशासाठी 1 हजार रूपयांची अतिरिक्त वाढ केली जात आहे. या वाढीस ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण यांनी दुजोरा दिला आहे.
 
 
 
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ऑफलाईन, तात्काळ जागेवर मिळणारे नोंदणी दर वाढविण्यात आले आहेत. सरासरी एक हजार रूपयाने ही वाढ झाली असून, 9 नोव्हेंबरपासून ही वाढ लागू होणार असल्याची माहिती प्रविण यांनी तभाला दिली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोअर आणि बफर अशा दोन क्षेत्रांतर्गत जंगल भ्रमंती केली जाते. सद्यस्थितीत ताडोबा तब्बल जून महिन्यापर्यंत ‘हाऊसफुल्ल’ आहे. त्यामुळे आता ऑफलाईन तिकीटासाठी पर्यटक आतूरलेले आहेत. या विशेष पर्यटकांसाठी बफर झोनमध्ये प्रवेशासाठी दुपटीने, म्हणजेच 2 हजाराची वाढ करण्यात आली आहे. जी आधी 1 हजार होती. अर्थात, आता बफरमध्ये सफारीसाठी 2 हजार रूपये जिप्सी, 350 गाईड आणि 2 हजार रूपये प्रवेश शुल्क असे एकूण 4 हजार 550 रूपये मोजावे लागतील. जे आधी 3 हजार 550 होते.
तर कोअरमध्ये पर्यटनासाठी आधी प्रवेश शुल्क 2 हजार , जिप्सी 2 हजार 700 आणि गाईड 350 रूपये असे एकूण 5 हजार 50 रूपये लागायचे. ते आता, प्रवेश शुल्कातील 1 हजार रूपयाच्या वाढीने 6 हजार 50 रूपये झाले आहे. एवढे पैसे आता या पर्यटकांना मोजावे लागणार आहे. अती महत्वाचे पर्यटक बरेचदा तिकीट काढत नव्हते. पण, त्यांना प्रवेश द्यावा लागायचा. त्याचा त्रास ऑनलाईन नोंदणी करणार्‍या पर्यटकांना व्हायचा. त्यामुळेच ही दरवाढ करण्यात आल्याचेही प्रविण यांनी सांगितले.