इस्रायलच्या AIR STRIKE मध्ये खतरनाक दहशतवाद्याचा खात्मा

    दिनांक :13-Nov-2019
|
गाझा पट्टीतून प्रतिहल्ला
इस्रायलने मंगळवारी गाझा पट्टीत इस्लामिक जिहाद या पॅलेस्टिनियन दहशतवादी गटाच्या एका टॉप कमांडरचा खात्मा केला. त्यानंतर गाझा पट्टीत संघर्षाला सुरुवात झाली आहे. इस्लामिक जिहाद या दहशतवादी गटाला इराणचे पाठबळ आहे. इस्रायलने गाझा पट्टीत केलेल्या हल्ल्यामध्ये बाहा अबू अल-अत्ता या दहशतवाद्याचा खात्मा केला.
 
 
 
त्यानंतर सीरियात दामास्कसमध्ये अल-अत्ताच्या घरावर मिसाइल हल्ला करण्यात आला. त्यामध्ये त्याच्या मुलासह दोघांचा मृत्यू झाला. दामास्कसमध्ये इस्रायलने हल्ला केल्याचे सीरियाने म्हटले आहे. पण इस्रायलने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इस्रायलच्या एअर स्ट्राइकमध्ये अल-अत्ता त्याची पत्नी आणि १० पॅलेस्टिनियन दहशतवादी ठार झाल्याचे गाझाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
गाझामधून इस्रायलच्या दिशेने रॉकेटस डागण्यात आले. त्यामध्ये २५ इस्रायली जखमी झाले आहेत. काही रॉकेट तेल अवीवपर्यंत पोहोचले. पॅलेस्टायिन आणि इस्रायलमध्ये तह घडवून आणण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे मध्यपूर्वेचे राजदूत कैरोला निघाले आहेत. सीमेपलीकडून इस्रायलवर झालेल्या रॉकेट, स्नायपर हल्ल्यांसाठी अल-अत्ता जबाबदार होता. आणखी हल्ले घडवून आणण्याची त्याची योजना होती असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले.
“आम्हाला तणाव वाढवण्याची अजिबात इच्छा नाही पण स्वसुरक्षेसाठी जे आवश्यक आहे ते सर्व करु” असे नेतान्याहू म्हणाले. इस्रायलने एकाचवेळी सीरिया आणि गाझामध्ये हल्ला करुन युद्धाची घोषणा केली आहे असे इस्लामिक जिहादचा म्होरक्या अल-बातशने म्हटले आहे.