इसिसच्या नव्या नेत्यावर आमची नजर : ट्रम्प

    दिनांक :13-Nov-2019
|
वॉशिंग्टन,
अमेरिकेची आता इसिसच्या नव्या नेत्यावर सूक्ष्म नजर आहे आणि तो नेता कुठे आहे हे आम्हाला माहीत आहे, असे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ते न्यू यॉर्क इकॉनॉमिक क्लबशी बोलत होते. 

 
 
ट्रम्प यांनी नवीन लक्ष्याच्या नावाचा उल्लेख केला नाही, परंतु त्यांचा संकेत अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशी याच्याकडेच होता. अबू बकर अल-बगदादीनंतर हाशिमी याला इसिसचा म्होरक्या म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. उत्तर-सीरियामध्ये अमेरिकन कमांडोंनी घेरल्यामुळे अल-बगदादीने स्वत:ला संपविले होते.
 
 
अमेरिकेला अल-बगदादी सापडला. आम्ही त्याला ठार केले. मग त्याचा उत्तराधिकारी आला. आम्ही त्यालाही संपविले आणि आता ‘तिसर्‍यावर’ आमची नजर आहे, असे ट्रम्प मंगळवारी एका भाषणात म्हणाले. आमच्यामुळे ‘त्या’ तिसर्‍या समोर बर्‍याच अडचणी आल्या आहेत. कारण तो कुठे लपला आहे हे आम्हाला माहीत आहे, असे त्यांनी सांगितले. अल-कुरैशी बद्दल सार्वजनिकपणे कुणाला फारसे माहीत नाही. गुप्त िंकवा परवलीचे शब्द वापरून आदिवासी समूह आपल्या नेत्याच्या संपर्कात असतो. मात्र, अल कुरेशी व्यतिरिक्त अन्य दहशतवादी नेत्यांविषयी आमच्या गुप्तचर संस्थांना बरीच माहिती आहे, असेही ट्रम्प म्हणाले.
 
 
अमेरिकन सैन्याच्या विशेष कृतिदलाने अल बगदादीचा पाठलाग करून तो ज्या बोगद्यात लपला होता तेथे शिरून त्याची जबरदस्त कोंडी केली होती. अमेरिकेचे सैनिक आपल्याला ठार करणार याची खात्री झाल्यावर बगदादीने गोळ्या झाडून स्वत:ला संपविले होते.
 
 
ट्रम्प यांनी उल्लेख केलेला ‘दुसरा’ म्हणजे अबू हसन अल-मुहाजीर, अल-बगदादीचा निकटवर्तीय आणि 2016 पासून दहशतवादी संघटनेचा प्रवक्ता होता. अल-बगदादीच्या मृत्यूनंतर काही तासांनी अमेरिकन आणि कुर्दिश सैन्याच्या संयुक्त कारवाईत त्याचा मृत्यू झाला होता. आणखी एक ‘दुसरा’ फादिल अहमद अल-हयाली असू शकतो, जो संघटनेचा दुसर्‍या क‘मांकाचा नेता होता. ऑगस्ट 2015 मध्ये इराकमधील अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. इसिसच्या नेत्याला लक्ष्य करण्याचा इशारा देण्याची ट्रम्प यांची दोन दिवसांत ही दुसरी वेळ आहे. यावरून लवकरच अमेरिकन सैनिक इसिसविरुद्ध पुन्हा मोठी कारवाई करणार, असे तज्ज्ञांचे मत आहे.