‘इसा तंत्रज्ञान’ समाजाच्या आरोग्यासाठी शेतीचे नवे तंत्र

    दिनांक :13-Nov-2019
|
• डॉ. बोरकर
 
आपले आरोग्य, आपण काय आणि किती आरोग्यदायी अन्न खातो यावर अवलंबून आहे. आपल्या रोजच्या आहारातील धान्ये, भाज्या आणि फळांची गुणवत्ता ते ज्या वातावरणात व ज्या जमिनीमध्ये उगवले यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. उदा. ज्या पिकांमध्ये उत्पादनाकरिता मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते, कीटकनाशके व संजीवके यांचा वापर केला जातो, त्या पिकांची गुणवत्ता ही नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या पिकापेक्षा निश्चितच कमी दर्जाची असते. डॉ. कार्लो लेफोर्ट यांनी 2014 मध्ये ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनाच्या लेखात असे सिद्ध केले आहे की, अजैविक रीत्या तयार केलेल्या अन्नातील आणि सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या अन्नाच्या पौष्टिकतेमध्ये जरी फारसा फरक नसला, तरी या अन्नातील अँटीऑक्सिडेंट्सच्या प्रमाणात बराच फरक असतो. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या अन्नात जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे कर्करोग आणि इतर रोगांची संभावना माणसामध्ये होण्याची शक्यता कमी होते. 

 
 
 
आपल्या समाजात दिवसेंदिवस हार्मोनल असंतुलन संबंधित आजार जसे- मधुमेह, थायरॉईड्स आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी स्ट्रोक वाढत आहेत, जे कीटकनाशकांच्या अवशेषांचे प्रमाण असलेल्या अन्न उत्पादनांशी थेट संबंधित आहेत.
 
 
(http//www.beyondpesticide.org <http://www.beyondpesticide.org/ ही वेबसाईट बघा.) अमेरिकन आणि युरोपियन वैज्ञानिकांनी असे सिद्ध केले आहे की, कार्बामेट कीटकनाशक मधुमेह आणि इतर चयापचय रोगांचा धोका वाढवितो, बंदी घातलेल्या रसायनांमुळे ऑस्टिझम रोगाचा धोका असतो, डीडीटीमुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका असतो, ग्लायफोसेट तणनाशक कर्करोग आणि मूत्रिंपडाच्या आजारांना प्रवृत्त करते, ईपीए नोंदणीकृत कीटकनाशकामुळे एकाधिक सोरोसिस होतो, ऑर्गानोफॉस्फेट कीटकनाशक मॅलॅथिऑन हे यकृत आणि मूत्रिंपड यांचे नुकसान करते, कीटकनाशकाच्या अवशेषांमुळे लवकर होणारी रजोनिवृत्ती, कोलन कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आणि पार्किन्सन रोग इत्यादींनादेखील कारणीभूत असतात. हे वैज्ञानिक संशोधन लेख विविध अमेरिकन आणि युरोपियन जर्नल्समध्ये प्रकाशित केले गेले आहेत, जे आपणास अजून अवगत नाही व आपल्या आरोग्याचा खेळखोळंबा सुरू आहे. गेल्या पाच दशकांत कृषी उत्पादन यंत्रणेत खते, कीटकनाशके आणि तणनाशकांचा प्रचंड वापर यासाठी जबाबदार आहे. आता काही उपाय आहे का? होय!
 
 
आपल्या शेतजमिनीत असंख्य प्रकारचे सूक्ष्मजंतू आहेत जे वनस्पतींच्या वाढीसाठी आणि पीकपालनासाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या एंजाइम आणि हार्मोनची निर्मिती करून आपल्या मातीची सुपीकता व उत्पादकता वाढवण्यास जबाबदार आहेत. त्यामुळे ज्या जमिनी अशा जिवाणूंनी परिपूर्ण असतात, त्या जमिनीमधील पिकाची गुणवत्ता आरोग्यास पोषक असते. दुसरीकडे, ज्या मातीत सूक्ष्मजीव नसतात अशा जमिनीस सामान्यत: मृत माती असे म्हणतात आणि अशा मातीतल्या पिकांची गुणवत्ता कमी असते. खते, कीटकनाशके आणि तणनाशकांचा वारंवार आणि अनावश्यक वापर केल्यास मातीतील सूक्ष्म जीवांची संख्य कमी होते व पर्यायाने जमिनीचा पोत आणि सुपीकता खराब होते. अशाप्रकारे मातीचा पोत आणि सुपीकता राखण्यासाठी सूक्ष्म जीवांचे अविश्वसनीय महत्त्व आहे.
 
 
प्रत्येक शेतजमिनीत त्या जमिनीतील वातावरणामुळे आणि सेंद्रिय पदार्थांमुळे, सूक्ष्म जीवांच्या वेगवेगळ्या जाती व प्रजाती आढळून येतात. बाजारामध्ये उपलब्ध जैव खते (biofertilizer) हे सूक्ष्मजंतूंचा प्रकार आहे, जे वनस्पतींच्या वाढीच्या कार्यात मदत करते. प्रत्येक जमिनीमध्ये उपलब्ध व कार्यक्षम असणारे जिवाणू हे वेगवेगळे असल्यामुळे बाहेरील जिवाणू आपल्या जमिनीत किती कार्यक्षम होतील, हे सांगणे कठीण आहे, कारण प्रत्येक जमिनीत वेगवेगळ्या जिवाणूचा जगण्यासाठी खटाटोप सुरू असतो. त्यामुळे काही जिवाणू दुसर्‍या प्रजातीच्या जिवाणूंचा संहार करतात. म्हणूनच प्रत्येक जमिनीतील उपलब्ध सूक्ष्म जीवाणूंचे व्यवस्थापन करणे आणि त्यांची संख्या इच्छित स्तरावर वाढविणे, मातीचा पोत आणि सुपीकता वाढविण्यासाठी महत्त्वाचे आहे.
 
 
त्याचप्रमाणे पिकाच्या पृष्ठभागावर बर्‍याच सूक्ष्मजंतूंच्या प्रजाती असतात, ज्याला वैज्ञानिकदृष्ट्या इपिफाईट्स म्हटले जाते. हे एपिफाईट्स रोगकारक बुरशी व जिवाणूपासून आपल्या पिकांचे संरक्षण करते. गेल्या सहा दशकांतील वैज्ञानिक प्रकाशनांनी यापूर्वीही हे दाखवून दिले आहे. म्हणूनच हे इपिफाईट्स वनस्पती रोग व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतात. कीटकनाशके आणि तणनाशके यांच्या अतिवापरामुळे फायदेशीर इपिफाईट्सची संख्या कमी होते आणि रोपे रोगांना बळी पडतात. त्यायोगे पिकांच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधांच्या फवारण्यांची संख्या वाढवावी लागते. या कीटकनाशक फवारण्या आणि त्यांचे अवशेष आपल्या अन्नास विशेषत: भाज्या आणि फळे यांना दूषित करतात, जे आपल्या आरोग्याच्या समस्येचे मुख्य कारण आहेत.
 
 
म्हणूनच कीटकनाशकांचे अवशेषविरहित अन्न, भाज्या आणि फळे तयार करण्यासाठी शेतात फायदेशीर मूळ सूक्ष्मजंतूंचा वापर करणे आवश्यक आहे. आपल्या जमिनीतील सूक्ष्मजीव प्रयोगशाळेमध्ये वाढवून त्यांचाच वापर आपल्या शेतीसाठी करणे म्हणजेच ‘इसा तंत्रज्ञान’ होय. आपल्या जमिनीची सुधारणा व पिकाची गुणवत्ता वाढविणे व जास्तीत जास्त सेंद्रिय पिके उत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍यांनी इसा तंत्रज्ञानाचा वापर करावा.
 
 
अधिक माहितीसाठी संपर्क : 9422757406
कृषी वैज्ञानिक (सेवानिवृत्त)