झारखंडमध्ये भाजपासमोर आव्हान!

    दिनांक :14-Nov-2019
|
दिल्ली वार्तापत्र
श्यामकांत जहागीरदार 
 
 
झारखंडमध्ये 30 नोव्हेंबरपासून 20 डिसेंबरपर्यंत 5 टप्प्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. 23 डिसेंबरला मतमोजणी होऊन राज्यातील जनतेचा कौल कुणाला मिळाला, हे स्पष्ट होणार आहे.
 
 
झारखंड हे आदिवासीबहुल तसेच नक्षलप्रभावित राज्य आहे, त्यामुळे 81 जागांसाठी 5 टप्प्यांत विधानसभा निवडणूक घ्यावी लागत आहे. झारखंड हे देशातील सर्वात तरुण राज्य म्हणावे लागेल. अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना 2000 मध्ये देशात झारखंड, छत्तीसगड आणि उत्तराखंड अशा तीन नवीन राज्यांची निर्मिती केली. तारखेने सांगायचे तर 15 नोव्हेंबर 2000 हा झारखंडचा स्थापना दिवस. म्हणजे उद्या 15 नोव्हेंबरला झारखंडचा वाढदिवस. 

 
 
 
झारखंडमध्ये सुरुवातीपासूनच भाजपाचा प्रभाव राहिला आहे. भाजपा नेते बाबुलाल मरांडी हे झारखंडचे पहिले मुख्यमंत्री. नंतर बाबुलाल मरांडी भाजपात राहिले नाही, त्यांनी भाजपा सोडत स्वत:चा नवा पक्ष काढला, हा भाग निराळा.
 
 
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 31.26 टक्के मतांसह 37 जागा जिंकल्या. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेने 3.68 टक्के मतांसह 5 जागा मिळवल्या. शिबु सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाने 20.43 टक्के मतांसह 19 जागा जिंकल्या. बाबुलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चा प्रगतिशीलने 9.99 टक्के मतांसह 8 जागा जिंकत तिसरे स्थान पटकावले. 10.46 टक्के मतांसह 6 जागा जिंकत काँग्रेस चौथ्या स्थानावर होती.
 
 
राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी 42 जागांची आवश्यकता होती. भाजपा 37 आणि आणि अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेच्या 5 मिळून सरकार बनवण्यासाठी आवश्यक ते बहुमत भाजपा आघाडीने मिळवले आणि भाजपाचे रघुवरदास यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली.
 
 
पुढे बाबुुलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चा प्रगतिशीलच्या 6 आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजपाने स्वबळावर बहुमत प्राप्त केले. त्यामुळे रघुवरदास यांना राज्याला स्थिर आणि सक्षम सरकार देता आले. याआधी राज्यातील राजकीय परिस्थिती नेहमीच अस्थिर राहिली. जवळपास 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे रघुवरदास हे राज्यातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत. आतापर्यंत राज्यातील एकाही मुख्यमंत्र्याला आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही.
 
 
अर्जुन मुंडा आणि शिबु सोरेन यांनी प्रत्येकी तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले. भाजपाचे अर्जुन मुंडा यांचा तीन टप्प्यांतील मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ 5 वर्षे 9 महिने 26 दिवसांचा होता. मुंडा यांचा मुख्यमंत्रिपदाचा पहिला कार्यकाळ 1 वर्ष 11 महिने 12 दिवसांचा होता. त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा दुसरा कार्यकाळ 1 वर्ष 6 महिने 7 दिवसांचा, तर तिसरा कार्यकाळ 2 वर्षे 4 महिने 7 दिवसांचा होता.
 
 
शिबु सोरेन यांनी तीनदा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले. शिबु सोरेन यांचा मुख्यमंत्रिपदाचा पहिला कार्यकाळ सर्वात कमी म्हणजे फक्त दहा दिवसांचा होता. सोरेन यांचा मुख्यमंत्रिपदाचा दुसरा कार्यकाळ 4 महिने 23 दिवसांचा, तर तिसरा कार्यकाळ 5 महिने 2 दिवसांचा होता. मात्र, तीन कार्यकाळ मिळून ते वर्षभरही या पदावर राहू शकले नव्हते. त्या तुलनेत शिबु सोरेन यांचे पुत्र हेमंत सोरेन हे 1 वर्ष 5 महिने 15 दिवस मुख्यमंत्रिपदावर राहिले. अपक्ष मधु कोडा यांनी 1 वर्ष 11 महिने 8 दिवस मुख्यमंत्रिपद सांभाळले.
 
 
देशात काँग्रेस शक्तिशाली असतानाही झारखंडमध्ये काँग्रेसला कधीच सत्ता मिळवता आली नाही. काँग्रेसची कामगिरी कधीच समाधानकारक राहिलेली नाही. काँग्रेस नेहमीच तिसर्‍या वा चौथ्या स्थानावर राहिली. त्यामुळे राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.
 
 
भाजपा यावेळी राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. 2014 मध्ये भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेने यावेळी वेगळा राग आलापला आहे. भाजपाची युती तोडत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका भाजपाला नाही तर त्यालाच बसणार आहे. 2014 मध्ये अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेला 3.68 टक्के मतांसह ज्या 5 जागा जिंकता आल्या, त्यात भाजपासोबत असलेल्या युतीचा मोठा वाटा होता. त्यामुळे राज्यात आपली नेमकी ताकद किती आहे, याचा अंदाज यावेळी या संघटनेला आल्याशिवाय राहणार नाही. 5 जागा जिंकल्यानंतरही युतीत असल्यामुळे या संघटनेला सत्तेत वाटाही मिळाला होता. मात्र, यावेळी भाजपाने दिलेल्या जागा अमान्य करत या पक्षाने हात दाखवून अवलक्षण करण्याची भूमिका घेतली आहे.
 
 
बिहारमधील भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षानेही यंदा स्वबळावर झारखंड विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. लोजपा हा रामविलास पासवान यांचा पक्ष. रामविलास पासवान मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहेत. वयोमानानुसार रामविलास पासवान यांनी लोजपाची धुरा चिराग पासवान यांच्या खांद्यावर सोपवली आणि चिराग यांनी भाजपाच्या विरोधात स्वबळावर झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेत चिराग पासवान यांनी आपल्या पायावर दगड पाडून घेतला आहे.
 
 
आपल्या मुलाचा म्हणजे चिरागची आपल्या जागेवर मोदी यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लावण्याचा पासवान यांचा प्रयत्न आहे. यावेळीही रामविलास पासवान यांनी माझ्याऐवजी चिरागला मंत्रिमंडळात घ्या, अशी विनंती मोदी यांना केली होती. पण यावेळी तुम्हीच या. चिरागचे नंतर पाहू, असे मोदी यांनी म्हटल्यामुळे रामविलास पासवान मंत्रिमंडळात आले. त्यामुळे चिराग पासवान यांनी आपल्या कोणत्याही राजकीय कृतीमुळे भाजपाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. पण, उत्साहाच्या भरात त्यांना याचा विसर पडला.
 
 
भाजपाशी युती असल्यामुळे लोजपाला बिहारमध्ये लोकसभेच्या काही जागा जिंकता आल्या. त्यामुळे बिहारमध्ये आपली ताकद असल्याचा भ्रम लोजपाच्या नेत्यात निर्माण झाला. लोजपाचे झारखंडमध्ये काहीच अस्तित्व आणि प्रभाव नाही. राष्ट्रीय पक्ष म्हणून स्वत:ला मान्यता मिळवून घेण्याच्या प्रयत्नात काही प्रादेशिक पक्ष अन्य राज्यात विधानसभा निवडणूक लढवतात, त्यातलाच हा प्रकार आहे.
 
 
बिहारमध्ये भाजपासोबत आघाडीचे सरकार चालवत असलेले जदयुचे नितीश कुमार यांनीही दिल्ली विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राजधानीतील पूर्वांचली मतदारांवर नितीश कुमार यांचा डोळा आहे. दिल्लीत विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करून नितीश कुमार कारण नसतांना भाजपाला अपशकुन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुळात भाजपाच्या मित्रपक्षांना झाले तरी काय, हे समजत नाही. प्रत्येकालाच स्वबळाचे वेध लागले आहेत.
 
 
झारखंडमधील विधानसभा निवडणूक भाजपा विद्यमान मुख्यमंत्री रघुवरदास यांच्या नेतृत्वात लढत आहे. भाजपाने आपल्या 52 उमेदवारांची पहिली यादी जाहीरही केली. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आता फक्त 15 दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे एक एक क्षण महत्त्वाचा आहे.
 
 
महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीतील निकाल समोर असल्यामुळे झारखंडमध्ये भाजपाला अतिशय सावधपणे पावले टाकावी लागणार आहेत. हरयाणात भाजपाने कशीबशी सत्ता टिकवली, मात्र महाराष्ट्रात भाजपाला अद्याप आपले सरकार स्थापन करता आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या दोन राज्यांतील इतिहासाची पुनरावृत्ती झारखंडमध्ये होणार नाही, याची काळजी भाजपाला घ्यावी लागणार आहे. त्यासाठी जे जे आवश्यक असेल ते भाजपाने केले पाहिजे. वेळप्रसंगी आपल्या व्यूहरचनेचा नव्याने आढावा घेतला पाहिजे. कारण झारखंडमधील सत्ता गमावणे भाजपाला परवडणारे नाही.