अंजिराची यशस्वी लागवड

    दिनांक :13-Nov-2019
|
शेती व्यवसायात बर्‍यापैकी नफा प्राप्त करायचा तर व्यापारीदृष्ट्या फायदेशीर ठरणार्‍या पिकांच्या लागवडीवर भर द्यायला हवा. त्यादृष्टीने अंजिराची लागवड उत्तम लाभ देणारी आहे. अंजिरासाठी उष्ण आणि कोरडं हवामान लाभदायक ठरत असल्याने राज्यात याच्या लागवडीला बराच वाव आहे. शिवाय अंजिराची लागवड हलक्या माळरानापासून मध्यम, काळ्या तसंच तांबड्या जमिनीतही करता येते. सर्वसाधारणपणे अंजिराची लागवड अभिवृध्दी फाटे कलमाद्वारे केली जाते. त्यासाठी रोगमुक्त बागेतील जोमदार वाढीच्या झाडांची निवड करावी. अंजिराच्या लागवडीसाठी सिमरना, कालिमिरना, कडोटा, काबूल तसंच मार्सेल्स आदी जाती प्रसिध्द आहेत. महाराष्ट्रात पुना अंजीर या जातीची लागवड अधिक प्रमाणात केली जाते. शिफारशीनुसार लागवड केल्यास हेक्टरी 400 झाडांची लागवड करता येऊ शकते. पाऊस पडून जमिनीत भरपूर ओल झाल्यावर अंजिराची मुळं फुटलेली रोपं खड्डयात लावावीत. 

 
 
 
अंजिराच्या झाडांना फार पाणी लागत नाही. त्यामुळे कमी पाण्याच्या प्रदेशातही हे पीक उत्तम येऊ शकतं. अर्थात, फळझाड वाढीच्या काळात हंगाम, जतिनीचा मगदूर आणि मशागतीचा प्रकार यानुसार झाडांना नियमितपणे पाणी द्यावं. झाडं फळावंर आल्यावरही नियमित पाण्याची आवश्यकता असते.
 
 
अंजिराच्या झाडांना फळांचा बहार सर्वसाधारपणे दोन वेळा येत असतो. पावसाळा आणि उन्हाळा असे हे दोन बहार असतात. असं असलं तरी अंजिराचं उत्पादन लागवडीनंतर चौथ्या वर्षापासून घ्यायला हवं. अर्थात, अंजिराची झाडं सात-आठ वर्षांची झाल्यावर फळांचं चांगलं उत्पादन येण्यास मदत होते.