गडचिरोलीच्या ‘इंद्रधनुष्य’ला येणार राज्यपाल कोश्यारी!

    दिनांक :13-Nov-2019
|
संजय रामगिरवार
चंद्रपूर,
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होताच, राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचा कार्यभार आपल्या हाती घेतला असला, तरी या धकाधकीतून थोड्या वेगळ्या वळणाच्या ‘इंद्रधनुष्य’ महोत्सवासाठी त्यांनी गडचिरोलीत येण्याचे मान्य केले आहे. त्यांच्या उपस्थितीत या राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सवाचे उद्घाटन 2 डिसेंबरला होत आहे. 6 डिसेंबरपर्यंत राज्यातील 20 विद्यापीठांची सळसळती तरूणाई कलेचे सप्तरंग उधळणार आहे. या महोत्सवाच्या आयोजनासाठी गोंडवाना विद्यापीठ सज्ज झाले असून, गोंडवाना संस्कृतीचा स्नेहबंध अवघ्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीशी एकरूप होताना पाहण्याचा हा अनुभव अगदी अभिनव असेल. 

 
 
 
आंतरविद्यापीठीय राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव, ‘इंद्रधनुष्य’चे यंदा 17 वे वर्ष आहे. विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी या महोत्सवाची जबाबदारी गोंडवाना विद्यापीठावर टाकली आणि ती सार्थ ठरवण्यासाठी या विद्यापीठाची सर्व यंत्रणा कामालाही लागली आहे. राज्यातील 20 विद्यापीठांची प्रत्येकी 40 जणांची चमू येत्या 1 डिसेंबर रोजी राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोलीत दाखल होणार आहे. युवाशक्तीचा या जाज्वल्य मेळ्यात संगीत, नाटक, साहित्य, नृत्य व ललित प्रकारांतील जवळपास 26 कलांचे सादरीकरण होणार आहे. हे सर्व कार्यक्रम साधारणत: विद्यापीठ परिसरात होणार असून, त्यासाठी लहानमोठे शामियाने उभारण्यात येणार आहेत. गडचिरोलीतील सर्व हॉटेल्स, सभागृहांची नोंदणी आतापासूनच करण्यात आली आहे. 20 च्यावर विविध समित्यांचे गठणही झाले आहेत. 15 नोव्हेेंबरची सिनेट सभा पार पडताच, या कार्यक्रमासाठी युध्दस्तरावर विद्यापीठाची यंत्रणा राबणार आहे. ज्या पध्दतीने या विद्यापीठाने ‘अविष्कार’ यशस्वी केला, त्याच पध्दतीचे नावलौकिक हा कार्यक्रमसुध्दा मिळवून देईल, अशी आशा विद्यापीठाच्या सार्‍या घटकांना आहे.
 
 
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील सांस्कृतिक कला गुणांना वाव देण्यासाठी ‘इंद्रधनुष्य’सारखे महोत्सव महत्वाचे व्यासपीठ ठरत आहे. खरे तर, गडचिरोली सारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात असलेल्या गोंडवाना विद्यापीठाकडे ही जबाबदारी देताना, राजभवनाच्या काही अपेक्षा असतील. गोंडवनच्या संस्कृतीचे दर्शन अवघ्या महाराष्ट्राला व्हावे आणि त्याचवेळी प्रगत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारश्याचे दर्शनही गडचिरोली व चंद्रपूरसारख्या आडवळणाच्या परिसराला व्हावे, असा काहीसा उद्देश या ‘इंद्रधनुष्य’च्या आयोजनामागचा असू शकतो. या पाच दिवसीय युवा महोत्सवात शास्त्रीय गायन, तालवाद्य, सूरवाद्य, आदिवासी नृत्य, प्रश्नमंजुषा, वक्तृत्त्व, वादविवाद, एकांकिका, प्रहसन, मूक अभिनय, नकला, चित्रकला, पोस्टर मेकिंग, मातीकला, व्यंगचित्रे, रांगोळी, स्पॉट फोटोग्राफी अशा विविध कला प्रकारांत विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत. राज्यातील 20 विद्यापीठातील सुमारे 800 स्पर्धक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा निरीक्षक या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्यामुळे डिसेंबरचा पहिला आठवडा गडचिरोलीसाठी मेजवानी ठरणार आहे.