कोवळी उन्हं हळवी होण्याचे दिवस...

    दिनांक :13-Nov-2019
|
 
यथार्थ  
श्याम पेठकर  
 
 
दिल्ली-मुंबईत काहीही घडत असले तरीही गावाच्या शिवाराच्या आत ऋतू आपले नैसर्गिक सहजतेनं त्यांच्या ठरलेल्या वेळेवर शिरकाव करतात. कधी त्यांच्या वेळा आणि दिवस चुकतात, पण त्याला ते जबाबदार नसतात. माणसांनी छेडछाड केली तर ती ऋतूंच्या अंगलट येते आणि मग माणसांचे जगण्या-मरण्याचे प्रश्न निर्माण होतात. माणसं निसर्गसुलभतेनं ऋतूंसारखी वागली असती, तर माणसांच्या सामाजिक सलोख्यात आणि पर्यावरणातही समस्या उभ्याच झाल्या नसत्या...
 
पाऊस यंदा अंमळ लांबला आणि त्याने श्वास पाण्याखाली कोंडले. आता दिवाळसण संपत आला असताना थंडी हळुवार गावशिवारात शिरते आहे. शहरात ज्या माणसांनी मनात गाव जिवंत ठेवले आहे किंवा त्यांच्या बापजाद्यांच्या गावाशी जिव्हाळा कायम ठेवला आहे, त्यांच्या उंच इमारतीत असलेल्या दोन शयनकक्षांच्या सदनिकेतही ऋतू अवतरतात... म्हणून कळ्या आता गोठत चालल्या आहेत. रात्रभर त्या थंडी सहन करीत बसल्या असतात. सोबत केवळ चांदण्यांची. उत्तररात्री धुकं वाढतं आणि चांदण्यांची नजरही अधू होते. वाचा जाते. चांदण्यांचे उबदार, काव्यमय बोल रात्रभर सोबतीला नसले की, कळ्यांची फुले होऊच शकत नाहीत. मनात आभाळ दाटून आले नाही की, उमलणे शक्यच नसते. आभाळ ऐन रात्रीचं एकटं असतं. त्यालाही कुणाच्यातरी सोबतीची गरज असते.
 
आभाळाची सोबत केवळ कळ्याच करू शकतात, पण हेमंत सुरू झाला की ते शक्य नसतं. हेमंतात धुकं दाटदाट असतं अन्‌ मग कळ्यांना वाटतं की, आभाळच खाली उतरलंय्‌. दाटलेल्या धुक्यासोबत चांदण्याही उगाच खाली आल्यासारख्या वाटतात. त्यामुळे कुणाचीही अशी फसगत होऊ शकते. कळ्यांची अशी फसवणूक झाली की, फुलं उमलत नाहीत. हेमंतात हिवाळा रांगू लागतो अन्‌ मग तुमचंच बोट धरून चालायला लागतो. पण, तोपर्यंत पानांचा पसारा आवरून पंखात चोच खुपसून बसलेल्या पाखरागत झाडं अवघडून उभी असतात. परसदारीच्या तगराने तर संपच पुकारलाय्‌ अन्‌ कन्हेराचे मौनव्रत शिशिरात सुटणार आहे. उन्हं तरणी तरतरीत होऊन धिटुकली झाल्याशिवाय फुलं उमलणार नाहीत अन्‌ पौषाशी हातमिळवणी करणार्‍या कार्तिकात तर ती दिवस सरला, तरी अनावर थंडीचे अमूर्त पातळ आवरण भेदून कळ्यांना हसवू शकत नाहीत. मग सकाळी फिरायला निघालं की, वाडेवजा घराच्या फाटकाशी कुंदकळ्यांचा सडा पडलेला असतो. दोन-तीन दिवस थंडीशी झगडून त्यांनी मान टाकलेली. तरीही कुंदाचे झाड टोकदार टंच कळ्यांनी लदबदलेले असतेच.
 
उन्हांना पाकळ्यांनी जुमानले नाही की, फुलं फुलत नाहीत. मग मोठ्या वाड्यातली म्हातारी भरल्या पहाटे कातर होते. त्या वाड्यातली सकाळ म्हातारीच्या थरथरत्या लगबगीनेच होते. वाडाही आता म्हाताराच झालेला. वाड्याच्या बुरुजावर पिंपळाच  रोपटं वाढतंय्‌. म्हातारी त्या रोपट्याकडे बघत बसते. पण, तिचा हात मात्र त्या रोपट्याकडे पोहोचत नाही. भल्या पहाटे उठून नजरेनं रोपटं कुरवाळण्यापासूनच तिच्या दिवसाची सुरुवात होते. घरंदाज वाड्यातली, शालीत गुरफटलेली शालीन म्हातारी सवयीनेच फुलझाडांपाशी जाऊन उभी राहते. हातातल्या परडीत पहाटेचा हळुवार वारा भरलेला. परडीला श्रावणाची चटक लागलेली. पण, आश्विनानंतर तगराने फुलणे टाकलेले. तुळसमंजिर्‍यांचीही कोवळीक सरलेली. अंगणातल्या गवतावरचे दविंबदू म्हातारीच्या पायांना छळतात. म्हातारीच्या नाकात रात्री लावलेल्या संधिवाताच्या तेलाचा कुबट दर्प तरळत असतो. फुलं मिळत नाहीत. म्हातारी मग रोजच्याप्रमाणे रिकामी परडी देवघराजवळ ठेवते. कार्तिकातल्या काकड्याने आता सवय झालेली. म्हातार्‍याला उठवून ती संथपणे अंघोळ उरकते. अंगावर पाणी पडताच म्हातारीची स्तोत्रं सुरू होतात. हुडहुडीने आवाज आणखीच थरथरलेला. वाड्यात आता केवळ ते दोघेच उरलेले. स्थलांतरित पाखरांसारखी मुलं कधीमधी येतात. वाडा विकून टाकण्याच्या गोष्टी करतात. म्हातारा-म्हातारी ऐन सांजेला परसदाराच्या भल्या थोेरल्या विहिरीच्या काठावर बसून चुपचाप रडून घेतात.
 
अश्रू विहिरीच्या पाण्यात मिसळतात. त्यांच्या कित्येक पिढ्यांच्या वेदना त्या विहिरीच्या पाण्यात मिसळलेल्या आहेत. म्हणून विहीर आटत नाही. पण, या वेळी मात्र पाणी थरारतं. हिवाळा आला की, म्हातारी छप्पर पलंगाखालून लाकडाची भली थोरली संदूक ओढते. गरम-उनी कपडे काढून घेते. आता हे गरम कपडेच त्यांची काळजी घेणार. देवाजवळ मात्र म्हातारी शाल ओढून बसते. बिनाफुलांनी पूजा करते. देव धुताना म्हातारीच्या हातात बाळकृष्णाची मूर्ती अडखळते. मुलांच्या बालपणाची आठवण उगाच छळत राहते. स्वयंपाकीणबाई चुलीजवळ उबेत बसल्या असताना म्हातारी बंगळीवर उन्हं जोजवीत बसली असते. म्हातार्‍याचे पान अजूनही रंगते. ओठात देव खेळवीत म्हातारी जपमाळ ओढते. एकटंच राहायचं होतं तर इतका पसारा मांडलाच कशाला? किती फोलपणा आहे सगळाच? असले प्रश्न या वेळी म्हातार्‍याच्या चेहर्‍यावर अन्‌ म्हातारीच्या मनात असतात. कार्तिकात काकडा निनादू लागला की, या अशा प्रश्नांची तीव्रता वाढते. पहिलं मूल हे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी होतं. पण, नंतर... एकमेकांच्या शरीरात ऊब शोधताना हिवाळ्यात केलेली चूकच होती ती. म्हातारी आवळ्याच्या झाडाखाली पाखरांसाठी पाणी ठेवते. खूपसारी अनोळखी पाखरं तिच्या अंगणात येतात. दारासमोर सीताफळाच्या कुंपणावर येणारी कोकीळही आता परकी वाटू लागली आहे. ऋतूंची जाणीव लोप पावत जाताना, ऋतुबदल होताना येणारे आपसूक हळवेपणही आता उरले नाही. तरीही हिवाळा जाणवत राहतो. रात्री म्हातारी दागिन्यांची पेटी उघडून बिल्लोरी आरशात बघत बसते. उगाच लाजते...
 

 
 
 
गावाच्या तळ्यावर पक्ष्यांचा जमघट. त्यात चोचीत दविंबदू वेचण्याचं कसब साधलेले काही परदेशस्थ पक्षीही असल्याचे ऐकिवात आहे. आपल्या पाखरांनीही चोचीत दविंबदू वेचण्याचं कसब शिकावं असं उगाच वाटत राहतं. ज्या प्रदेशातील पाखरांना असं कसब आहे, तिथली माणसं चिरतरुण असतात, असं ऐकिवात आहे. ऋतूंची जाणीव हृदयाच्या तळापर्यंत होत राहिली की, माणूस म्हातारा होत नाही. पण, त्यासाठी आपल्या प्रदेशातल्या पाखरांनी चोचीत भूक घेऊन स्थलांतर केलं पाहिजे. पायात आपल्या देशातली माती घेऊन पंखांनी आभाळ मोजलं पाहिजे. तळ्याच्या दगडी पाळीवर पाखरांची ऊठबस असते. पाळीच्या खरपाच्या दगडावर त्यांनी आपल्या चोचींनी कोरून ठेवलेल्या नक्षी कळत नाहीत. त्या कळल्या असत्या, तर पोटात भूक घेऊन पंखांत बळ आणण्याचे सारेच अन्वयार्थ कळले असते. तळ्याच्या मधोमध असलेल्या टेकाडावर सरत्या सांजेला पाखरांची गर्दी असते. पाण्यावरून उडून जाताना पाखरं प्रतििंबबात अडकत नाहीत. नव्या पिलांना नव्या प्रदेशाची माहिती देताना ती थकतही नाहीत. पंखातलं बळ संपलं की, निपचित जमिनीवर पडून राहतात. अशा वेळी त्यांचे पंख जमिनीवर अन्‌ पाय आभाळाकडे असतात. उडणार्‍या पंखांना अखेर जमिनीचाच आधार असतो. म्हणून शहाणी पाखरं जमीन पायांनी धरून ठेवतात. पाखरं जमिनीवर अखेरची पसरली की, त्यांची पुढची पिढी निमूटपणे उडून जाते. सरत्या पाखरांनाही त्याचा विषाद वाटत नाही. त्यांना भूक कळलेली असते म्हणून मृत्यूही अनोळखी वाटत नाही.
 
हिवाळ्यात परदेशस्थ पाखरं जगण्यासाठी येतात तशीच ती मरण्यासाठीही येतात. मरणपंथात एकटं सोडून सगेसोयरे निघून गेल्याचं दु:ख त्यांना होत नाही. मृत्यूच्या दारी एकट्यानंच जायचं असतं, हे त्यांना कळतं तसंच कलेवराचा मोह धरायचा नसतो. पाखरांच्या पाऊलखुणांचा माग काढत गेलं तर वाटेत गावातली शाळा हमखास भेटते. हिवाळ्यात शाळेच्या काटेरी कुंपणावर बगळे सकाळचे ऊन खात बसले असतात. घराच्या अंगणात नळाखाली थंडगार पाण्याची धार अंगावर घेत पहाटे बसलो असताना गुरुजी आवाज देतात, ‘‘चल, अजून अंघोळच झाली नाही का?’’ दव पायानं तुडवीत शाळेकडे धाव घेतली की थंडीलाही कापरं भरावं, इतक्या धारदार स्वरात प्रार्थना सुरू असते. शाळेच्या वर्गखोल्या गारठलेल्या. शाळेबाहेर पटांगणावर मस्त ऊन पसरलंय्‌. शाळा मग पटांगणात भरते. आपली शाळा एवढी मोठी आहे, हे हिवाळ्यातच कळतं. उन्हं अंगावर झेलीत शिकणंही छान वाटतं. पटांगणावर गवतात बगळे ऐटीत फिरत असतात- कुणी दांडगाई करू नये म्हणून हात मागे बांधून फिरणार्‍या हेडसरांसारखे. म्हातारी हातात परडी घेऊन मंदिराकडे निघालेली. उन्हं निघाल्यावर फुललेली काही कणखर फुलं तिच्या परडीत! पटांगणावर बसलेल्या मुलांजवळून जाताना ती हळवी होते. कसलातरी शोध घेतल्यागत मुलांकडे बघत बसते. कोवळ्या उन्हातल्या कोवळिकीत म्हातारी हरवते. तिथूनच देवाला हात जोडून डुलतडुलत घरी परतते. हिवाळ्यात देव मंदिराच्या गारठलेल्या गाभार्‍यात थोडाच बसणाराय्‌...