दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी भारत तयार – विराट कोहली

    दिनांक :13-Nov-2019
|
इंदूर,
बांगलादेशविरुद्ध ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघ आता कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. गुरुवारपासून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघ आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामनाही खेळणार आहे. गुलाबी चेंडूवर हा सामना खेळण्यासाठी भारत सज्ज असल्याचंही विराट कोहलीने स्पष्ट केलेय. तो पहिल्या कसोटी सामन्याआधी पत्रकारांशी बोलत होता. 

 
 
“कसोटी क्रिकेटमध्ये वैविध्य आणण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. मी काही दिवसांपूर्वी गुलाबी चेंडूवर सराव केला. हा चेंडू पारंपरिक लाल चेंडूपेक्षा जास्त वळतो. या चेंडूवर खेळत असताना तुम्हाला अधिक लक्ष देऊन खेळणं गरजेचं आहे.” विराटने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. यावेळी बोलत असताना बांगलादेशच्या संघाला हलकं लेखण्याची चूक आपण करणार नसल्याचंही विराट कोहली म्हणाला.
सध्या सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. बांगलादेशविरुद्ध मालिकेत भारत विजय मिळवत आपलं स्थान बळकट करण्याच्या विचारात आहे. २२ नोव्हेंबरला कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर भारत आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे.